‘सायकल’ आता एकटय़ाचीच!

कटय़ाने लढणे सोपे नाही याची जाणीव त्यांना झाली. तरीही हिंमत न हरता त्यांनी सायकलवरून बंगल्यातच एक फेरी मारली.

‘ना बाबा ना बुआ’ अशी निर्वाणीची घोषणा करून अखिलेश यादव घरी परतले तेव्हा त्यांना खूप हलके वाटू लागले होते. खूप दिवसांपासून डोक्यावर असलेला ताण कमी झाल्याच्या आनंदात त्यांनी बंगल्याच्या मागच्या भागात असलेल्या अडगळीच्या खोलीत पडून असलेली सायकल दुरुस्तीसाठी बाहेर काढली. पतीराजाचे हे रूप बघून आनंदलेल्या डिम्पलभाभींनी त्यांना दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या सामानाची पेटी लगेच काढून दिली. गेल्या वेळी तिघांना घेऊन ‘सवारी’ करायची असल्याने मजबूत लोखंडी ढाच्यापासून बनवलेल्या या सायकलीला आता थोडे हलके करावे असे त्यांनी ठरवले. तिघांचे वजन पेलवले पाहिजे म्हणून चाकांना गती देण्यासाठी बसवलेली जाडजूड चेन काढून त्या ठिकाणी हलकी व ऑस्ट्रेलियातील ओळखीच्या दुकानातून मागवलेली चेन टाकण्याचे काम त्यांनी हाती घेतले. ते करून झाल्यावर त्यांनी पायडल फिरवून बघितले तर चेन थोडी घट्ट झाल्याचे लक्षात आले. आता काय करायचे, कारागिराला बोलवायचे का, असा प्रश्न मनात येताच त्यांनी तो झटकून टाकला. एकटय़ाने लढायचे म्हटल्यावर सर्व कामे करता यायलाच हवी असा मनाचा निग्रह करत त्यांनी चेनला ऑइलिंग करणे सुरू केले. हात काळे झाले तर झाले पण दुसऱ्यांच्या ‘हाता’ची मदत नको असा विचार मनात येताच ते सुखावले. थोडय़ा प्रयत्नानंतर पायडल व्यवस्थित फिरू लागल्याबरोबर त्यांचा ‘जिंकण्याचा’ आत्मविश्वास दुणावला. मग त्यांचे लक्ष चाकाकडे गेले. वजन न झेपल्याने त्याचे स्पोक पार वाकडेतिकडे झाले होते. एकेक करता त्यांनी ते सर्व सरळ केले. यादव कुळातल्या काही मुजोर गणगोतांनासुद्धा असेच ‘सरळ’ करावे लागणार याची जाणीव त्यांना त्या क्षणी झाली. आता या सायकलवर मी व मागच्या सीटवर जास्तीत जास्त डिम्पल बसेल. दोघांचेही वजन तसे कमीच. मग एवढय़ा जाड टायरची गरज काय असे म्हणत त्यांनी स्पोर्ट सायकलींना असलेले कमी वजन व जाडीचे टायर टाकायला सुरुवात केली. पूर्वाचल असो, उत्तरांचल असो की बुंदेलखंड आता ही वेगात पळेल या भावनेनेच ते आनंदले. मग त्यांनी आधीची मोठी सीट बदलून नवीकोरी ‘व्ही’ आकाराची सुबक व आकर्षक सीट बसवली. ब्रेक बघितले तर ते जाम झालेले. तिथेही भरपूर ऑइलिंग करून त्यांनी ‘स्मूथ’ करून घेतले. आजवर अनेक चढउतार पाहिले; आता एकटय़ाने सायकल चालवताना योग्य वेळी ब्रेक लागायलाच हवेत असे मनात येताच त्यांनी ते मारण्याचा सराव जरा वेळ करून घेतला. मग त्यांचे लक्ष घंटीकडे गेले. ती वाजता वाजेना. पार गंजून गेलेली. तिघांनी वाजवून ती खराब झाली हे ध्यानात येताच त्यांनी नवी बसवायला घेतली. आता वाजवण्याचा अधिकार केवळ आपलाच असे स्वत:शी पुटपुटत ते खुदकन हसले. पुन्हा एकवार साऱ्या गोष्टी तपासून बघितल्यावर त्यांनी सायकल स्टॅण्डवरून उतरवली. तेव्हा लक्षात आले टायरमध्ये हवाच नाही. लगेच त्यांनी पंपाने ती भरायला सुरुवात केली. दम लागेस्तोवर ते पंप मारत राहिले. एकटय़ाने लढणे सोपे नाही याची जाणीव त्यांना झाली. तरीही हिंमत न हरता त्यांनी सायकलवरून बंगल्यातच एक फेरी मारली.

हे सारे शूट करत असलेल्या डिम्पलभाभींनी लगेच तो व्हिडीओ ‘नेतापुत्र’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला. तो बघताच तेजस्वी यादवने कंदील, तर चिराग पासवानने बंगल्याची दुरुस्ती तातडीने हाती घेतली. यावर बारकाईने लक्ष ठेवून असलेले राहुल गांधी हाताच्या पंजाचा इमोजी टाकून ग्रुपमधून ‘लेफ्ट’ झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akhilesh yadav announced samajwadi party will contest uttar pradesh election alone zws

ताज्या बातम्या