जुने जाऊ द्या मरणालागुन..

मध्यंतरी केंद्राने केलेल्या कायद्यामुळे ही वास्तू आता सरकारच्या ताब्यात आली आहे.

Jinnah House
जिना हाऊस

 

नवतेची तुतारी फुंकणारे आपले केशवसुत- पक्षी कृष्णाजी केशव दामले यांची ओळख भारतीय जनता पक्षाचे गिरगावचे आमदार मंगलप्रभात लोढा यांना आहे की नाही, हे कळावयास मार्ग नाही, पण केशवसुतांचा नवनिर्माणाचा बाणा लोढा यांच्या नसानसांत भिनलेला आहे (या नवनिर्माणाचा संबंध दादरस्थित धाकटय़ा ठाकरे कुलोत्पन्नांशी मुळीच नाही, हे लक्षात घ्यावे.). मुंबई म्हणू नका, पुणे म्हणू नका, हैदराबाद म्हणू नका.. लोढा यांच्या नवनिर्माणाची गगनचुंबी बांधकामचिन्हे सर्वत्र आहेत. जेथे जातो तेथे माझीच बांधकामे दिसताहेत, अशी त्यांची भावावस्था होत असावी. तर, मुंबईतील एका जागी असे नवनिर्माण व्हावे, अशी लोढा यांची मनीषा आहे. या नवनिर्माणात मात्र खळ्ळखटय़ाक अपेक्षित आहे.  पाकिस्तानच्या निर्मितीचे सूत्रधार मोहम्मद अली जिना यांचे वास्तव्य ज्या वास्तूत होते ती जिना हाऊस नामक आलिशान वास्तू मलबार हिल परिसरात आहे. मध्यंतरी केंद्राने केलेल्या कायद्यामुळे ही वास्तू आता सरकारच्या ताब्यात आली आहे. तेव्हा हे आलिशान जिना हाऊस पाडून टाकावे आणि तेथे सांस्कृतिक केंद्र उभारावे, अशी मागणी आहे लोढा यांची. ती त्यांनी विधानसभेतही केली. जिना हाऊस का  पाडायचे? तर, आपल्या देशाच्या फाळणीचा कट याच वास्तूत आखला गेला.. ही वास्तू म्हणजे आपल्या देशाच्या फाळणीचे एक प्रतीक आहे म्हणून. बरोबरच आहे लोढा यांचे म्हणणे. आजवर दुर्लक्षित राहिलेले हे प्रतीक, शहरोशहरींच्या सिंधी कॅम्पांपेक्षाही अधिक सलणारे. मुळात फाळणी म्हणजे आपल्या हृदयातील एक कायमचा सल. त्या फाळणीची प्रतीके नष्टच झाली पाहिजेत, किंबहुना आपल्या राष्ट्राचा स्वाभिमान दुखावणारी सर्वच्या सर्व प्रतीके नष्ट करून तिथे-तिथे सांस्कृतिक केंद्रे बांधली पाहिजेत. मग त्या फिरंग्यांना तरी का म्हणून सोडायचे? केवढा काळ पारतंत्र्यात ठेवले आपल्याला. मग त्यांच्या येथील अस्तित्वाची प्रतीकेही पाडून टाकायला हवीत. पहिल्यांदा ती गेटवे ऑफ इंडियाची वास्तू पाडायला हवी. त्यांचा राजा भारतात आला त्याची आठवण म्हणून त्यांनी बांधलेली ही वास्तू. पाडूनच टाकायला हवी ती. बोरीबंदरला केवढे मोठे रेल्वेस्थानक बांधून ठेवले इंग्रजांनी. काहीही गरज नव्हती एवढे सुंदर स्थानक बांधण्याची. लोक काय तिथे राहणार आहेत का? करायचे काय ते सौंदर्य? केवढी मोठी जागा व्यापली आहे त्या स्थानकाने. भर मुंबईत इंग्रजांच्या शासनाची एवढी ढळढळीत खूण? तीही पाडायला हवी. त्याच स्थानकासमोरचे मुंबई महापालिकेचे कार्यालय. तेही त्या ब्रिटिशांनीच बांधलेले. तेही पाडायला हवे आणि तेथे आपल्या लोकांना सांगून नवी वास्तू उभी करायला हवी. जुने जाऊ द्या मरणालागुन.. असे मंगलवचन लोढा सांगतायत त्याकडे लक्ष द्यायलाच हवे सरकारांनी. शेवटी स्वत्व नावाची काही एक गोष्ट असते की नाही? त्याची थोडी तरी चाड राखायला हवी ना..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp mla mangal prabhat lodha demands demolition of jinnah house

ताज्या बातम्या