देशातील सगळ्या राजकारण्यांना, नोकरशहांना, काळाबाजारवाल्यांना, चोरांना, चिलटांना सुतासारखे सरळ करावयाचे असेल, तर त्याकरिता दोन रामबाण उपाय आपण सर्वानी ठरवून ठेवले आहेत. त्यातील एक म्हणजे देश लष्कराच्या ताब्यात द्यावयाचा किंवा दोन – हुकूमशाही आणावयाची. यायोगे देश विश्वगुरू होणार असेल, तर त्यास हरकत कोणती मिषे घ्यावी? तथापि त्यात एकच अडचण आहे. हुकूमशहा करावयाचे तर कोणास? पहिले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे ‘ देश एका दिवसासाठी आपल्या हाती द्या’ असे  म्हणत असत. परंतु कोणी दिलाच नाही. श्रीमती इंदिरा गांधी यांनी मात्र सरळ २१ महिन्यांसाठी देश आपल्या हाती घेतला. त्यास काहींनी विरोध केला. कचेऱ्यांत बाबूलोक वेळेवर येत, रेल्वे वेळापत्रकानुसार धावत, काळाबाजारवाले, भ्रष्टाचारी तुरुंगात असत, अनेक पोरे प्रसवणाऱ्यांच्या नसबंद्या केल्या जात, असे अच्छे दिन तेव्हा म्हणे आले होते. देश असा प्रगती करीत असताना कोणास बोलावयास मिळाले नाही तर काय झाले? पण ते काहींस पाहावले नाही. अशा विरोधकांस इंदिराजींचे भक्त देशद्रोही असे म्हणत असत. हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात उभे राहणाऱ्यांना नेहमीच देशद्रोही म्हटले जाते. आज हा समग्र इतिहास स्मरण्याचे कारण म्हणजे देशात पुनरपि आणीबाणी अवतरली आहे, असे काही देशद्रोह्य़ांचे म्हणणे असल्याचे माध्यमगेशा म्हणत आहेत. आज देश प्रगती करीत आहे. भ्रष्टाचारी, काळाबाजारवाले जाम भयभीत आहेत. बीफबंदीसारखे प्रगत कायदे लागू होत आहेत. त्यांचा भंग करणारांना तर जंताच परस्पर शिक्षा देत आहे. सरकारी प्रसिद्धीपत्रके न छापणाऱ्या माध्यमगेशांना, झालेच तर धर्मद्रोही, नमोद्रोही म्हणजेच देशद्रोही यांना देशप्रेमी जंताच धडा शिकवत आहे. सरकारमधील एका मंत्र्यावर बलात्काराचा आरोप आहे, पण तो सिद्ध झालेला नाही. मात्र असे आरोप असलेल्या आमदारांनाही तातडीने अटक करण्यात येत आहे. अशा पद्धतीने सांप्रती देशात कायद्याचे राज्य अवतरले आहे. यास आणीबाणी म्हणणे सर्वस्वी चूकच. ती चूक सुधारण्यासाठी आता मोदी यांनी अज्ञजनांस आणीबाणी म्हणजे काय रे भौ, हे सांगण्याचे ठरविले आहे. एका वृत्तानुसार काही मंत्र्यांकडे (त्यात अर्थातच मनेकाजींचा समावेश नाही.) ती जबाबदारी सोपविली असून, ते ठिकठिकाणी सभा घेऊन आणीबाणीतील अत्याचारांची पोथी वाचणार आहेत. म्हणजे मग जनसामान्यांच्या मस्तकी सौरप्रकाश पडेल, की आणीबाणीत सत्ता कशी एकाच्याच हाती केंद्रित होते, देश कसा व्यक्तिपूजक बनतो, बोलण्यावर कशी बंधने येतात, विरोधकांचा काटा कसा काढला जातो, कावळे कसे कळसावर चढविले जातात, आपण म्हणू तेच देशहिताचे हे कसे ठसविले जाते,  सतत बाहेरील शत्रूचे भय कसे दाखविले जाते. हे करणे अत्यंत गरजेचे आहे. खरे तर आणीबाणीच्या या उत्तरपूजेकरिता मोदी सरकारने एखादा वीस कलमी कार्यक्रमच राबविला पाहिजे. त्या कार्यक्रमपत्रिकेवर हवे तर मोदी यांचे छायाचित्र छापावे. लोक त्यातून काय बोध घ्यायचा तो घेतीलच..