‘रोजरोज भविष्य कथन करके मै कंटाळ गया हू। लोकपण हसतात. आता कुणा दुसऱ्यावर ही जबाबदारी सोपवा’ दादांनी दिल्लीला फोन लावून कैफियत ऐकवली व तिकडून समजावणीचा सूर कानी पडायच्या आत फोन ठेवूनही दिला. दादा ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत हे स्पष्ट होताच मुख्यालयात खल सुरू झाला. सरकार पडण्यासंबंधीच्या भविष्यवाण्या मुंबईऐवजी दिल्लीतील नेत्यांकडून करवून घेतल्या तर उत्तम. निदान लोकांचा विश्वास तरी बसेल यावर एकमत होताच साऱ्यांच्या मुखातून नारायणरावांचे नाव बाहेर पडले. ते नाव ऐकून काहींना नारदाची आठवण झाली. लगेच त्यांना फोन लावला गेला. प्रारंभी ते तयारच होईनात. भांडण करणे, वाद उकरणे, थेट पंगा घेणे ही माझी वैशिष्टय़े. भविष्य सांगण्यासाठी सौम्य प्रवृत्तीचा माणूस लागतो. तसा मी नाही असे त्यांनी सांगून बघितले, पण पक्षादेशासमोर त्यांचे काहीही चालले नाही. अखेर दादांनी ज्योतिषशास्त्राच्या चोपडय़ा मागवून लगेच जुहूच्या बंगल्यावर पाठवून दिल्या. त्या घेऊन ते रात्री बराच काळ वाचत बसले. वहिनींच्या लक्षात येताच त्यांनी दुसऱ्या दिवशी साहेब तयार झाल्याबरोबर गंधाचा टिळा त्यांच्या कपाळी लावला. त्यांच्या या कृतीकडे ते रागाने बघायला लागले तेवढय़ात धाकटा निलू तिथे आला. वातावरण शांत करण्यासाठी त्याने थेट नॉस्ट्राडॅमसचे नाव घेतले. ‘‘पप्पा, आजही त्यांची भविष्यवाणी वाचली जाते. त्यांच्याही नावात ‘एन’ व ‘आर’ होता तसा तुमच्याही नावात आहे. तुम्ही सांगितलेली भविष्ये खरी ठरायला लागली की आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमचे नाव आपसूकच चमकेल. त्यामुळे पक्षातले वजन वाढेल. तुमचे वाढले की आमचेही वाढेल..’’ हे ऐकून साहेब आनंदले. त्याच अवस्थेत त्यांनी आरशासमोर जाऊन केसातून कंगवा फिरवला. दिवाणखान्यात आल्यावर त्यांना दोन-तीन साहाय्यक फायली घेऊन उभे दिसले. ‘‘आज काहीही दाखवू नका. मला ‘अभ्यास’ करायचाय,’’ असे साहेबांनी म्हणताच ते आश्चर्याने त्यांच्याकडे बघत निघून गेले. मग खूप वेळ ते चोपडय़ा उघडून सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या कुंडल्यांचे निरीक्षण करत बसले. त्यात गुरू व शुक्रच त्यांना प्रबळ दिसायला लागला. राहू व केतूचे आगमन झाल्याशिवाय या तिघांत बेबनाव शक्य नाही व नजीकच्या काळात हे दोन ग्रह यांच्या कुंडलीत येतील असे दिसत नाही हे लक्षात येताच त्यांचा हिरमोड झाला. त्यांनी लगेच दिल्लीला फोन लावला. सत्यस्थिती कथन करताच दिल्लीचा माणूस खो खो हसू लागल्यावर साहेब गडबडले. किमान या पक्षात तरी दिल्लीशी पंगा घ्यायचा नाही असे ठरवले असल्याने ते शांत राहिले. मग दिल्लीवाला म्हणाला, ‘‘साब, जरा ध्यानसे सुनिये. लोकांना जे सत्य आहे तेच सांगायचे ही प्रथा आम्ही सात वर्षांपूर्वीच मोडीत काढली. आता जे सत्य नाही तेच सत्य म्हणून सांगण्याचे दिवस आहेत. लोकसुद्धा पटकन त्यावर विश्वास ठेवायला लागलेत. तेव्हा तुम्ही त्या चोपडय़ा वाचून भविष्य सांगू नका. आम्ही जे सांगू तेच भविष्य म्हणून लोकांना सांगा. तुम्ही सर्वात आधी ज्या पक्षात होते त्यातले नेतेही भविष्य पाहणारे होतेच व आहेत. तुम्ही भविष्याच्या नावाने त्यांना घाबरवत राहायचे. कुछ समझे..?’’ हे ऐकताच साहेबांचा चेहरा उजळला. मग लगेच त्यांनी माध्यमांना बोलावून मार्चपर्यंत सरकार पडेल अशी घोषणा केली. त्याला मिळालेली प्रसिद्धी बघून ते दिवसभर भारावलेल्या अवस्थेतच होते. रात्री झोपण्याआधी त्यांना बरोबर एका मंत्र्याचा फोन आला. ‘‘साहेब, सांभाळून घ्या,’’ असे त्याने म्हणताच त्यांचा चेहरा उजळला. रात्री झोपताना त्यांचा हात सहज कपाळावरच्या टिळ्यावर स्थिरावला. आजपासून रात्रीही टिळा पुसायचा नाही असे ठरवत त्यांनी डोळे मिटले.