लाडक्यांचे ‘गुणलोट’ क्षेत्र!

गुणवत्ता सध्या प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि गुजरात या लाडक्या राज्यांमध्येच आहे याविषयी इच्छुकांच्या मनात जराही संदेह नव्हता.

सत्ताधारी मंडळींची सध्याची दोन अत्यंत लाडकी राज्ये अर्थातच उत्तर प्रदेश आणि गुजरात! याच दोन राज्यांच्या वाटय़ाला इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधील सर्वात धनाढय़ फ्रँचायझी याव्यात, हा विरोधकांच्या मते दुष्ट योगायोग असेल, पण सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने मणिकांचन आणि दुग्धशर्करा योगच. दोन वाढीव फ्रँचायझींच्या लिलावासाठी मूळ किं मत दोन हजार कोटी रुपये ठरली, तेव्हाच एका धनशक्तिमान विद्यमान    फ्रँचायझी मालकाने गव्हर्निग कौन्सिलकडे गळ घातल्याचे समजते. नवीन फ्रँचायझी मलाच हवी म्हणून स्वारी अडून बसली. दोन हजार कोटी रुपयांची आपल्यासमोर काय मातबरी? पोरांना वर्षांकाठी पॉके टमनी द्यायचो. गुजरात आणि उत्तर प्रदेश ही देशातली ‘अपवर्डली मोबाइल’ राज्ये. या प्रवासात आपली काहीच भूमिका नसावी का, असा त्यांचा प्रश्न. गेला बाजार सध्याची फ्रँचायझी विकू न नवीन घ्यायला हे गृहस्थ तयार होते, म्हणे.

गुजरातेतले आणखी एक प्रथितयश उद्योगपती त्यामुळे अस्वस्थ झाले. इतकी वर्षे यांच्याकडे फ्रँचायझी आहेच ना. आता आम्हाला संधी द्या की, अशी त्यांची तगमग सुरू झाली. नवीन फ्रँचायझी मागणाऱ्या त्या विद्यमान मालकांना हे उद्योगपती म्हणाले, की नवीन वातावरणात आपण (च) सारे काही वाटून घेणारी माणसे. अशा वेळी एक-दुसऱ्याच्या ताटाकडे कशाला पाहायचे? त्याऐवजी भविष्यात दोनच फ्रँचायझी उरतील तेव्हा त्या आपल्याच असतील! चिंता नको. दोनच फ्रँचायझींची ही योजना सुरुवातीच्या त्या उद्योगपतींना मनोमन पटली असावी. कारण त्यांनी नवीन फ्रँचायझीचा आग्रह मागे घेतला. मात्र काहीतरी गफलत झाली आणि प्रथितयश उद्योगपतींच्या हाताला काहीच आले नाही. धनशक्तिमान विद्यमान फ्रँ चायझी मालक त्यामुळे मनोमन खूशच झाले.

धरणांचे पाणलोट क्षेत्र असते, तसेच क्रिके ट गुणवत्ता जेथे विपुल तेथील ‘गुणलोट’ क्षेत्रातील क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये संधी मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये आणि त्यातही लखनऊमध्ये क्रिके ट गुणवत्ता शोधण्यासाठी पथके  पाठवण्याचे ठरले आहे. गुजरातची वेगळीच गोष्ट. या राज्याची गुणवत्ता मुंबई आणि राजस्थान या फ्रँचायझींमध्ये विभागलेली. ती नवीन फ्रँचायझीसाठी पुन्हा माघारी आणली जाणार आहे. नाहीतरी मेलबर्न, मँचेस्टर, माद्रिद, म्युनिक, टोक्यो, लंडन या शहरांच्या दर्जाची, किं बहुना काकणभर सरसच क्रीडासुविधा अहमदाबादमध्ये तयार आहेच. आता क्रिके ट फ्रँ चायझीही आल्यामुळे सारे काही परिपूर्ण झाले आहे.

गुणवत्ता जेथे, तेथेच गुंतवणूक हे दिल्लीत ठरलेलेच आहे. गुणवत्ता सध्या प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि गुजरात या लाडक्या राज्यांमध्येच आहे याविषयी इच्छुकांच्या मनात जराही संदेह नव्हता. तशीही रांची, कटक, गुवाहाटी, धरमशाला ही काय क्रिके ट खेळली जाणारी ठिकाणे म्हणावीत का? रांचीचा धोनी तर वर्षांनुवर्षे चेन्नईत खेळतोय बिचारा.  जाताजाता – गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये क्रिकेट फ्रँचायझी निघू शकते, तर इतर आणखी ठिकाणीही का निघू शकणार नाही याविषयीही समाजमाध्यमांवर चर्चा रंगली होती. उदा. दुबई, अबुधाबी, मस्कट, दोहा, बहामाज, ब्रिटिश व्हर्जिन आयलॅण्ड्स, के मन आयलॅण्ड्स..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta ulta chashma ahmedabad and lucknow two new teams in indian premier league zws

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी