हॉटेलमधून गणवेशात जेवणाचे पार्सल आणायचे नाही, वाहनाच्या टपावर ठेवून खायचे नाही या आदेशामुळे दलातील शिपायांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. सर्व अधिकारी जसे भ्रष्ट नसतात तसे सर्व शिपाईसुद्धा नसतात. मात्र हा आदेश साऱ्यांना एकाच मापात तोलणारा असे आमचे मत झालेय. गस्तीवरचे शिपाई ‘खाता खाता चौफेर लक्ष’ या धोरणानुसार टपावर जेवतात. तसेही आम्हाला जेवणासाठी कुणी साधी ओसरीही उपलब्ध करून देत नाही. सुरक्षा मात्र साऱ्यांना हवी असते. याच अगतिकतेतून या धोरणाचा जन्म झाला. मात्र ते वरिष्ठांना रुचलेले दिसत नाही. नव्या आदेशामुळे प्रत्येकाने घरात डब्यासाठी तगादा सुरू केल्याने सध्या पोलीसलाइन चाळीतली भांडणे वाढलीत. यामुळे अनेक सहकारी वैतागले असून त्याचा परिणाम कर्तव्यावर होऊ शकतो, हेही दिसतेय. काही शिपायांनी वाहनांमध्येच गणवेश बदलून पार्सल मागण्याचा प्रयत्न केला पण हॉटेलवाल्याला संशय येताच त्याने देण्याचे नाकारले. नंतर चौकशी केली तर ‘फुकटात गोष्टी मागण्याची सवय असलेल्यांच्या आवाजात एक वेगळीच जरब असते..’ असे तो म्हणाला.  आता तर काही हॉटेलचालकांनी, फूड व बारचे परवाने जसे फ्रेम करून ठेवतात तसा हा नवा आदेशसुद्धा काउंटरवर ठेवलाय. काहींनी नेहमी गस्तीवर असणाऱ्या शिपायांचे गणवेश व साध्या वेशातले फोटो मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवले असून पार्सल मागितल्यावर आधी ते फोटो पाहतात. ‘पैसे देतो’ म्हटले तरी जेवणास नकार देतात. काही शिपायांनी वाहनाच्या आतच बसून डबे खाण्यास सुरुवात केली. नंतर ते वाहन साहेबांच्या कौटुंबिक सेवेत गेल्यावर त्यांच्या ‘फॅमिली’ने वास येतो अशी तक्रार करताच सर्वाना ताकीद मिळाली. अजूनही गस्ती पथकांकडून जेवणाचे पार्सल बोलावण्याची अधिकाऱ्यांची सवय सुटलेली नाही. एका शिपायाला रात्री दहा वाजता साहेबांचा निरोप मिळाला. आता गणवेशाचे काय करायचे, असा प्रश्न त्याला पडला. शेवटी तो साहेबांच्या निवासस्थानी गेला. तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या गार्डकडून त्याने कपडे उधार घेतले व साहेबांचे काम केले. पार्सल आणून दिले नाही तर साहेबलोक निवासस्थानी आर्डर्लीची डय़ुटी लावतो अशी भीती दाखवतात. आधी साहेब बाहेर जेवायला गेले तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या शिपायांना हॉटेलकडून चहा मिळायचा. आता तोही बंद! विचारले तर साहेब साध्या वेशात, तुम्ही गणवेशात असे उत्तर मिळते. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका वर्दळीच्या चौकात वाहन उभे ठेवून शिपाई थोडय़ा अंतरावरील फुटपाथवर डबे खात असताना अचानक वरिष्ठ राउंडवर आले व तुम्ही वाहन बेवारस कसे काय सोडले म्हणून साऱ्यांना झापले. वाहनाच्या आत नाही, टपावर नाही, बाहेर नाही मग आम्ही जेवायचे तरी कुठे? काही शिपायांनी हॉटेलचेच जेवण आहे हे ओळखता येऊ नये म्हणून घरून रिकामे डबे आणून त्यात जेवण भरून घ्यायला सुरुवात केली. हे कळल्यापासून वरिष्ठ डबेसुद्धा चेक करायला लागलेत. घरची व हॉटेलची भाजी आम्ही ओळखतो असे म्हणत ‘लाइन हाजीर’च्या दटावण्या देऊ लागलेत. त्या पुण्याच्या मॅडमनी बिर्याणीसाठी व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला नसता तर ही स्थिती उद्भवली नसती तेव्हा वरिष्ठांनी या नव्या अडचणीतून आमची सुटका करावी ही अपेक्षा व विनंती. (हे निनावी पत्र ‘उलटा चष्मा’च्या संगणकावर तरळले होते.. ते मुळात बहुधा ‘दक्षता’ मासिकासाठी असावे!)