फेऱ्याची कहाणी..

काय सांगू तुला माझी कहाणी. तुला सगळं ठाऊकच असतं. माझ्यामागे कसला फेरा लागलाय तेही माहितीये तुला.

‘काय सांगू तुला माझी कहाणी. तुला सगळं ठाऊकच असतं. माझ्यामागे कसला फेरा लागलाय तेही माहितीये तुला. कुणीतरी म्हणालं तूच कोपला असशील माझ्यावर म्हणून ही वेळ आली आज. तुझ्या पुढय़ात नतमस्तक झालं की तू तारतोस म्हणे. तूच वाचवशील रे बाबा यातून..’ असं मनाशी पुटपुटत त्यानं उंबऱ्याला हात लावत आत प्रवेश केला. हलके हलके चालत तो शिळेपाशी पोहोचला. शिळेसमोर बसकण घालून बसला. ‘काय सांगायचं तुला.. सगळंच जाणतोस. तरी पण सांगावंसं वाटतं. काही म्हणजे काही चूक नव्हती रे माझी. म्हणजे फार मोठी चूक नव्हती रे. आता किरकोळ चुका झाल्या असतील. पण त्या कुणाकडून होत नाहीत. माणसं ना आम्ही. तुझ्यासारखे थोडेच आहोत..’ मनातल्या मनात बोलताना त्याला बाहेर काढलेल्या चपलांची आठवण झाली. पण ती आठवण त्यानं हिकमतीनं दूर सारली. ‘तर मी काय म्हणत होतो.. हा चुकांचं. तर साहेबांनी थेट नोकरीवरून काढलं रे मला. अशी नोकरी गेली एकदम की कसं व्हायचं आमच्यासारख्यांचं. हल्ली नोकरी मिळणं किती कठीण आहे माहितेय ना..’ शिळेशी बोलताना त्याला पुन्हा एकदा चपलांची आठवण झाली. ‘इथे लोकांच्या घरांत चोरी होत नाही म्हणे, पण बाहेर ठेवलेल्या चपला चोरीला जात नसतील ना..’ त्याच्या मनात शंका उभी राहिली. ती त्यानं मोठय़ा प्रयत्नांनी दूर सारली. ‘घरात आणि बँकेत जे थोडेफार पैसे होते त्यावर भागवतोय सध्या. त्यात त्या नोटांचं प्रकरण उद्भवलं. अशा स्थितीत हातातोंडाची गाठ कशी पडणार, ही चिंता आहे. हे सगळं त्या साहेबांमुळे झालं. मला नोकरी मिळू दे आणि त्यांना चांगली अद्दल घडू दे..’ असं पुटपुटत डोळे मिटून त्यानं शिळेसमोर हात जोडले. अन् अचानक मिटल्या डोळ्यांतील अंधारातून धीरगंभीर आवाजातील शब्द त्याच्या कानी पडू लागले. ‘तुझ्याभोवती जो फेरा पडलाय तो माझा नाही.. आमच्या कुणाचाच नाही.. तुझ्याच कर्मफळांचे फेरे आहेत ते. तुमची सवयच आहे असल्या गोष्टींचं खापर आमच्या माथी फोडण्याची. अन् जे झालं त्यात तुझ्या साहेबांना कशाला बोल लावतोस’, असे विचारत तो आवाज मोठा झाला. ‘ते आजवर माझ्या गावात कधीच आले नाहीत. पण तरीही मी त्यांना नीटच ओळखतो. शीक जरा त्या माणसाकडून काहीतरी. इथे माझ्यासमोर बसून बाहेर काढलेल्या चपलांची काळजी करणारा माणूस तू.. तुझं आणखी काय होणार..’ असं म्हणत आवाज टिपेला पोहोचला आणि डोळे मिटले असतानाच त्याला आपल्या पाठीवर कुणीतरी जोरदार धपाटा घातल्याचा भास झाला. त्याने घाबरून खाडकन् डोळे उघडून मागे पाहिलं. मागे कुणीही नव्हतं. त्याने शिळेकडे पाहिलं. ती शून्य नजरेनं त्याच्याकडे बघत होती. आपली पाठ चोळत तोही शिळेकडे शून्य नजरेनं बघत राहिला..

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cyrus mistry visits shirdi shani shingnapur temples

ताज्या बातम्या