कोल्हेकुई

केंद्रातील मंत्र्याच्या कणकवलीतील घराचे प्रांगण – तिथे जमलेले कार्यकर्ते तावातावाने बोलत होते.

पूर्वार्ध – उद्घाटन कार्यक्रमानंतरचा आठवडा अस्वस्थतेत घालवल्यानंतर कुत्रा, डुक्कर व हरीण चिपीच्या बाजूला असलेल्या जंगलात जमले होते. कुत्रा म्हणाला, ‘काय वाभाडे काढत होते त्या दिवशी एकमेकांचे. नखे उगारण्याचे काम खरे तर आपले, पण जमलेले सारेच बोचकारे काढण्यात मग्न होते. या हजार एकराच्या प्रकल्पामुळे आपण विस्थापित झालो त्याचे कुणालाच सोयरसुतक नाही.’ त्वेषाने डुक्कर म्हणाले, ‘यांना धडा शिकवायला हवा.’ हरणाने यावर शिंगासकट मान डोलावली. ‘पण पुढाकार घेणार कोण? आपले धावपट्टीवर जात अडथळा निर्माण करणे नित्याचेच. या कामासाठी कुणीतरी वेगळा हवा. ज्यातून गोंधळ तर उडेलच पण संशयही निर्माण होईल.’ बऱ्याच मंथनानंतर कोल्ह्याला गळ घालण्यावर तिघांचे एकमत झाले. धूर्त व चलाख कोल्ह्याने शांतपणे प्रस्ताव ऐकून घेतला खरा, पण प्रारंभी त्यांना दाद दिली नाही. ‘विमानाची घरघर माझ्या कानाला सहन होत नाही. मी दिसल्यावरही पायलटने विमान उतरवून मला चिरडून टाकले तर काय? मला या कामाचा अनुभव नाही. मी उगाच शहीद का व्हायचे?’ असल्या सबबी व प्रश्न त्याने उपस्थित केले. मग तिघांनीही त्याची समजूत काढली. तुला चिरडण्याचा प्रश्नच नाही. तू दिसलास की विमान हवेत लटकलेच म्हणून समज. तसेही वैमानिक प्राणीप्रेमी असतात हा आमचा अनुभव आहे. तेव्हा तू अखिल प्राणीविश्वाच्या हितासाठी हे करच, या शब्दांत गळ घातल्यावर कोल्हा धावपट्टीवर जाण्यास तयार झाला.

उत्तरार्ध (१ )- केंद्रातील मंत्र्याच्या कणकवलीतील घराचे प्रांगण – तिथे जमलेले कार्यकर्ते तावातावाने बोलत होते. ‘हे नक्कीच त्या बेगडी हिंदुत्ववादी पक्षातील लोकांचे कृत्य असणार!  साहेबांच्या प्रयत्नाने चिपी सुरू झाले हे अजूनही सहनच होत नाही त्यांना. मुद्दाम कोल्ह्याला सोडले गेले. काहीही करून हवाई सेवा बंद पाडायची आहे यांना. ते काही नाही, या धूर्त चालीला चोख उत्तर द्यायलाच हवे. त्या कोकणी कथेप्रमाणे कुणा माणसाच्या एका हातात पिंड व दुसऱ्या हातात सोटा देऊन धावपट्टीवर ठेवायला हवे. साहेब परवानगी काढून देतील. मग बघा तो कोल्हा कसा मुंबईला पळतो ते. एका सोट्यात कोल्हेकुई शांत! हे ऐकताच साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. मग गस्तीसाठी कोण तयार होऊ शकेल याची चाचपणी सुरू झाली. सोटा व पिंड घेऊन धावपट्टीवर झोपल्यासारखे नाटक करायला प्रारंभी कुणी तयार होईना. हा साहेबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे म्हटल्यावर कसेबसे दोघे तयार झाले.

उत्तरार्ध (२ )- कणकवलीच्याच दुसऱ्या वाडीत काही सैनिक जमले होते. घडल्या प्रकाराने त्यातले काही संतप्त झाले होते. अरे भ्याडासारखा कोल्ह्याला कशाला समोर करतो? हिंमत असेल तर थेट मैदानात यायचं ना! स्वत: अपशकून करायचा  नि खापर आपल्यावर फोडायचे ही जुनीच पद्धत आहे या माणसाची. त्या दिवशी कार्यक्रमातून दिलेला घाव वर्मी लागला दिसतो याच्या. आता हाच सोटा व पिंड घेतलेला माणूस धावपट्टीवर उभा करेल व विरोधकांचा धूर्त डाव कोल्ह्याला पळवून उधळून लावला अशी आवई उठवेल. अरे वाघ आहोत आम्ही वाघ, कोल्ह्याला भितो असे वाटले की काय? ते काही नाही. मुंबईहून लगेच निर्देश घ्यायला हवे. याला धडा शिकवायलाच हवा. या संतप्त चर्चेनंतर लगेच मुंबईच्या भवनातले फोन खणखणू लागले.

***

उपसंहार – ‘आली ना मजा, आता बसा म्हणावे भांडत. प्राण्यांना गृहीत धरता काय?’ असे कुत्र्याने म्हणताच डुक्कर, हरीण व कोल्हा एकमेकांना टाळी देत मोठ्याने हसू लागले. तेवढ्यात पिंजरे घेऊन येणारा ट्रॅक्टर दिसताच चौघांनीही धूम ठोकली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dogs pigs and deer were gathered in the forest next to chipi akp

Next Story
सामाजिक जबाबदार गोखले!
ताज्या बातम्या