डोनाल्डजी, तुम आगे बढो..

अमेरिकेच्या निवडणुकीत पुतिन यांच्या रशियाने डोनाल्डजींच्या बाजूने काम केले

फिनलंडमधील हेलसिंकी येथे सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील शिखर बैठक सुरू झाली. या बैठकीत वादग्रस्त विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मंडळी, आहात कुठे? गेल्या पाच हजार वर्षांच्या (मागची ७० वर्षे धरून) इतिहासात जे घडले नाही, पं. नेहरू नावाचे एक पंतप्रधान होऊन गेले म्हणे येथे, त्यांनाही जे करता आले नाही, ते २०१९च्या जानुआरीत आपल्या भारतवर्षांत होणार आहे. त्या मासोत्तमात महान हिंदुत्ववादसहायक मा. श्री. डोनाल्डजी ट्रम्प हे भारतवर्षांत येणार आहेत. अशा वेळी आपल्या अशा या लाडक्या नेत्याचे हात बळकट करणे हे समस्त भारतवासीयांचे कर्तव्यच ठरते. आज तर त्याची प्रचंड आवश्यकता आहे. याचे कारण म्हणजे डोनाल्डजींवर होत असलेली चिखलफेक. राष्ट्रासाठी दिवसाचे २४ तास खपणारा, भल्या पहाटे तीन-तीन वाजता उठून ट्विटरवर राष्ट्रहिताकरिता ट्विप्पण्या करणारा हा नेता, आज त्यांच्याच देशात राष्ट्रद्रोही ठरविला जात आहे. सीआयएचे माजी अध्यक्ष जॉन ब्रेनन डोनाल्डजींना सेडिशनचे गुन्हेगार ठरवीत आहेत. आणि अमेरिकी जनता.. तेथील ते डेमोक्रॅटिक तर असेच म्हणणार, पण काही रिपब्लिकनही ब्रेनन यांच्या सुरात सूर मिसळत आहेत. जनतेचे एक वेळ समजून घेता येईल. दोन चार फेक न्यूजचे तुकडे फेकले की जनता जाग्यावर येईल. जल्पकसेना अंगावर सोडून टीकाकारांना गप्प करता येईल. परंतु अमेरिकी माध्यमांचे काय? तेथे रिपब्लिकन वाहिन्यांची तशी कमतरता नाही. पण त्यांनीही डोनाल्डजींच्या पाठीत खंजीर खुपसावा? अशा प्रकारे वृत्तवाहिन्याही जनतेचीच भाषा बोलू लागल्या, तर लोकशाहीचे कसे होणार? तेथील लोकशाही व्यवस्थेबाबत तर काही बोलूच नका. डोनाल्डजींसारख्या अवतारी प्रधानपुरुषाच्या विरोधात त्या व्यवस्था जातात तरी कशा? आहे का डोनाल्डजींना दुसरा पर्याय? तरीही एफबीआयसारखी यंत्रणा त्यांच्या निकटवर्तीयांना पकडते. न्यायालय त्यांच्यावर खटले चालविते. अशा नकारात्मक वातावरणात डोनाल्डजींनी कारभार करायचा तरी कसा? तरीही ते पाय रोवून संकटांचा सामना करीत आहेत. अमेरिकेची जागतिक प्रतिमा आज त्यांच्यामुळेच सुधारली आहे. शांततेचे प्रतीक म्हणून आजवर कबुतरांकडे पाहिले जायचे. आज तो मान डोनाल्डजींना मिळाला आहे. आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर त्यांनी अमेरिका आणि रशिया यांच्यातील वैरभाव संपवून शीतयुद्धाला शवपेटिका दाखविली आहे. तर त्यावरून त्यांना कोंडीत पकडण्याचा दुष्टपणा विरोधक दाखवीत आहेत. या विरोधकांचे म्हणणे काय, की डोनाल्डजींनी पुतीन यांच्यापुढे शरणागती पत्करली. हेलसिंकी परिषदेत जाऊन अमेरिकेचे नाक कापले. आम्हांस खरोखरच हे समजत नाही की, परदेशात जाऊन आपल्या देशातील व्यवस्थांचे वाभाडे काढले, आपला देश कसा भ्रष्ट होता, तेथे राहण्याची लोकांस कशी लाज वाटत असे हे सत्य सांगितले, तर ते देशाचे नाक कापणे कसे ठरते? अनेक थोर मुत्सद्दय़ांनी असेच केले आहे. डोनाल्डजींनी काही जगावेगळे केले नाही. अमेरिकेच्या निवडणुकीत पुतिन यांच्या रशियाने डोनाल्डजींच्या बाजूने काम केले. हिलरींच्या विरोधात छुपा परंतु प्रभावी प्रचार केला, असा फालतू आरोप केला जात आहे. ज्यांनी प्राणपणाने डोनाल्डजींना साथ द्यायची त्या गुप्तचर संस्थाही ते आरोप खरे असल्याचे सांगत आहेत. अशा परिस्थितीत डोनाल्डजींनी ‘त्या संस्था चुकीचे सांगत आहेत आणि पुतिन हेच सत्यवचनी आहेत’ असे सांगितले तर त्यात देशद्रोह तो काय? खुद्द पुतिन यांनीच त्यांना तसे काही नसल्याचे सांगितल्यावर बाकी उरलेच काय? परंतु हे अमेरिकेतील जनतेला कोण सांगणार? खरोखरच त्यांना खरी लोकशाही कशी असते हे सांगण्याची आवश्यकता आहे. तोवर डोनाल्डजी तुम आगे बढो.. असे आपणास तरी म्हणावेच लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Donald trump meets vladimir putin in helsinki