भोपाळच्या भाच्यांना भोपळाच?

लोककल्याण मार्गावरच्या सातव्या निवासस्थानातून मामाजी कपाळावरचा घाम पुसतच बाहेर पडले

भोपाळच्या भाच्यांना भोपळाच?
संग्रहित छायाचित्र

लोककल्याण मार्गावरच्या सातव्या निवासस्थानातून मामाजी कपाळावरचा घाम पुसतच बाहेर पडले. खरे तर रिकाम्या हाताने भोपाळला परतायचे त्यांच्या जिवावर आले होते, पण जाण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. २०१४च्या आधी याच निवासस्थानात राहण्याची स्वप्ने बघून आपण चूक तर केली नाही ना अशी शंका त्यांच्या मनाला सतत कुरतडत होती. इतकी वर्षे सत्ता भोगली; पण असा ‘इंदिरा पर्वाची’ आठवण करून देणारा त्रास कधी झाला नाही. आपण म्हणू त्याला उमेदवारी, म्हणू तोच मंत्री असे समीकरण दीर्घकाळ चालले. पण, एका निकालाने घात केला. आता तिकडे भोपाळात आस लावून बसलेल्या एकेका भाच्यांना काय उत्तर द्यायचे या प्रश्नाने त्यांच्या मनात काहूर माजवले. दिल्ली तशीही दमट, त्यात या निर्थक चर्चा व श्रेष्ठींच्या अडवणुकीने अंग पार घामेजून गेलेले. मध्य प्रदेश भवनावर जाऊन निवांत स्नान करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पण लगेच त्यांनी तो सोडून दिला. सहा वर्षांपूर्वी आपण अडवाणींना भोपाळहून लढण्याची ऑफर दिली म्हणून तर आता अडवणूक केली जात नसेल ना, अशी शंका त्यांच्या मनाला चाटून गेली. शेवटी नियती निष्ठुर असते. ती कधी बदला घेईल हे सांगता येत नाही हेच खरे! आता ११ जागा त्या ग्वाल्हेरच्या राजपुत्राच्या पारडय़ात टाकायच्या हा अन्याय नाही का? म्हणे शब्द दिलाय. राजकारणात अशी देवाणघेवाण चालतच असते. आम्हीही दिला शब्द जुन्या विश्वासूंना. त्यातल्या एकेका नावावर हे फुली मारत सुटलेले. घरच्यांना बाहेर ठेवायचे व बाहेरच्यांना आत घ्यायचे याने पक्ष कसा वाढणार? हे सारे जीव तोडून सांगितले तरी दोघे ऐकायलाच तयार नाहीत. तुम्हाला पदावर बसवायचे होते म्हणून टाळेबंदी उशिरा लावली अशी उपकारयुक्त आठवण वारंवार करून देण्याचे कारण काय? यांना काही तरी निमित्त काढत माझे पंख कापायचे आहेत हेच सत्य. म्हणूनच पहिल्या पाच मंत्र्यांत माझ्या एकाही भाच्याची वर्णी लागू दिली नाही. आताही निर्दयपणे नाव कापण्याचा सिलसिला सुरूच. ठीक आहे, सध्या माझी बाजू पडती आहे, पण संधी मिळताच मामाजी काय चीज असतो हे यांना दाखवणारच. एकदा सूत्रे दिल्यावर राज्य तरी मनाप्रमाणे चालवू द्यावे ना! तिथेही खोडा घालतात. एकेका पदासाठी एवढी चर्चा व घमासान आधी काँग्रेसमध्ये व्हायचे. आपलाही पक्ष त्याच मार्गाने चालला की काय? असा विचार मनात येताच मामाजी चपापले. राज्यसभेच्या वेळी एका आमदाराचे मत फुटले म्हणून तर आपल्याकडे संशयाने बघत नसतील? जे झाले ते चुकीने झाले हे यांनी लक्षात घ्यायला हवे. दोन दिवस ‘माथापच्ची’ करून निर्णयाविना परत जायचे म्हणजे बेअब्रूच की! शेवटी करणार काय, आला दिवस ढकलायचा हेच काम उरलेय या पर्वात! आता आधी त्या बेनचा शपथविधी उरकावा लागेल. अगदी पद्धतशीरपणे त्यांना लखनौला पाठवले होते.. पण काळाचा महिमा अगाध. त्या पुन्हा येत आहेत. आता सहन करण्याशिवाय पर्याय नाही. खूप विचार करून शिवराजजींचे डोके जरा जास्तच शिणले. ताण हलका करण्यासाठी अडवाणींच्या घराकडे जावे काय, असा प्रश्न त्यांच्या मनात तरळला, पण भीतीपोटी त्यांनी तो पोटातच गिळला व विमानतळाकडे रवाना झाले.

मराठीतील सर्व उलटा चष्मा ( Ulata-chashma ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सोंगटय़ांचा पट..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी