इंदोरच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या विश्वगुरूंनी कानउघाडणी केल्यानंतर खात्याचे मंत्री व राज्यमंत्री धावतपळतच दळणवळण मंत्रालयात दाखल झाले. तोवर टपाल खात्याच्या ‘माय स्टॅम्प’ या योजनेचा तातडीने आढावा घेण्यात येणार आहे ही वार्ता देशभरातील कार्यालयात पोहोचलीसुद्धा होती. या योजनेत आजवर कोणती टपाल तिकिटे काढायला परवानगी देण्यात आली असा प्रश्न मंत्र्यांनी विचारताच एका मोठय़ा रजिस्टरमध्ये चिकटवलेली तिकिटे त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. ‘तपशील वाचून दाखवा’ असा आदेश मिळताच एक अधिकारी थरथरतच उभा झाला. पहिल्याच पानावर इंदोर काँग्रेसने छापून घेतलेली तिकिटे होती. ‘अब की बार गॅस हजार पार व महंगाई डायन’ असे शब्द त्याने उच्चारताच राज्यमंत्री चिडले. ‘हे देशभर ठाऊक आहे. दुसरे वाचा.’ मग पान उलटले गेले. त्यावर शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तिकीट होते. आंदोलकांच्या छायाचित्राखाली ओळी होत्या, ‘सरकारच्या खांद्यावर मलमली शेला, शेतकरी मात्र उपाशी मेला’ हे ऐकताच संतापलेल्या मंत्र्यांनी ‘कुणी परवानगी दिली याला? त्याचे नाव बाजूला काढा’ असा आदेश दिला. नंतरचे तिकीट सरकारच्या चलनीकरण योजनेवर होते. एक दाढीवाला इसम मेगासेल लावून बसलेला आहे. या चित्राखाली ‘कोण रोखे चलनीकरण’ अशी ओळ होती. ती ऐकताच दोन्ही मंत्र्यांनी कपाळावरचा घाम पुसला. मग एलआयसीवरचे तिकीट होते. त्यावर ‘जीवन के पहिले, जीवन के बाद’ या धर्तीवर ‘सत्तेच्या पहिले, सत्तेच्या नंतर’ अशा ओळीसह खासगी असा शब्द लिहिलेल्या दोन हातांत महामंडळाचा लोगो होता. ‘कुठून छापले गेले हे? ’अशी विचारणा होताच कोलकाता असे उत्तर मिळाले. नंतरच्या पानावर वखार महामंडळाच्या गोदामांची छायाचित्रे होती. एक उद्योगपतीसमान भासणाऱ्या व्यक्तीच्या हाती तराजू होता  आणि खाली ‘नका विचार करू काऊन, ते आता आमचे गोडाऊन’ असा मजकूर होता. ‘हे महाराष्ट्रातील आहे’ असे उत्तर मंत्र्यांनी न विचारताच दिले गेले. नंतरच्या पानावर करपलेल्या शेतीचे छायाचित्र आणि खाली ‘कृषीचा सेस, लागला ओलांडायला वेस’ अशा ओळी होत्या. मंत्र्यांनी अधिकाऱ्याकडे बघताच ‘पंजाब’ असे उत्तर मिळाले. मग नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या तरुणांच्या गर्दीचे चित्र होते. त्यावर ‘वडे तळा वडे, जागले बेरोजगारीचे मढे’ असा मजकूर होता. ‘याच आशयाची दहा तिकिटे देशाच्या विविध भागांतून प्रकाशित झालीत’ असे अधिकाऱ्याने सांगताच मंत्र्यांनी पाण्याचा ग्लास तोंडाला लावला. ‘हे स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली म्हणून उत्तर प्रदेशातून प्रसिद्ध केलेले तिकीट’ असे म्हणत त्याखालच्या ओळी वाचल्या गेल्या, ‘आमचे आदर्श आम्ही विसरू, महात्मा कायम गायब नेहरू’ हे ऐकताच मंत्री हसले. नंतरच्या तिकिटावर एका सुटाबुटातील वृद्धाचे छायाचित्र होते. त्यावर ‘आम्ही म्हणतो ते समजले काय, प्रश्न अजिबात विचारायचे नाय’ असा मजकूर होता. ‘आता हे शेवटचे’ म्हणत माइकवर बोलणाऱ्या एका व्यक्तीचे रेखाचित्र होते तर खाली मोठय़ा अक्षरात ‘धन की बात’ तर छोटय़ामध्ये ‘बसता बुक्की, उठता लाथ, हीच खरी धन की बात’ अशी ओळ होती. सादरीकरण संपताच मंत्र्यांनी ‘या तिकिटांना मंजुरी देणाऱ्या सर्वाना निलंबित करा’, असा आदेश दिला आणि ‘हा देशद्रोहच’ असे म्हणत ते उठले. दुसऱ्याच दिवशी सरकारने जाहीर केले ‘माय स्टॅम्प योजनेचा देशविघातक शक्तीकडून गैरवापर होत असल्याने ती तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे.’