पाहुणेपद

संघटन मंत्र्याच्या या स्पष्टीकरणानंतर कार्यक्रम यादीला अंतिम रूप मिळाले. लगेच ताईंना फोन लावला गेला

दादरच्या पक्ष कार्यालयातील एका कक्षात पाच ‘पुरुष’ पदाधिकारी तातडीने एकत्र जमले होते. पक्षात महिलांना मान देण्यासाठी दिल्लीत सातत्याने प्रयत्न सुरू असताना राज्यातील महिलांना मान मिळत नसल्याबद्दलच्या तक्रारी कशा, असा मुख्यालयातून विचारला गेलेला प्रश्न त्या साऱ्यांच्या मनात घोळत होता. ‘वरून’ विचारल्या गेलेल्या या प्रश्नाला कुणाच्या तक्रारीचा संदर्भ असावा, यावर बरीच चर्चा झाल्यावर साऱ्यांचे लक्ष नवी मुंबईच्या मंदाताईंवर केंद्रित झाले.

ताईंना मान देण्यासाठी तातडीने काहीतरी करायला हवे यावर एकमत झाल्यावर मग ताबडतोब विविध कार्यक्रमांच्या आखणीला वेग आला. कोणत्या सेक्टरमध्ये कुठले कार्यक्रम घ्यायचे यावर विचार सुरू झाला. त्यासाठी स्थानिक पुरुष पदाधिकाऱ्यांशी तातडीने संवाद साधला गेला. सलग आठ दिवसांचे कार्यक्रम ठरल्यावर एक पदाधिकारी म्हणाले, ‘ठरवण्यापूर्वी एकदा ताईंनाही विचारायला हवे’ त्यासरशी इतरांच्या कपाळावर आठय़ा आल्या. त्या बघून सारे काही काळ शांत बसले. मग एक ज्येष्ठ म्हणाले, ‘या सर्व कार्यक्रमांची यादी ताईंना पाठवून आश्चर्याचा धक्का देऊ या’ या कल्पनेला साऱ्यांची दाद मिळाली. तरीही एकाकडून शंका उपस्थित झाली. ‘गणेशदादांच्या उपस्थितीचे काय?’ या प्रश्नावर सारे चमकले. ‘दादा नकोच. ताईंचा खरा राग तर त्यांच्यावरच. मी जिथे जाते तिथे हे मागाहून येतात आणि पक्षच ‘हायजॅक’ करतात अशीच ताईंची तक्रार असते. त्यातूनच हा मानाचा मुद्दा समोर आलाय. तेव्हा हे सर्व कार्यक्रम ताईंच्याच उपस्थितीत करू. दादांना कसे समजवायचे ते बघू नंतर’. संघटन मंत्र्याच्या या स्पष्टीकरणानंतर कार्यक्रम यादीला अंतिम रूप मिळाले. लगेच ताईंना फोन लावला गेला. ताई खूश! मग दुसऱ्या दिवशीपासून कार्यक्रमांचा रतीब सुरू झाला. एका सेक्टरमध्ये आयोजित ‘लिंबूचमचा दौड’ स्पर्धेला ताईंनी कार्यकर्त्यांच्या फौजफाटय़ासह हजेरी लावली. दादा कुठेही दिसत नाहीत, हे बघून त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. मग दुसऱ्या ठिकाणी ‘आंधळी कोशिंबीर’ ही स्पर्धा होती. डोळ्यावर पट्टी बांधलेल्या महिलांचे स्पर्धकांना पकडण्यासाठीचे धावणे बघून उत्साहित झालेल्या ताईंनी महिलांच्या विकासासाठी नवनव्या घोषणा केल्या. एका ठिकाणी ‘संगीतखुर्ची’चा खेळ रंगला. त्यात तर त्यांनी स्वत:ही भाग घेतला. चौथ्या दिवशी महिला पतसंस्थेचे उद्घाटन त्यांच्या हातून थाटात पार पडले. मग प्रशासकीय भवनाजवळ महिला बचत गटाने सुरू केलेल्या झुणका भाकर केंद्राच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. एका सायंकाळी वाशीच्या सभागृहात सौंदर्यवती स्पर्धा आयोजित केली गेली. तिथे झालेल्या तुडुंब गर्दीसमोर ताईंनी जोरदार भाषण ठोकले. त्या गर्दीत त्यांना दादांचे काही समर्थक मलूल चेहरे घेऊन हजर असलेले दिसले. त्यांना बघून त्या आणखी सुखावल्या. मग कोळीनृत्य स्पर्धा झाली. तीसुद्धा महिलांसाठी. हे बघून ताईंच्या एका कार्यकर्तीला संशय आला. ‘सगळे महिलांचेच कार्यक्रम आपल्या वाटय़ाला का?’ या  प्रश्नाने ताई चमकल्या. ‘थांब, उद्याच जाब विचारते’ म्हणत त्या दुसऱ्या दिवशीच्या तयारीला लागल्या.

घडामोडीवर लक्ष ठेवलेल्या दादरच्या कार्यालयाला हे कळताच एका नागरी सहकारी बँकेच्या शाखेचे उद्घाटन ताईंच्या नावावर टाकले गेले. ताई आनंदात होत्या. त्यांनी एका जुन्या मैत्रिणीला, कार्यकर्ते काय काय करतात, हे फोनवर सांगितले. पलीकडून ती म्हणाली, ‘अगं, यातला एक तरी कार्यक्रम तुझे मत घेऊन ठरवला का त्यांनी? नाही ना! तुझे मत विचारात घेणे हाच तुझा मान, नुसते पाहुणेपद उपयोगाचे नाही.’ या वाक्यासरशी ताई भानावर आल्या आणि त्यांनी थेट पक्ष कार्यालयाचा नंबर फिरवला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta satire article on mla manda mhatre remarks on women respect in bjp zws

ताज्या बातम्या