आपको नही पता, ब्युरोक्रसी कुछ नही होती. चप्पल उठानेवाली होती है. चप्पल उठाती है हमारी. हम लोग ही राजी हो जाते है उसके लिए… भाजपच्या एका वरिष्ठ महिला नेत्यांनी अलीकडेच उघड केलेल्या या राष्ट्रीय गुपितानंतर हलकल्लोळ माजला. या नेत्या मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या, त्यामुळे त्यांची माहिती अधिकृतच असणार याची खूणगाठ तर साऱ्यांनीच बांधली. सगळ्यात पहिला परिणाम झाला सरकारी अधिकाऱ्यांच्या घरोघरी. तुम्ही घरात इकडची काडी तिकडे करत नाही आणि तिकडे जाऊन चपलासुद्धा उचलता म्हणजे काय, असा प्रश्न सगळ्याच स्त्रीपुरुष सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या घरातल्या हायकमांडनी विचारला. माझ्याबरोबर चपलांच्या खरेदीला पण येत नाहीस आणि तिकडे जाऊन चप्पल उचलतोस/ उचलतेस या कारणाने एकदोन तरुण, उमद्या, होतकरू सरकारी अधिकाऱ्यांचे ब्रेकअपपण झाले म्हणे. हे वैयक्तिक परिणाम बहुतेक सरकारी अधिकाऱ्यांनी मोठ्या मनाने नजरेआड केले, पण हे गुपित आता अधिकृत झाल्याने कार्यालयीन पातळीवर बरेच बदल झाले. एक तर सरकारी सेवेत प्रवेश करण्यासाठी पूर्वतयारी, परीक्षा, मुलाखती या सगळ्या चाळण्यांमधून पार होऊन निवड झाल्यानंतर त्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षणामध्ये रायकीय नेत्यांच्या चपला-बूट कसे उचलायचे या अभ्यासक्रमाचा समावेश झाला. राजकीय पदांची उतरंड लक्षात घेऊन कुणाचे चप्पल-बूट किती उंचावर उचलून घ्यायचे, कुठे आणि कसे ठेवायचे हे त्यांना शिकवलं जायला लागलं. कुठल्या पातळीवरच्या अधिकाऱ्याने कुठल्या पातळीवरच्या नेत्याच्या चपला-बूट उचलायचे आणि कुठल्या पातळीवरच्या नेत्याचे उचलायचे नाहीत याचे सगळे प्रोटोकॉल त्यांच्या प्रशिक्षणात समाविष्ट केले गेले. अर्थात एवढेच प्रशिक्षण देऊन भागणारे नव्हते. राजकीय नेते राज्यात फिरताना कोणत्या प्रकारचे चपला -बूट वापरतात, राज्याबाहेर गेल्यावर कोणत्या प्रकारचे चपला-बूट वापरतात, प्रत्येक राज्यागणिक  तिथल्या वैशिष्ट्यांनुसार चपलांचे तिथले वेगवेगळे पारंपरिक प्रकार, राजकीय नेते कोणत्या प्रसंगी कोणत्या प्रकारच्या चपला घालतात हे अधिकाऱ्यांना  माहीत असणे आवश्यक होते. त्यामुळे तेही प्रशिक्षणात समाविष्ट केले गेले. राजकीय नेते प्रामुख्याने कोणत्या ब्रॅण्डच्या चपला-बूट वापरतात, त्या ब्रॅण्डची माहिती ठेवणे आता सरकारी अधिकाऱ्यांना अनिवार्य  झाले. आपल्या खात्याचे मंत्री वापरत असतील त्या प्रकारच्या, त्या ब्रॅण्डच्या चपला- बूट वापरून त्यांच्याशी बरोबरी न करण्याचा अलिखित संकेतही सरकारी अधिकाऱ्यांच्या जगण्याचा भाग झाला. एका सरकारी अधिकाऱ्याने तर त्याच्या दृष्टीने त्याच्या खात्याच्या मंत्र्याच्या चपला म्हणजे रामाच्या पादुकाच आहेत, असेही भक्तिभावपूर्ण विधान केल्यामुळे आपण काय बोलायचे याबाबतीत बाकी सगळ्याच अधिकाऱ्यांची पंचाईत झाली. यूपीएससी- एमपीएससी परीक्षांमध्येही राजकीय नेत्यांच्या चपला या विषयावर कोणताही प्रश्न येऊ शकतो, मुलाखतीत त्याबद्दल विचारले जाऊ शकते हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनीही त्या दिशेने अभ्यास सुरू केला. शासकीय- प्रशासकीय पातळीवर चपला-बूट या विषयाला महत्त्व आल्यामुळे सर्व पातळ्यांवरचे चप्पल-बूट निर्मातेही सुखावले.

एवढे सगळे होईपर्यंत उमा भारतींनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केल्यामुळे आता या सगळ्या बदलांचे काय करायचे हा प्रश्न संबंधितांना पडला आहे म्हणे!