आमच्या गल्लीतील दिग्गज व तरुण तडफदार नेते, ज्यांना आम्ही प्रेमादराने भाई म्हणतो, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आम्हांस किंचित आश्चर्याचा धक्काच बसला. गेल्या निवडणुकीत ते माजी नगरसेवक झाले तेव्हापासून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाची टक्केवारी शून्यावर आली होती. आज मात्र त्यांच्या चेहऱ्यावर असे काही हास्य विलसत होते, की कोणास वाटावे, भाईंना झोपुच्या एखाद्या योजनेचे वा किमानपक्षी पेव्हरब्लॉक टाकण्याचे कंत्राट तर मिळाले नाही ना? आम्ही न राहवून त्यांस पुसले, की ‘भाई भाई, तुम्हांस आज का बरे मोद विहरतो चोहीकडे अशी स्थिती झाली आहे?’ त्यावर ते म्हणाले, ‘का नाही होणार खूश? आता आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे.’ तेव्हा आमच्या दोन्ही मेंदूंमध्ये एकसमयावच्छेदेकरून वीज चमकली, की अच्छा, म्हणजे भाईंचे वाल्याचे वाल्मीकीकरण होऊ घातले आहे. आम्ही म्हणालो, ‘म्हणजे अखेर तिकडून बोलावणे आले तर!’ त्यावर भाईंच्या चेहऱ्यावरील आनंदाची टक्केवारी किंचित घटली. ते म्हणाले, ‘नाही म्हणजे अजून नाही आले. परंतु येईल ते. पण आपण खूश आहोत त्याचे कारण वेगळेच आहे.. आपले खूप दिवसांपासूनचे स्वप्न होते. स्वातंत्र्यसैनिक बनण्याचे. पण काय करणार? साईबाबांची मर्जी. आम्ही जन्मलोच उशिरा.’ ‘मग आता जन्मतारखेचा दाखला बदलून आणला काय?’ आम्ही विचारले. तर ते म्हणाले, ‘त्याची काय गरज नाही. आज ना उद्या आपल्याला स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शन मिळणार म्हणजे मिळणार. आता मिसावाल्यांना मिळणार आहे. आपलापण नंबर लागेलच की..’ अच्छा. तर हे असे होते. आणीबाणीत मिसाखाली तुरुंगात गेलेल्यांना निवृत्तिवेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, म्हणून यांच्या तोंडास पाणी सुटले आहे तर? आता यांना कोण सांगणार, की टाडा आणि पोटा या कायद्यांखाली कारावास भोगलेल्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणत नाहीत. त्यासाठी स्वातंत्र्याची किमान दुसरी किंवा तिसरी लढाई लढावी लागते. आणीबाणी ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई तर नक्कीच. आता अशा लढाईत खरे सैनिक असतात, तसे बाजारबुणगेही असतात. काही आत जातात. काही माफी मागून सुटतात. काहीही असो. नंतर ते सगळेच स्वातंत्र्यसैनिक होतात. उद्या आमच्या प. पू. बाबांनाही सलवार-कमिजाचा गनिमी कावा केला म्हणून स्वातंत्र्यवीर ठरवतील लोक. परवा मेणबत्त्या लावणारेही स्वातंत्र्याचे महान शिपाई ठरतील. फार फार तर त्यासाठी नवा इतिहास लिहावा लागेल. पण मग.. मग अशाने आमच्या भाईंनासुद्धा संधी आहे की काय? नुसत्या विचारांनी आम्हांस कसनुसे झाले. भाई म्हणाले, ‘काय हो काय झाले?’ आता त्यांना काय सांगणार, की स्वातंत्र्याचे संदर्भच सारे उलटेपालटे झाले..?!