मांझी-नीती…

एरवी त्यांचा फोनही न घेणारे हे व्यापारी बिहारी अस्मितेचा प्रश्न आहे म्हणत लगेच पुरवठ्यासाठी तयार झाले.

‘जिसने ना मारी बडी पिचकारी वो काहे का बिहारी’ ‘एक मांझी (डोंगर खोदणारा) वो था, एक मांझी ये है’ अशा आवेशपूर्ण घोषणांनी सारा देश दणाणून गेलेला. ‘जा आणि सोडवा काश्मीरचा प्रश्न पंधरा दिवसात’ हे सत्ताधाऱ्यांनी दिलेले प्रतिआव्हान स्वीकारत देशभर दौरा करणारे जितनराम या घोषणांनी प्रफुल्लित झालेले. देशाच्या कानाकोपऱ्यातून जम्मूकडे निघणाऱ्या रेल्वेगाड्या बिहारींनी भरून निघाल्याच्या वार्ता त्यांच्या कानावर क्षणाक्षणाला आदळत होत्या. राज्याच्या राजकारणात अपयशी ठरलो म्हणून काय झाले? आता देशपातळीवर सक्रिय होण्यासाठी हीच अखेरची संधी असे मनाशी ठरवत मांझी काश्मिरात दहशतवाद्यांना कसे पळवून लावायचे या योजनेवर अखेरचा हात फिरवत होते. माजी मुख्यमंत्री म्हणून दिमतीला असलेला एक सहायक व दोन चार विश्वासू कार्यकर्ते काश्मीरला निघालेल्या प्रत्येकाला आपले ‘हथियार’ सोबत ठेवा अशा सूचना फोनवरून देत होते. तिथे खास ‘बिहारी स्टाईल’ने लढायचे असेल तर मोठ्या संख्येत हातठेले लागतील  हे लक्षात येताच मांझींनी राज्यातील फर्निचरवाल्यांना विनंती केली. एरवी त्यांचा फोनही न घेणारे हे व्यापारी बिहारी अस्मितेचा प्रश्न आहे म्हणत लगेच पुरवठ्यासाठी तयार झाले. एवढी जटिल समस्या अवघ्या पंधरवड्यात सोडवण्यासाठी नेमका प्लॅन कोणता असा प्रश्न पाटण्याला जमलेले देशभरातले पत्रकार मांझींना सतत विचारत होते; पण ते स्पष्ट उत्तर देत नव्हते. ‘जैसे मै अचानक सीएम बना, वैसेही अचानक ये समस्या हल करके आऊंगा’ एवढेच ते बोलायचे. त्यामुळे साऱ्यांची उत्सुकता शिगेला गेलेली. काश्मीर खोऱ्यात पोहोचलेले दोन लाख बिहारी वेगवेगळ्या सेक्टरला रवाना झाले व त्यांचे हातठेले सुद्धा पोहोचल्याचे कळल्यावर मांझीनी गांधी मैदानात जंगी सभा घेतली. ‘कष्टासाठी ओळखला जाणारा बिहारी माणूस हीच या राष्ट्राला एकसंध ठेवणारी शक्ती आहे. ती दाखवून देण्याची वेळ आज आली आहे. मागास भागातले लोकही जिगरबाज असतात. भले आमच्या राज्याच्या विकासात आम्ही कमी पडलो असू पण दहशतवादाची समस्या सोडवून देश-विकासात हातभार लावू. तेव्हा चलो काश्मीर, चलो लाल चौक’ अशी गर्जना करत ते रवाना झाले. तिथे गेल्यावर दोन दिवस कोणतीच वार्ता कानावर आली नाही. त्यामुळे आनंदित होत काही बिहारींनी गिरिराज सिंगाच्या घरासमोर फटाके फोडून ‘दहशतवादी पळाले’ अशा घोषणा दिल्या. मग एकेका सेक्टरमधून बातम्या यायला लागल्या. ‘सीमारेषेवर तसेच मोक्याच्या ठिकाणी ठेले लावून बसणाऱ्या बिहारींनी गोलगप्पे व पाणीपुरीत दारूगोळा भरून दहशतवाद्यांच्या अंगावर भिरकावणे सुरू केले. त्यासाठी त्यांनी ‘गमचा’चा गोफण म्हणून वापर केला. या अचूक माऱ्यात शंभरपेक्षा जास्त शत्रू ठार झाले. शिवाय हे नवे आक्रमण न समजल्याने शेकडो सीमेपलीकडे पळून गेले. बिहारींचा हुरूप वाढण्यासाठी मांझी अनेक सेक्टरमध्ये दौरे करत असून त्यांनी स्वत: दोन ठिकाणी सहा शत्रूंना धूळ चारली. बिहारींच्या या धाडसामुळे सैन्यदलाला मोठा दिलासा मिळाला असून देशभरातून मांझींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.’

 …झोपेतल्या झोपेत खुदखुद हसू लागलेले मांझी गोळीबाराचा आवाज ऐकताच ताडकन् उठले. घाबरलेल्या चेहऱ्याने त्यांनी सहायकाला विचारले, ‘क्या हुआ’ तो म्हणाला ‘सर, सामनेसे बारात जा रही है, वहाँ खुशीसे गोली चली.’ हे ऐकताच त्यांनी घाम पुसला. बऱ्याच काळानंतर ते स्वप्नातून वास्तवात आले. तोच त्यांची नजर टेबलावर ठेवलेल्या पेपरकडे गेली. पहिल्याच पानावर असलेले ‘लौट के बुद्धू घर आया’ हे शीर्षक वाचून त्यांनी रागाने ते दैनिक दूर सारले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: By the authorities tour across the country accepting the challenge last chance akp

Next Story
निरोपाला ‘कर’कर!
ताज्या बातम्या