एक तर आपली हिंदीची बोंब. तशीही दिल्ली आपल्याला आवडत नाहीच. तरीही कशाला या समिती अध्यक्षपदाचे लोढणे केंद्राने गळ्यात टाकले कुणास ठाऊक, असा विचार करत दादा अनिच्छेने सकाळी दिल्लीला जाणाऱ्या विमानात बसतात. राखाडी कव्हर घातलेला हिंदी-मराठीचा जाडजूड शब्दकोश त्यांच्या हातात असतो. प्रवासात तो चाळत असतानाच रात्री वहिनींनी सांगितलेले एक वाक्य त्यांना आठवते, ‘बैठकीत बोलताना डोळे मोठे करू नका, कपाळावर आठय़ा चढवू नका.’ लगेच त्यांचा हात कपाळावर जातो. उतरल्याबरोबर त्यांचा ताफा बैठकस्थळी रवाना होतो. आठ राज्यांचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दादांचे प्रास्ताविक सुरू होते. ‘‘साथियो, जीएसटी सिस्टीममेकी गळती रोकने के लिए अपन एकत्र आये है. एक बहोत बडी जबाबदारी सरकारने मेरेकू सोपी है. मै आशा करता हू की तुम सगळे जण इसमे मुझे सहकार्य करेंगे. तर आता मीटिंग शुरू करते है.’’ हे ऐकून दिल्ली, हरियाणा, छत्तीसगडच्या मंत्र्यांना हसू येते पण मुखपट्टीमुळे ते कुणाला दिसत नाही. मग खात्याचे सचिव उठून अस्खलित इंग्रजीत समिती स्थापनेचा उद्देश सांगू लागतात तसे दादा त्यांच्यावर डाफरतात, ‘हिंदी मे कहो’. त्यासरशी तमिळनाडूच्या मंत्र्यांचा चेहरा पडतो. दादांच्या संतापाविषयी ऐकून असलेले सचिव मग निमूटपणे हिंदीत सुरू होतात, ‘देश मे कुछ उत्पादने ऐसे है, जिसमे सबसे जादा करचोरी होती है..’ हे ऐकताच दादा सहजपणे बोलून जातात, ‘कोणते?’ हा शब्द कुणालाच न समजल्याने काही काळ सारे एकमेकांकडे पाहू लागतात. चूक लक्षात येताच दादा ‘कौनसे’ असे म्हणतात. मग सचिव बोलू लागतात ‘टेक्सटाइल, प्लास्टिक, फ्लोअर टाइल्स, पानमसाला, टोबॅको, बीटलनट, कॅरमसीड्स’ हे ऐकताच दादाचा पारा नेहमीप्रमाणे चढतो. ‘अहो, हिंदी मे बोलो ना’. मग सचिव एकेका शब्दाचे हिंदीकरण करू लागतात व कॅरमसीड्सचा अनुवाद अजवाइन असा करताच दादा पुन्हा रागाने त्याच्याकडे बघतात. ‘पुन्हा इंग्रजी. हे काय लावले तुम्ही, ही मंत्र्यांची बैठक आहे ठाऊक नाही का तुम्हाला? देशाचे प्रमुख हिंदीचा आग्रह धरतात आणि तुम्ही?’ केंद्रीय मंत्र्यांच्या संगतीत राहून इंग्रजीची सवय लागलेल्या सचिवाला काय करावे हेच कळत नाही. मनातल्या रागावर नियंत्रण ठेवत ते म्हणतात, ‘सर, अजवाइन हिंदी शब्द है.’ आता फजिती होणार हे लक्षात येताच दादांचा सहायक त्यांच्या कानात कुजबुजतो, ‘अजवाइन म्हणजे ओवा.’ हे ऐकताच दादा शांत होतात. ‘अच्छा ठीक है, समोर बताओ’ सचिव कसेबसे आपले म्हणणे पुरे करतात. मग एकेक मंत्री गळती रोखण्यासाठी काय काय करता येऊ शकते हे सांगू लागतात. तमिळनाडू, आंध्र व आसामचे मंत्री इंग्रजीतच बोलू लागल्याबरोबर दादाचा चेहरा त्रासिक होतो तर सचिवाचा उजळतो. ही मुंबईतली नाही तर दिल्लीतील बैठक आहे याची पुन्हा जाणीव होताच दादा बैठकीतले वातावरण हलकेफुलके करण्यासाठी पुढाकार घेतात. ‘हमारे एक सोबती थे. आबा करके. बहोत तंबाखू खाते थे. उनकी सवय छुटने के लिए मैने सुगंधित पानमसाला व तंबाखू पे बॅनही लगा दिया.’ हे ऐकताच दक्षिण व पूर्वेकडले मंत्री सोडून बाकी सारे हसतात. मग बैठकीवर नियंत्रण मिळवल्याच्या थाटात दादा चोरी रोखण्यासाठी एकेक उपाययोजना सांगू लागतात. यावर पुढच्या बैठकीत विचार करू असे ठरताच सारे उठतात. खुशीत असलेले दादा सदनाकडे जाताना पुढच्या बैठकीला यायचेच आहे हे लक्षात ठेव असे निर्देश सहायकाला देतात, तर दुसरीकडे बाकीचे मंत्री व सचिव केंद्रीय मंत्र्याकडे जाऊन आग्रही मागणी करू लागतात, ‘पुढच्या वेळी दुभाषा ठेवा, पण दादांना मराठीतच बोलू द्या!’