सेल्युलर तुरुंगामधल्या त्या ऐतिहासिक कोठडीत स्वातंत्र्यवीरांच्या तसबिरीसमोर बसल्यावर कंगनाचे मन राष्ट्रप्रेमाने भरून आले. डोळे मिटताच  हळूहळू तिच्या मन:चक्षूसमोर कल्पना उलगडत गेल्या. त्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून जशा नरकयातना भोगल्या तशाच आताच्या देशद्रोह्य़ांना भोगायला लावायला पाहिजेत. सत्ताविरोधी भाषेची शिक्षा काय असते हे त्यांना दाखवायलाच हवे. मानवाधिकाराच्या नावावर आजकाल जेलमध्ये फारच सुविधा मिळायला लागल्या आहेत. त्या कमी व्हायला हव्यात. कोठडी म्हणजे कोठडी. त्यामुळे जेलची वारी करणाऱ्या सेलिब्रिटींची चर्चा आपसूकच थांबेल. या थोर विचारवंताच्या कोठडीजीवनावरच एक चित्रपट बनवावा. पण त्यात आपली भूमिका कोणती असेल? अरे, त्या जेलर बारीच्या मुलीची भूमिका करता येईल की! चला तर मग, लगेच पटकथाकार बुक करायला हवा. सरकार आपलेच असल्याने येथे शूटिंगही एकाच शेडय़ुलमध्ये पार पडेल. म्हणजे पाचवा राष्ट्रीय पुरस्कार पक्का! एकीकडे त्यांना भारतरत्न व दुसरीकडे आपल्या चित्रपटाचे प्रदर्शन. धो धो चालेल तो. कारागृहातल्या यातना अधिक ठळकपणे दाखवायच्या. त्यामुळे सरकार कैद्यांना तशी वागणूक देण्यावर विचार करू शकेल व विरोधकांमध्येही दहशत पसरेल. हा चित्रपट हाती घेण्याआधी आपल्यावर असलेल्या खटल्यांचा निपटारा जलदगतीने करून घ्यायला हवा. ती अतिक्रमणाची केस तर पालिकेवरच उलटली. जावेद अख्तर यांचा मुद्दा तेवढा शिल्लक आहे. यांनी जशी माफी मागितली तशी मागून मोकळे व्हायचे का? शेवटी आपण कलावंत असलो तरी नव्या दमाचे क्रांतिकारकच. त्यामुळे एक पाऊल मागे टाकून दोन पावले पुढे जायचे अशी त्यांच्यासारखी भूमिका घेतली तर काय फरक पडतो? प्रारंभी लोक हसतील, टर उडवतील पण नंतर त्यांच्या लक्षात येईल की आपण का मागे हटलो ते! हा तर्क चांगला आहे. दिल्लीशी विचारविनिमय करून यावर निर्णय घ्यायला हवा. ‘स्वतंत्रता का सच.’ ठरले, हेच नाव फायनल करायचे. या योद्धय़ाची भूमिका कोण करेल? सिनेसृष्टीतले ‘खान’ तर नकोतच आपल्याला. कॅनडाचा नागरिक असलेल्या ‘त्या’ देशभक्ताला विचारून बघायला हवे. त्याने नाही म्हटले तर अनुपम अंकल आहेतच. तेही चांगला न्याय देऊ शकतील या भूमिकेला. अशी स्टारकास्ट असल्यावर ‘स्वर्णकमळ’ ठरलेलेच. खरा इतिहास दडवत खोटी स्वप्ने विकणाऱ्या या इंडस्ट्रीला वास्तवाची जाण पुन्हा एकदा करून द्यायची हीच योग्य संधी. गेल्या अनेक वर्षांपासून या इंडस्ट्रीने कारागृहाचे अयोग्य चित्रीकरण करून गांभीर्यच घालवलेले. काळकोठडी काय चीज असते ते दाखवूनच द्यायचे या माध्यमातून या साऱ्यांना. या चित्रपटामुळे स्वातंत्र्याचा खोटा इतिहास सामान्यांवर बिंबवणारे तोंडघशी पडतील ते वेगळेच. उजवा विचारसुद्धा स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तेवढाच आग्रही होता हे देशपातळीवर ठसवण्यासाठी तरी हा चित्रपट लवकर हातावगेळा करायला हवा. मग ठरले तर असे स्वत:शीच म्हणत कंगना उठली. कोठडीतून बाहेर आल्यावर तिने जेलची पाहणी सुरू केली. तिथे वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले माहिती फलक बारकाईने वाचल्यावर तिच्या डोक्यात एक विचार चमकला. अमली पदार्थाच्या सेवनावरून कारागृहात असलेल्या कैद्यांना येथे आणून ठेवले तर? वा काय भन्नाट आयडिया सुचली म्हणून तिने तिच्या स्वीय साहाय्यकाकडे हसून बघितले. मॅडमना ट्वीट करण्याची उबळ आली आहे हे लक्षात येताच साहाय्यकाने सेलफोन तिच्या हातात दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma kangana ranaut on aryan khan s arrest zws
First published on: 28-10-2021 at 01:01 IST