थोरल्या बारामतीकरांचा दिवस सुरू होता-होता त्यांनी रेडिओचा आवाज जरा कमी केला. सहज कालचा दिनक्रम आठवून बघितला. चार राज्यांतील निवडणूक निकालाबाबत वर्तवलेले भविष्य हीच कालची मोठी घडामोड होती हे त्यांच्या जाणत्या मनाने बरोबर हेरले. आता राज्य स्थिरस्थावर झाले, त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाकडे लक्ष द्यायला हवे. या एका विधानाने ममता, स्टॅलीन, केरळचे डावे सारेच खूश होतील. त्याचा उपयोग प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी होईल. असा विचार करतच ते तयार झाले. तेवढ्यात बिहारमधून तेजस्वीचा फोन ‘जदयू फुटेल का? मला सरकार बनवण्याची संधी मिळेल का? तुमचे भविष्य नेहमीच खरे ठरते तेव्हा सांगा प्लीज’ त्याच्या या प्रश्नांनी ते प्रारंभी गांगरले. मग स्वत:ला सावरत त्यांनी मोघम पण दिलासादायक उत्तरे देत फोन ठेवला. लगेच दुसरा फोन. पलीकडे ममतादीदी. म्हणे, ‘किती जागा मिळतील तेवढे सांगा’. आता काय आकडा सांगावा? बहुमत मिळेल, प्रचार करा असे सांगून त्यांनी फोन ठेवला. थोडा वेळ जात नाही तोच स्टॅलीनचा फोन. अस्खलित इंग्रजीत त्याचाही तोच प्रश्न. मग साहेब चक्रावले. हे काय सकाळी सकाळी असा विचार त्यांच्या मनात आला. तो बाजूला सारत त्यांनी स्टॅलीनला काँग्रेसवाल्यांना काबूत ठेवा अशी सूचना केली. नंतर त्यांनी फोनवरचे संदेश चाळायला सुरुवात केली तर केरळच्या डाव्या मित्रांचे भरपूर ‘मेसेज’ त्यांना दिसले. धन्यवादासह विजयाची खूण दाखवणारे. तेवढ्यात त्यांना त्यांचे पगडी घातलेले छायाचित्र व खाली खिल्ली उडवणारा एक संदेश दिसला. ही नक्कीच कुणा आयटी सेलवाल्यांची करामत, असे मनात म्हणत ते दालनात प्रवेश करते झाले. रोजच्यापेक्षा जास्त अभ्यागतांची गर्दी. तेवढ्यात आलेला चिराग पासवानचा फोन त्यांनी नाव बघताच कट केला. लखनौहून अखिलेश व हैद्राबादहून चंद्राबाबूंचे फोन येऊन गेल्याचे सहायक सांगत असताना ते गर्दीकडे वळले. समोर आलेल्या पहिल्याच शिष्टमंडळाने आमच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोण विजयी होईल तेवढे सांगा असे म्हणताच ‘मी काय ज्योतिषी आहे?’ असे पटकन त्यांच्या तोंडातून निघून गेले. तरीही ते लोक तुमचे भविष्य खरे ठरते, तेव्हा सांगा प्लीज असा आग्रह करत राहिले. आलेला प्रत्येक जण त्यांना एकच प्रश्न विचारू लागला. पंचायतीच्या निवडणुकीत काय होईल? जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता येईल?

आपले भाकीत माध्यमांनी फारच ठळकपणे छापलेले दिसते या विचारात ते असतानाच एका कार्यकत्र्याने थेट पायावरच लोटांगण घातले. ‘साहेब तुम्ही हात न पाहता अचूक भविष्य वर्तवता तेव्हा माझ्या पोटनिवडणुकीचे काय होईल तेवढे सांगा’ असे तो बरळू लागला. सुरक्षारक्षकांनी त्याला बाजूला केल्यावर त्याच्याकडे एक स्मित कटाक्ष टाकत ते पुढे गेले तर पुण्यातल्या अभिजनांचे एक शिष्टमंडळ ‘पगडी’ घेऊन उभे. हा नक्कीच विरोधकांच्या डावपेचाचा भाग असे ते मनातल्या मनात पुटपुटत असताना एक सहायक धावत आला. दिल्लीच्या लोककल्याण मार्गावरून कॉल असे म्हणत त्याने साहेबांच्या कानाला फोन लावला. ‘गुरुवर्य तुमचे भविष्य वाचले आम्ही. आता आमच्या पगडीचा स्वीकार करा. निकालानंतर भेटूच’ असे म्हणत तिकडून फोन ठेवला गेला. त्यांनी समोर बघितले तर शिष्टमंडळ  ‘होराभूषणा’सारखी पगडी हाती घेऊन उभेच. अखेर, त्यांना वेगळ्या खोलीत बसवण्याच्या सूचना देऊन साहेब दुसरीकडे वळले.