एकदम ‘चोकस’!

सामान्य मुंबईकराला एवढे अवाढव्य भाडे कसे परवडेल, असा सवाल करीत आंदोलनाची तयारी सुरू होईल.

आता सर्वत्र याचीच चर्चा सुरू होईल. कुठे कडवट सूर उमटू लागतील, अनेकांची तोंडेही वाकडी होतील. याची गरज होती का? महागाई, नोटाबंदी, बाजारातील मंदी यामुळे अगोदरच चाकरमानी मुंबईकर मेटाकुटीला आलेला असताना असा काही उद्योग करायला हवा होता का, असेही कुणी विचारेल. कष्टकरी मुंबईकर रेल्वेत आणि फलाटावर चेंगराचेंगरीत गुदमरत असताना ऐषारामी गाडय़ा कुणासाठी करताय, असा खरमरीत सवालही कुणी करेल. मराठी माणसाला यातून काय मिळणार, असेही कुणी म्हणेल, तर कुणाला मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करण्याचे षड्यंत्र दिसेल. सामान्य मुंबईकराला एवढे अवाढव्य भाडे कसे परवडेल, असा सवाल करीत आंदोलनाची तयारी सुरू होईल. अगोदरच प्रदूषणाने ग्रासलेल्या या महानगराचा श्वास आता चिमूटभरांना गारवा देणाऱ्या ऐषारामासाठी कोंडणार का, असा पर्यावरणवादी सूरही कुठे उमटू लागेल. फलाटाची उंची वाढवणार नसाल तर तुमची ती एसी लोकल नको, असे कुणी आपल्याच सरकारला ठणकावून सांगेल. अगोदरच रेल्वे डबघाईत असताना असे पांढरे हत्ती कसे पोसणार, अशी चिंता कुणाला पडेल. आमच्या मतदारसंघात हिरवा झेंडा न दाखविताच गाडी पुढे कशी गेली, असा सवाल करीत मार्गावरच्या मतदारसंघात रुसवेफुगवे होतील. मुंबईच्या विकासात सर्वसामान्य मराठी मुंबईकर आहे कुठे? त्याला डावलून विकास होणार असेल तर तुमचा विकास तुम्हालाच लखलाभ होवो, असा बाणा दाखवत सरकारशी ‘सामना’ करण्याकरिता काही ‘कडवट’ हातांच्या बाह्य़ा सरसावल्या जातील; पण आधी मोनोरेल, मेट्रो रेल्वे धावल्या तशी आता ती वातानुकूलित गाडीसुद्धा धावणारच आहे. फास्ट ट्रॅकवरून डोळ्यादेखत धडधडत धावणारी ही चकचकीत गाडी पाहताना चाकरमानी, कष्टकरी मुंबईकराच्या तोंडाचा उभा ‘आ’ वासला जाईल. कदाचित त्याचा हात नकळतच खिसे चाचपू लागेल.. कधी तरी आपण मुलाबाळांसह या गाडीतून एखादी तरी फेरी मारली पाहिजे, असे नवे स्वप्न अनेकांच्या मनात नव्याने घर करेल.. आणि काबाडकष्ट करून संध्याकाळी घरी परतलेल्या चाकरमान्याच्या तोंडून या गाडीची वर्णने ऐकताना मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासोबत आपल्याही उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुलाबाळांच्या मनात एसी लोकलच्या प्रवासाची आस रुजेल.. सणासुदीला घराबाहेर पडून चर्चगेटच्या ‘सबवे’मध्ये कपडे-खेळण्याची खरेदी आणि ‘चायनीज भेल’ खाऊन ‘जिवाची मुंबई’ करणारा चाकरमानी एखाद्या सणाच्या दिवशी ‘एसी’ लोकल प्रवासाचे सहकुटुंब नियोजन करण्यासाठी पैसा बाजू6ला काढण्याचा संकल्पही सोडेल.. पण मुंबई आता कुणासाठी थांबणार नाही. ती आता जागतिक दर्जाची महानगरी म्हणून झळकणारच आहे. नव्या ‘एसी लोकल’लाही आज ना उद्या गर्दी होणारच आहे. वातानुकूल लोकल ही एका वर्गाची गरज आहे आणि मागणीही आहे. फक्त गुटखा-मावा खाणाऱ्यांच्या थुंकण्याची सोय कशी करणार याचा काही तरी विचार व्हायला हवा!.. रेल्वेमंत्री मुंबईचे असल्यामुळे अशा प्रवाशांसाठी त्यांनी गाडीतच काही तरी मार्ग काढावा.. मग गाडी एकदम ‘चोकस’!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ac local in mumbai mumbai local problem

Next Story
निरोपाला ‘कर’कर!
ताज्या बातम्या