‘नोकरी नाही? चिंता करू नका. स्वतंत्र व्यवसाय सुरू करा आणि महिना हजारो रुपये कमवा!’ अशी एखादी जाहिरात रेल्वेच्या डब्यापासून वर्तमानपत्राच्या रकान्यापर्यंत कुठे, कधी तरी दिसली तर गरजू तरुणाला त्याची भुरळ पडेल की नाही?.. लगेच तो त्या जाहिरातीवरील फोन नंबर टिपून घेईल आणि काही दिवसांतच स्वत:च्या धंद्यात बस्तानही बसवेल. या देशात गळ्यात स्टेथोस्कोप अडकवला की डॉक्टर होता येते, बोगस डॉक्टरेटचे खोटे प्रमाणपत्र दाखविले की प्राचार्य होता येते, औषधाच्या दुकानात नोकरी केली की फार्मासिस्टही होता येते आणि अंधाऱ्या खोलीत एखादी धुनी पेटवून चंदन-धुपाचा धूर पसरविला की जनतेचा बाबा-बुवाही होता येते. जगातील सर्वाधिक तरुण भारतात आहेत, हे आकडेवारीनिशी सिद्ध झाल्यावर आणि लाखो तरुण आजही बेरोजगार आहेत, हे स्पष्ट झाल्यावर स्वतंत्र व्यवसायाच्या अशा संधी आपोआपच दारासमोर उभ्या राहणार आणि त्याला तरुणाईची भुरळ पडणार यात गैर काय?.. अशा यशस्वी व्यवसायांमध्ये आता वकिलांची भर पडली आहे. त्यासाठी तुमच्याकडे कायद्याची पदवी असायला हवी असे नाही, किंवा दररोज बदलणाऱ्या कायदेकानूंचा अभ्यास असायला हवा असेही नाही. तरीही एक अट आहे. काळा कोट मात्र तुमच्याकडे असायलाच हवा. काळा कोट चढवून कोर्टाच्या आवारात सराइतासारखे वावरण्याएवढा विश्वास तुमच्याकडे असेल, तर तुम्ही बेलाशक वकिलीचा व्यवसाय सुरू करू शकता. स्वतंत्र व्यवसायाच्या या सोप्या मार्गावर आजवर अनेकांनी यशाची शिखरेदेखील गाठली असावीत, असा अंदाज आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या एका पाहणीतच हे स्पष्ट झाल्याने, देशाच्या वकिली पेशात बनावटांचा सुळसुळाट झाल्याच्या बातमीला वेगळ्या पुराव्याची गरजच नाही. तसेही, खोटय़ाचे खरे करण्याचा व्यवसाय अशीही या पेशाची एक ख्याती आहेच. यात पारंगत असणाऱ्या कोणासही वकील होता येते, असाच बहुधा या पेशाचा पायंडा असावा. देशभरातील तब्बल ४५ टक्के वकील खोटेच असावेत, असे बार कौन्सिलच्या निदर्शनास आले, तेही दोन वर्षे चाललेल्या तपासणीनंतर. कोर्टाच्या आवारात तुमच्यासमोर आलेल्या काळ्या कोटधारी व्यक्तीला तुमचे वकीलपत्र देताना विचारच करायला लागेल. जवळपास दर दोन काळ्या कोटधारींपैकी एक जण खोटा निघत असेल, तर न्यायदानाच्या या पवित्र व्यवसायात शिरलेल्या या बनावटांना केवळ गरजवंत म्हणून माफ करून चालणार नाही. वकिली ही समाजसेवा किंवा राजकारणाचे मैदान नाही. समाजसेवेच्या किंवा राजकारणाच्या क्षेत्रात, खोटय़ाचेच खरे करण्याचे कसब हीच पात्रता मानली जात असली, तरी पांढरे कपडे घालून वावरताना टोपीखालच्या डोक्यातील शिक्षणाचे फारसे महत्त्व नसते. पण पांढऱ्या कपडय़ातील राजकारण्यांनी बनविलेल्या कायद्यांचा काळ्या कोटधारींकडून असा काळा कीस पाडला जात असेल, तर खरे तरी काय उरले? कोर्टाच्या आवारातील काळ्या कोटातील प्रत्येकाला वकील समजू नये, एवढा शहाणपणा अशिलांनीच शिकायला हवा, हेच खरे..