अमेरिका हा डोनाल्ड ट्रम्प यांचा देश आहे आणि त्यांना भारताच्या सध्याच्या राजकीय परंपरांचा अभिमान आहे. विशेष म्हणजे त्या परंपरांचा पाईक होण्याची त्यांची सदिच्छा असून, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयांतून ही सदिच्छा लख्खपणे झळकताना दिसत आहे. तमाम भारतीयांसाठी तर ही अभिमानास्पद बाब आहेच, परंतु भारतीयांहून अधिक भारतीय असलेल्या असंख्य अमेरिकी-भारतीयांसाठी तर ती दुप्पट गर्वाची गोष्ट आहे. ट्रम्प यांना भारताबद्दल तसे पहिल्यापासूनच गगनचुंबी प्रेम. मुंबईतील ट्रम्प टॉवर हा त्या प्रेमाचा जणू ताजमहालच. अनेक भारतीयांनाही त्यांची ओढ आहे. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रांतील दूत म्हणून ट्रम्प यांनी मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या निक्की हेली यांची निवड केली. यातून ही ओढच प्रतीत होते. या निक्की हेली मूळच्या भारतीय असल्याने त्या संयुक्त राष्ट्रांत भारतासाठी नक्कीच काम करतील. अमेरिकेतील अनेक भारतीय प्रजासत्ताकवाद्यांना – रिपब्लिकनांना – तसे वाटत आहे. तेव्हा काटकसरीचा उपाय म्हणून भारताने संयुक्त राष्ट्रांतील आपल्या दूतास बोलावून घ्यावे हे उत्तम. तर एकंदरच ट्रम्प यांच्यासमोर आदर्श आहे तो सध्याच्या भारतीय राजकीय परंपरांचा. अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने ते या परंपरांचा कित्ता गिरवताना दिसत आहेत. याची किती उदाहरणे सांगावीत? त्यांनी केलेली बेट्सी डेव्होस यांची निवड पाहा. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी या बाईंची नियुक्ती केली आहे. त्या कोटय़धीश शिक्षणसेविका. शिक्षण चालवावे ते खासगी कंपन्यांनीच ही त्यांची भूमिका. या बाईंकडे पदवी असली, तरी शालेय व्यवस्थापनाचा काडीमात्र अनुभव नाही. ही पात्रता लक्षात घेऊन ट्रम्प यांनी त्यांना शिक्षणमंत्री केले. असेच परंपरापालनाचे उदाहरण म्हणजे हिलरी क्लिंटन यांच्याबाबतचे त्यांचे ताजे वक्तव्य. हिलरींना – लॉक हर अप – तुरुंगात डांबा ही ट्रम्प यांची निवडणूक प्रचारातील घोषणा. पण निवडून येताच त्यांनी जाहीर केले, आपली तशी काही योजना नाही. हिलरींवर आपण खटला भरणार नाही. भारतीय परंपरेत एवढे स्पष्ट बोलणे बसत नाही. पण ट्रम्प मात्र बोलले. त्यातून त्यांची सहृदयता, क्षमाशीलताच प्रकट झाली. भारतीय परंपरा याहून वेगळी काय आहे? माध्यमांबाबतही तेच. एकतर त्यांनी अमेरिकी परंपरेनुसार निवडून आल्यानंतर पत्रकार परिषद घेतलीच नाही. काही पत्रकारांना ते भेटले मात्र. परंतु तेथेही त्यांनी त्या ‘अप्रामाणिक खोटारडय़ां’ना चांगलेच झापले. नंतर भलेही ते न्यू यॉर्क टाइम्सच्या कचेरीत जाऊन त्यांच्याशी गोडगोड बोलले. परंतु आधी त्यांनी सर्व बोरूबहाद्दरांना त्यांची किंमत दाखवून दिली. ते गरजेचेच व परंपरेस धरूनच होते. यापुढेही ते अशाच प्रकारे सध्याच्या भारतीय राजकीय परंपरांचा कित्ता गिरवतील यात शंका नाही. भारतातील लोकशाही ट्रम्प यांच्यासारख्यांचा आदर्श बनल्याचे पाहून येथील टीकाकारांची तोंडे नक्कीच बंद होतील, यात तर अजिबातच शंका नाही.