गांधीजी आफ्रिकेतून मुंबईत परतल्याच्या घटनेस १०० वर्षे झाल्याच्या निमित्तेने आलेली बातमी     (९ जाने.) वाचली. बातमीसोबत गांधीजी व कस्तुरबा यांचा फोटोही प्रसिद्ध झाला आहे. त्या फोटोत गांधीजींनी मस्तकी खादीचा काठेवाडी फेटा परिधान केल्याचे दिसून येते. गांधीजींच्या आफ्रिकेतील अपवादात्मक कामगिरीमुळे स्तिमित झालेले त्यांचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार भारतभर भ्रमण केल्यानंतर बहुसंख्य भारतीय जनतेचे कमालीचे दारिद्रय़ प्रत्ययास आल्यामुळे त्याना परमावधीचे दु:ख झाले.
विशेषत: त्या दौऱ्यात एका नदीवर ते स्नानासाठी गेले असता एका महिलेजवळ लज्जारक्षणार्थ फक्त एकच जुनीपुराणी साडी असल्याचे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले तेव्हा आपल्या साध्या पोशाखाचीही त्यांना लाज वाटली. परिणामी, भविष्यात साधा पंचा, साधे उपरणे व साधीच टोपी वापरण्याचे त्यांनी ठरवले.
कालांतराने ती साधी टोपी वापरण्याचेही त्यांनी सोडून दिले. मध्यंतरीच्या काळात ‘गांधी टोपी’ असे तिचे नामाभिधान होऊन असंख्य लोक तिचा वापर करू लागले होते. फक्त पंचा व उपरणे या गांधीजींच्या पोशाखामुळे ‘नेकेड फकीर’अशी गांधीजींची टवाळीही तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांकडून होत असे, परंतु तिची यत्किंचितही पर्वा न करता ते लंडन येथे संपन्न गोलमेज परिषदेस भारताचे प्रतिनिधी या नात्याने निमंत्रणानुसार उपस्थित राहिले.
हल्ली मात्र काही विशेष प्रसंगी महागडे फेटे वापरण्याची पद्धत काही राजकीय पक्षांत बरीच वाढलेली दिसून येते. अशाप्रसंगी केवळ पुरुषच नव्हे तर महिलाही फेटय़ाचा वापर करताना दिसून येतात. फेटय़ामुळे तो वापरणाऱ्या व्यक्तीचा भारदस्तपणा उठून दिसतो यात शंकाच नाही.  परंतु प्रचंड गरिबीने ग्रासलेल्या भारतासारख्या देशात त्यासाठी होणारा खर्च दृष्टिआड करता येत नाही. विशेषत: रोजच्या व्यवहारात फेटे वापरण्याची पद्धत रूढ नसल्याने वरीलप्रमाणे विशेष प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या त्या महाग फेटय़ांचे पुढे काय होते असा प्रश्न पडतो. म्हणजे बहुसंख्य गरीब जनतेच्या दृष्टीने त्यासाठी होणारा खर्च वाया जातो असे म्हणावे लागते. तेव्हा राजकीय नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा असे सुचवावेसे वाटते.

अनेक मंत्र्यांकडे उसनवार अधिकारी!
‘विनोद तावडे यांच्या खात्यात ‘उसनवार अधिकारी’ ही बातमी (२२ जाने.) वाचली. परंतु केवळ तावडे यांच्या आस्थापनेवरच नाही तर  मागील १० वर्षांतील मुख्य कार्य अधिकारी, स्वीय साहाय्यक व इतर कर्मचारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच अनेक राज्यमंत्री यांच्या आस्थापनेवरसुद्धा उसनवार पद्धतीने अधिकारी / कर्मचारी कार्यरत आहे. सदर अधिकारी /कर्मचारी यांची तेथे मक्तेदारी दिसून येते व सामान्य जनतेला नेहमी वेठीस (गृहीत) धरण्यात येते. तसेच मंत्र्यांच्या भेटी सामान्य जनतेला नाकारण्यात येतात.  सामान्य प्रशासन विभागाच्या १ डिसेंबरच्या परिपत्रकाचेचे उल्लंघन खुद्द मंत्रिमहोदायांकडून  होत आहे. मुख्यमंत्री यात लक्ष घालतील का?
 – सीमा सानप

सत्तेसाठी काय पण!
एका वृत्तवाहिनीवर किरण बेदी यांची मुलाखत पाहिली. त्यात त्यांना मुलाखतकाराने बरेच चांगले प्रश्न विचारले, पण किरण बेदी यांनी एखाद्या मुरब्बी नेत्याप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.  त्यांना प्रश्न विचारला की अरिवद केजरीवाल यांनी आपणास खुल्या चर्चेसाठी आमंत्रण दिले असताना आपण का टाळत आहात? त्यांचे उत्तर मी चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देते आणि ही चर्चा म्हणजे तमाशा आहे. पूर्वी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही एकदम भ्रष्ट पक्ष आहेत  असे त्या म्हणाल्या होत्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जागा जेलमध्ये आहे असे ट्विटही त्यांनी केले होते. आज मात्र त्या मोदींची स्तुती करतात.  एकंदरीत काय तर सत्तेसाठी काय पण, कधी पण, कुठे पण!
–  महानवर नितीन कोंडिबा

जाहीर माफी मागावी लागणे अवमानकारकच
‘मुरुगन यांचा हट्ट अस्थानी’ ही प्रतिक्रिया (लोकमानस, १९ जाने.) मला खटकली.  मुळात मुरुगन यांच्या बाबतीत झालेल्या एकंदरीत घटनेबद्दल हे पत्र लिहिण्यापूर्वी पुरेशी माहिती घेतलेली नाही, असे दिसते. एखादी कादंबरी वाचून तिच्यात काही आक्षेपार्ह वा बदनामीकारक लिखाण आहे म्हणून काही लोक तिच्या विरोधात आंदोलन वगरे करत असतील तर ते ठीक आहे.
परंतु मुरुगन यांची ‘मधोरुबागन’ ही मूळ तामीळ भाषेत असलेली कादंबरी चार वर्षांपूर्वी आली, तेव्हा समीक्षकांनी तिचे स्वागतच केले होते, परंतु त्याच कादंबरीचा ‘वन पार्ट वुमन’ नावाचा इंग्रजी अनुवाद (तोही डिसेंबर २०१३ मध्ये) प्रकाशित झाल्यानंतर वर्षभराने, ‘वेल्लाळ गौंडूर’ या जातीमध्ये ही कादंबरी त्या जातीचा अपमान करणारी आहे, असा प्रचार सुरू झाला.
मुरुगनसुद्धा त्याच जातीचे आहेत. एका रूढीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी एक कहाणी रंगवली. ही कहाणी एका जोडप्याची मानसिक आंदोलने टिपत असल्याने, ती कोणाचीही बदनामी करत नाही. तरीसुद्धा काही संघटनांच्या आंदोलनामुळे त्यांना जिल्हा प्रशासनाच्या एका बठकीसमोर सर्वाची माफी मागावी लागली व त्या कादंबरीच्या न खपलेल्या प्रती विकणार नाही हे (जाहीरपणे) कबूल करावे लागले.
कुठल्याही लेखकावर अशा प्रकारचा मानहानीकारक प्रसंग येण्याची माझ्या माहितीतली ही पहिलीच वेळ. त्यामुळे लेखकाची झालेली मानसिकता समजून न घेता त्यांनी घेतलेला निर्णय हा सरळसरळ ‘अस्थानी’ म्हणून आपण त्या लेखकाचा आणखी अपमान करत आहोत, ही बाजू पत्रलेखक म्हणून समजून घेतली पाहिजे.
– जीवन आघाव,  पुणे

या लुटारूंकडून ऐवज वसूल करावा
‘तुळजाभवानी मंदिराची लूट !’ ही बातमी (२३ जाने.) धक्कादायक आहे. दुसरे म्हणजे अशा बातम्यांनी  काही काळ बराच गहजब होतो, धुरळा उठतो पण  प्रत्यक्षात फारसे काहीच घडत नाही. अलीकडच्या काळातले एक असेच  उदाहरण आठवते, ते म्हणजे, शिक्षण खात्यातले. शाळांच्या पटावरील विद्यार्थ्यांच्या ‘उपस्थिती’चे आकडे फुगवून  अशा खोटय़ा वाढीव विद्यार्थीसंख्येमुळे मिळणारे वाढीव सरकारी अनुदान पदरात पाडून घेणारे  संस्थाचालक.  मात्र त्यांनी लाटलेले पैसे काही सरकारला मिळालेच नाहीत.  या  प्रकरणात तसे होऊ नये. या सर्व लुटारूंकडून लुटीचा ऐवज पुरेपूर वसूल करण्यात यावा किंवा त्याची योग्य दराने रोख रकमेच्या स्वरूपात परतफेड घेण्यात यावी. तसेच  त्यांना कायद्याने योग्य ती शिक्षाही व्हावी.
– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)