‘हवेत’ स्वयंसेवक!

सायबर स्वयंसेवक’ असे या पदाचे नाव असून यासाठी शैक्षणिक पात्रता गौण समजली जाईल.

(संग्रहित छायाचित्र)
सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!! राष्ट्रप्रेमी बेरोजगारांसाठी शासनमान्य स्वयंसेवक होण्याची सुवर्णसंधी. सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेली ‘राष्ट्रसेवा’ करण्यासाठी रोजगाराचे हे नवे दालन खुले करण्याचा निर्णय झाला असून इच्छुकांकडून यासाठी लवकरच अर्ज मागवले जाणार आहेत. ‘सायबर स्वयंसेवक’ असे या पदाचे नाव असून यासाठी शैक्षणिक पात्रता गौण समजली जाईल. याचा अर्थ उमेदवार अशिक्षित हवा असा नाही तर शिक्षणासोबतच त्याच्यात यंत्रणेला अपेक्षित असलेले इतर ज्ञान व कौशल्य ठासून भरलेले असणे अपेक्षित आहे. जसे की, स्वयंसेवकाला सत्ताधाऱ्यांनी अधिकृत मोहोर उमटवलेलाच इतिहास पाठ असायला हवा. या इतिहासावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची त्याची तयारी हवी. त्याच इतिहासातील अस्मितांची प्रतीके त्याला तोंडपाठ हवी. त्यामुळे सायबरविश्वात वावरताना कुणीही त्यात थोडी जरी खोडतोड केली तर त्याच्या पटकन लक्षात येईल व तो तातडीने सेलकडे तक्रार करू शकेल. सत्ताधीशांचे लक्ष सध्या पूर्वेकडे असल्याने स्वयंसेवकाला रोज सकाळी सूर्यनमस्कार घातल्यावर पूर्वेकडे तोंड करून प्रार्थना म्हणण्याची सवय असायला हवी. देशातील बहुसंख्याकांवर होणाऱ्या लहानमोठय़ा अन्याय, अत्याचाराची माहिती त्याला हवी. त्यामुळे विरोधकांना कायद्याच्या कचाटय़ात अडकवणे सोपे जाईल. स्वयंसेवक हा उत्तम प्रतीचा घुसखोर (हॅकर) असायला हवा. शत्रूच्या पोटात शिरून माहिती काढण्याचे व ती संबंधित यंत्रणेला पुरवण्याचे त्याचे कसब वादातीत असावे. स्वयंसेवकाला जल्पकाचे काम करायचे नाही. वादविवाद घालणे कटाक्षाने टाळण्याचे कौशल्य त्याच्यात हवे. सायबरविश्वात अलवारपणे वावरत माहिती गोळा करणे हेच त्याचे काम असेल. हे एकप्रकारचे पोलीसकार्य आहे. कोणताही गणवेश परिधान न करता व हाती शस्त्र न घेता केलेले. तीक्ष्ण नजर हेच स्वयंसेवकांचे शस्त्र. आधी गुप्तहेर म्हणून काम केलेले असेल तर या भरतीत प्राधान्य मिळेल. सत्तेतील सर्वोच्च नेत्यावर त्याची असीम श्रद्धा असायला हवी. ही निष्ठा विविध चाचण्यांद्वारे वेळोवेळी पडताळून पाहण्याचे अधिकार यंत्रणेकडे राखीव असतील. सायबर जगतातील देशविरोधी मजकूर, निळ्या चित्रफिती, वेगवेगळ्या रूपाने समोर येणारा दहशतवाद त्याला पटकन ओळखता यायला हवा. अर्थात त्यासाठी निवडीनंतर प्रशिक्षण दिले जाईलच. देश व राष्ट्रविरोधी मजकूर नेमका कोणता हे स्वयंसेवकाला सांगण्याचे कार्य यंत्रणेकडून वेळोवेळी केले जाईल. तरीही नुसती शंका आली तरी त्याने यंत्रणेला सतर्क करणे बंधनकारक राहील. कोणताही भारतीय नागरिक या पदासाठी अर्ज करण्यास पात्र असला तरी अंतिम निवड करताना इच्छुकांची ‘परिवार’ पार्श्वभूमी लक्षात घेतली जाईल. ही रोजगाराची संधी जरी अधिकृत असली तरी स्वयंसेवकाचे काम गुप्त स्वरूपाचे असल्याने ‘बावळट’ चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. बुद्धिमत्तेत मात्र कसलीही तडजोड केली जाणार नाही. फक्त ती सत्तेच्या साच्यात बसणारी आहे की नाही, हे मात्र आवर्जून बघितले जाईल. रोजगाराची ही संधी प्रायोगिक तत्त्वावरची असल्याने स्वयंसेवकांना आकर्षक मानधन दिले जाईल. त्यातील काही वाटा त्यांनी निधी संकलनात जमा करण्याची तयारी दर्शवली तर अशांचा ‘उचित’ आदर केला जाईल व ‘पूर्णवेळ स्वयंसेवक’ म्हणून भविष्यात विचार केला जाईल. तरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta ulta chashma article abn 97