पायगुणी उद्योग

पक्षप्रमुखांच्या  चिरंजीवांशी कुरबुरी इतक्या वाढल्या की पक्षच सोडावा लागला.

‘तुम्ही सारखे सारखे दुसऱ्यांच्या पायाकडे काय बघता, चांगले दिसते का हे?’ पत्नीचे हे वाक्य कानावर आदळताच ते चपापले. गेल्या काही महिन्यांपासून ते अस्वस्थ होतेच. देशात सत्ता असलेल्या पक्षात प्रवेश घेतल्यावर काही भले होईल या आशेवर जगत असताना एका दौऱ्यात त्यांच्या कानावर वाक्य पडले. ‘तुमका पायगुण बरा नसा’ हे ऐकताच त्यांची तळपायाची मस्तकात गेली. नंतर चौकशी केल्यावर कळले तो स्वयंसेवक आहे. त्यातल्या त्यात कोकणी. मग त्यांनी राग गिळत विचार सुरू केला. पायगुण या शब्दाची उत्पत्ती, त्याचा अर्थ लागावा म्हणून भरपूर पुस्तके वाचून काढली. त्यातून अर्थबोध होईना. मग ते खरच आपला पायगुण वाईट आहे का, याविषयीच्या आत्मपरीक्षणाकडे वळले. साहेबांच्या कृपेमुळे राज्यातले सर्वोच्च पद मिळाले, लगेच सत्ता गेली. पक्षप्रमुखांच्या  चिरंजीवांशी कुरबुरी इतक्या वाढल्या की पक्षच सोडावा लागला. दुसऱ्या पक्षात गेल्यावर थोडे स्थिरावत नाही तोच तोही  सत्तेतून गेला. नाइलाजाने स्वत:चा पक्ष काढला. तर तिथेही पराभव. शेवटी कशीबशी तडजोड करून देशात अजिंक्य ठरलेल्या पक्षात गेलो तर तोही राज्याच्या सत्तेतून बाहेर. आपण एवढे उद्योगी तरीही असे का व्हावे? वारंवार घर बदलूनही यश मिळत नाही म्हणून हा पायगुणाचा मुद्दा आपल्याला चिकटवला जातोय हेच खरे! हा शब्द डोक्यात शिरल्यापासून नकळत पायांकडे लक्ष जायला लागले. आधी स्वत:च्या, मग इतरांच्या. तशी ही सवय वाईटच. पत्नी म्हणते तेच योग्य. पण  समोर कुणीही दिसला की याचा पायगुण चांगला असेल का असाच प्रश्न मनात डोकावतो. त्यावर विचार करताना हटकून त्याच्या पायाकडे लक्ष जाते. आंघोळ करतानाही पाय घासून स्वच्छ करण्याची सवय अलीकडेच जडली. पाय उजळले तर गुण चांगला पडेल म्हणून. दुसरे मन म्हणते, ‘अरे पायगुण तुझा वाईट. तू इतरांमध्ये कशाला शोधतो.’ पुन्हा मन ताळ्यावर आले की तीच सवय उफाळून येते. त्यामुळे समोरच्यांचे चेहरे नाही तर केवळ पायच लक्षात राहतात. तेही बहुतेकांचे सारखेच. मग  गुण-अवगुणाची पडताळणी मनात आपसूकच  सुरू होते. नाही नाही, वेडेपणाकडे नेणारा मनाचा हा खेळ थांबायलाच हवा. हा डाव कुणावर तरी उलटवायलाच हवा असा निर्धार करत ते उठतात. पुन्हा एकदा ‘पाय’ धुवून अभ्यासिकेत जातात. मन रमवण्यासाठी द.मा. मिरासदारांचा एक कथासंग्रह हाती घेतात. त्यातली ‘माझी पहिली चोरी’ ही कथा वाचू लागतात. ‘नायकाच्या घरी चोरी झाल्याचे कळताच लोक बघायला येतात. गर्दी एवढी वाढते की मुले रांगा लावून त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या कामात व्यग्र तर पत्नी सर्वाच्या चहापाण्यात. मग खंडीभर नातेवाईक येऊन ठाण मांडून बसतात. पंधरा दिवस लोटले तरी गर्दी संपत नाही. सारे जमलोच आहोत तर काहींचे वाढदिवस साजरे करून घेऊ म्हणत नातेवाईक रोज जेवणाचा बार उडवतात. यामुळे नायक अस्वस्थ होतो. काय करावे या चिंतेत असताना त्याला कल्पना सुचते. तो शेजारच्या घरी चोरी करतो. हे कळताच इकडची गर्दी तिकडे वळते.’ कथा वाचून होताच ते ‘युरेका’ म्हणून ओरडतात. उपाय सापडला! आता फक्त संधी मिळू दे, असे ते पत्नीला सांगतात. तिला काही कळत नाही तरीही ती देवाकडे धावा करते. ‘यांचे पायाकडचे बघणे थांबव’..  ते शांत असतात. मग एक दिवस त्यांना केंद्रात संधी मिळते. लगेच राज्यावर अस्मानी संकट येते. हीच ती योग्य वेळ असे म्हणत ते धावत संकटस्थळी जातात व हा तर माजी पक्षप्रमुखांच्या चिरंजीवाचा वाईट पायगुण, असे सांगून ‘मोकळे’ होतात. परत जाताना त्यांचे पाय चिखलाने माखलेले असूनही एकदाही त्यांचे लक्ष त्याकडे जात नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta ulta chashma konkan floods narayan rane zws