चेंबूरचा आलिशान स्टुडिओ. तिथे लागलेल्या न्यायालयाच्या सेटवर अखेरचा हात फिरवणे सुरू. एका बाजूला कंगना दिग्दर्शक व त्याच्या सहायकांच्या गराड्यात बसलेली. तिने न्यायालयात प्रवेश कसा करायचा यावर साऱ्यांचा खल सुरू. मग ठरते. तिने ट्रॉलीवर लावलेल्या घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन मणिकर्णिकाच्या वेशात जायचे. न्यायाधीशाच्या भूमिकेत असलेला अभिनेता खुर्चीत स्थानापन्न झाल्याबरोबर कंगना तलवार उगारत सेटवर जाते. ती काही बोलायच्या आधीच खास या सेटवर हजर असलेला कायदेशीर सल्लागार ओरडतो, ‘अरे थांबवा हे. खटला मानहानीचा आहे. ही तलवार बघून प्राणहानीचा गुन्हा दाखल होईल. शिवाय घोड्यावर बसल्या म्हणून ‘पेटा’समर्थक रान उठवील. घोडा, तलवार लाकडी असेलही पण खऱ्या न्यायालयात हे चालणारे नाही.’ हे मत ऐकताच सारे स्तब्ध. कंगना पुन्हा सेटच्या बाजूला जाते व नव्याने विचारविनिमय सुरू होतो. ठरले. कंगनाने थलायवीच्या वेशात जायचे. लगेच लांब पदराची साडी. त्याच्या आत घालण्यासाठी चिलखत मागवले जाते. पुन्हा तयार झालेली कंगना आरोपीच्या कठड्यात उभी राहिल्याबरोबर ‘माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवातच सभागृहातील मानहानीने झाली’ असे म्हणताच पुन्हा सल्लागार व तिची फिटनेस ट्रेनर ‘कट’ म्हणून ओरडतात. ‘अहो, तुमचा वेश वेगळा असला तरी तिथे तुम्हाला स्वत:विषयी बोलायचे आहे, जयललिताविषयी नाही,’ असे सल्लागार सांगतो तर ‘खऱ्या न्यायालयात कंगनाने एवढे लठ्ठ दिसणे योग्य नाही,’ असे ट्रेनर म्हणते. मग पुन्हा ती खाली उतरते. सरावात एवढे अडथळे असे म्हणत ती साऱ्यांवर चिडते. शेवटी दिग्दर्शक, सल्लागार व ट्रेनर आपसात चर्चा करून निर्णय घेतात. कंगनाला घरंदाज स्त्रीच्या वेशात पाठवायचे, मग नव्या वेशभूषेत ती सेटवर जाते. उंच डायसवर असलेल्या खुर्चीकडे बघून ‘मी कंगना, वाय प्लस’ असे म्हणताच दिग्दर्शक ‘कट’ म्हणतो. ‘हे वाय प्लस काय’ असे विचारताच हसत ती म्हणते, ‘आजकाल मला नावासोबत सुरक्षेची श्रेणी सांगायची सवय लागली आहे.’ ‘तिथे नको’ अशी सूचना दिग्दर्शकाने करताच ती पुढे बोलू लागते, ‘मी एक स्त्री आहे. या देशात स्त्रियांना मान दिला जात नाही, ती काही बोलली की सारे तुटून पडतात. खटले गुदरतात. देशाच्या प्रगतीत आमचे योगदान अभूतपूर्व आहे. सुलोचनादीदीने दळण दळून मुलांना मोठे केले. निरुपा रायने गवंडी काम करून मुलांना यशाच्या शिखरावर नेले. अशांचा वारसा असलेल्या इंडस्ट्रीतून मी आले. इतिहासातील शूर स्त्रियांची ओळख करून देण्याचे काम मी केले. तरीही जाच मलाच. माझे कुठेही जाणे हे मानधनावर अवलंबून असते हे ठाऊक असूनही हजेरीचा हट्ट तुम्ही का धरता? यावरून तुमचा पूर्वग्रहच दिसतो. त्यामुळे तुम्हालाच बदलले जावे अशी मागणी मी करीत आहे.’ घोकलेली सारी वाक्ये एका दमात बोलून झाल्यावर कंगना थांबते. सारे टाळ्या वाजवतात. मग झालेले चित्रीकरण एकदा न्याहाळल्यावर ‘रशेस’ घेऊन ती थेट वकिलांच्या कार्यालयात जाते.

वकील सारे चित्रीकरण बारकाईने बघून शेवटी खुदकन हसतात. या सेलिब्रेटींच्या केसेस हाताळणे म्हणजे अवघड काम असा विचार त्यांच्या मनात येतो. तो बोलून न दाखवता ते कंगनाला म्हणतात, ‘मॅडम, खऱ्या न्यायालयात तुम्हाला बोलायचेच नाही. तुमच्या वतीने आम्हीच बोलणार. त्यामुळे तुम्ही केवळ उभे राहायचे. बाकी हा न्यायाधीश बदलण्याचा मुद्दा मस्तच. तोच मी मांडेन. तुम्ही फक्त चेहऱ्यावर कोणतेही भाव न ठेवता उभे राहा.’ हे ऐकून चित्रीकरणाचा खर्च वाया गेला असे पुटपुटत हिरमुसलेली कंगना तिथून निघते.