साहसाला निर्बंध

तेवढ्यात तो उठून बसलाच. कोणतेही हाड मोडलेले नाही हे दिसल्यावर काकू कडाडल्या.

‘कडकडकड’ असा मोठा आवाज व पाठोपाठ ‘आई गं’ अशी किंकाळी ऐकून काकू व तात्या धावतच घरातून बाहेर आले. बघतात तर काय, अंगणातल्या वडाची एक मोठी फांदी तुटून खाली पडलेली व त्याच्या बाजूला बंड्या निपचित पडलेला. लगेच आजूबाजूचे लोक धावले. बंड्याला उचलून घरात आणले. शेजारचे नाना मात्र रागाने बघत होते. त्यांच्याकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकत काकूंनी मुलाला चाचपले. तेवढ्यात तो उठून बसलाच. कोणतेही हाड मोडलेले नाही हे दिसल्यावर काकू कडाडल्या. ‘तरी मी दहांदा सांगत होते. पेपरातल्या बातम्या वाचून वेडेपणा करू नको म्हणून. म्हणे साहसी पर्यटन! अरे, या काय अंगणात करायच्या गोष्टी आहेत का? भोग आता कर्माची फळं’. काकूंचा दांडपट्टा थांबणार नाही हे लक्षात येताच शेजारी एकेक करून सटकले. थोडा हुरूप आल्यावर खरचटलेल्या ठिकाणी मलम लावत बंड्या बोलता झाला. ‘मग मी तरी काय करू? दीड वर्ष होत आले घरात बसून. साहसी खेळांना मान्यता मिळाल्याचे वाचल्यावर सारे साहित्य भरून लोणावळ्याला गेलो तर तिथून पोलिसांनी हाकलून लावले. मग माथेरानला जायला निघालो तर खालीच अडवले. किमान मलंगगडाचा ट्रेक करावा म्हणून गेलो तर तिथेही पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद फुकटात मिळाला. अहो, सरकारच्याच धोरणाचा पुरस्कार करायला निघालो असे सांगून बघितले तर ‘जास्त शानपणा नाय’ असे सांगून परत पाठवले. कदाचित एकटा आहे म्हणून हटकत असतील असे वाटून मित्रांना घेऊन सिंहगडावर गेलो तर तिथेही अडवले. खेळायला बंदी असताना सरकारने धोरण तरी कशाला जाहीर करावे? अलमारीत पडून राहिलेल्या माझ्या ‘हार्नेस’चा कुबट वास यायला लागला. ट्रेकिंगचा रोप, मिटन सारे उंदरांनी कुरतडले. मग घरातल्या वडाच्या झाडावर थोडाफार सराव केला तर बिघडले कुठे?’ बोलताना बंड्याचे फुरफुरते बाहू बघून काकू नरमल्या. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडले तर पालिकेचा कर्मचारी उभा. विनापरवानगीने झाडाची शाखा तोडली म्हणून गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस बघून काकू भडकल्या. ‘हे नक्कीच त्या नानाचे कारस्थान. मोठा आला पर्यावरणप्रेमी. खवचट लेकाचा.’ मग तात्या व बंड्याचे दोन दिवस पालिकेत चकरा मारण्यात गेले. अधिकाऱ्यांची कशीबशी समजूत काढल्यावर प्रकरण निस्तारले पण तोडलेली फांदी उचलून नेण्याचा खर्च पालिकेने वसूल केलाच. काही दिवस शांततेत गेल्यावर बंड्याला स्वस्थ बसवेना. ट्रेकचे, पावसाळी पर्यटनाचे ठिकठिकाणचे व्हिडीओ बघून त्याचे बाहू पुन्हा फुरफुरू लागले. काकू व तात्या त्याला बाहेर जाऊ देईनात! मग त्याने पुन्हा वडाचाच आधार घेतला. घरचे नाही नाही म्हणत असताना त्याचे साहसी खेळ सुरू झाले. कधी टोक गाठणे, तिथून सळसळत्या पानांमधून वाट काढत रोपच्या साहाय्याने खाली उतरणे, पारंब्यांना लटकत लांब झोके घेणे. हळूहळू त्याच्या कसरतीची चर्चा आजूबाजूला पसरू लागली व अनेक मुले त्या बघायला झाडाखाली जमू लागली. या लोकप्रियतेमुळे बंड्या खुशीत होता. एक दिवस त्याचे ‘खेळ’ सुरू असतानाच पोलिसांची गाडी आली. ती पाहताच सारे पळाले. बंड्याला मात्र पोलीस घेऊन गेले. बेकायदा गर्दी जमवली म्हणून बंड्यावर आपत्ती व्यवस्थापन कलमान्वये गुन्हा दाखल केला गेला.

तात्यांनी जामीन भरल्यावर दोघे घरी येताच काकूंचा थयथयाट सुरू झाला. ‘ही नक्कीच त्या नानाची करामत’ असे म्हणत त्यांनी बंड्याने मोठ्या कष्टाने जमवलेले साहसी खेळाचे साहित्य शेजारी नानांच्या अंगणात फेकायला सुरुवात केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Government policy awards trekking plant harness akp

Next Story
अच्छे अर्थशास्त्र..
ताज्या बातम्या