सगळीच फसगत हो. तीही एकजात सगळय़ांची. यात त्या कर अधिकाऱ्यांचा तरी काय दोष? त्यांना सांगितले ‘त्या’ अत्तरवाल्याला पकडा. त्यांनी शेवटचा शब्द ‘ला’ ऐवजी ‘ना’ ऐकला. ते तरी काय करणार? गेल्या सात वर्षांपासून सतत छाप्यांच्याच कामात व्यस्त असतात. त्यामुळे एकाऐवजी दोन पकडले गेले. त्यातल्या त्यात दोघांची आडनावे सारखी. नावही एकाच अक्षरापासून सुरू होणारे. त्यामुळे ‘आपला’ पी. जैन आणि त्यांचा म्हणजे समाजवादी पक्षासाठी अत्तर बनवणारा ‘पी. जैन’ कोणता व हे तरी ते कसे ओळखणार? उगीच ओळख पटवण्याच्या नादात ‘पाहिजे तो’ निसटला तर? आलोच आहोत तर घ्या झडती म्हणून लागले बिचारे कामाला. अशा वेळी ‘आदेश’ देणाऱ्याने तरी अलीबाबाच्या घरावर मारली तशी फुली विरोधी जैनच्या घरावर मारायला हवी ना! निवडणुकीच्या गडबडीत तेही विसरले गेले. शेवटी झाली पंचाईत. तरी बरे, माध्यमे सोबतीला होती. म्हणून प्रारंभी समाजवादी पैशाचा धूर बाहेर पडला. त्याचाच फायदा घेत कानपूरच्या धुक्यात विश्वगुरूंनी भाषणही ठोकून दिले. बघा, समाजवादी अत्तराच्या बाटलीतून कसा पैशाचा सुगंध येतो, असे. आता खुलासा झाल्यावर झाली ना त्यांचीही फसगत. गेला ना एक प्रचाराचा मुद्दा हातून. तिकडे कारवाई करणाऱ्यांना शिव्या खाव्या लागणार त्या वेगळय़ाच. इकडे निवडणुका जिंकण्याच्या तणावात असलेल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांसमोरची काळजी वेगळीच. १९४ कोटीवाल्या जैनच्या अत्तराला कमळाचा सुगंध येतो हे कळले कसे नाही? एवढा मोठा माणूस ‘यादी’तून निसटला कसा? हजाराच्या पावतीवर त्याची बोळवण कशी केली गेली? ‘टीप’ देताना हे लक्षात कसे आले नाही? आता विरोधक रान उठवतील, त्याचे काय? एकच नाही तर अशा भाराभर प्रश्नांची चिंता साऱ्यांना पडलेली. दुसरीकडे यूपीतले सारे नामचीन खंडणीखोरही विचारात पडले.. इतके दिवस आपण अपहरणासाठी मर्सिडीजवालेच शोधत बसलो, ‘सेकंडहँड’ स्कूटरवालाही करोडपती असू शकतो हे लक्षात कसे आले नाही? अत्तरांच्या दुकानांकडेही लक्ष द्यायला हवे हे सुचले कसे नाही? याच विचारात साऱ्या ‘गँग’ सध्या गढल्यात म्हणे! तिकडे लाडक्या ‘पंपी’च्या घरीदारी फार काही घबाड न मिळाल्यामुळे सारे समाजवादी खूश. आता प्रचाराची सुरुवात करायची ती अत्तराच्या उल्लेखानेच. बघा, कसा निर्दोष ‘सुगंध’ येतो याचा हेच सांगत फिरायचे. शिवाय प्रत्येक नुक्कड सभेत एकाच नावाचे तीन हिरो असलेला ‘एकदोनतीन’ हा सिनेमा हटकून दाखवायचा. प्रारंभीच्या गफलतीतून सत्ताधाऱ्यांनीच पसरवलेले ‘पैशाच्या थप्पी’चे छायाचित्र यात्रेत हटकून दाखवायचे. मुख्य म्हणजे ‘पुष्पराज ऊर्फ पंपी’ला स्टार प्रचारक करून टाकायचे. ‘दुसऱ्यासाठी यंत्रणांमार्फत खड्डा खणता काय? घ्या आता पडा त्यात’ अशी बोचरी टीका करायची असेही ठरवून टाकले म्हणे त्यांनी. बिचारे १९४ कोटीवाले पीयूषभाई! साधे राहूनही श्रीमंत होता येते हे सिद्ध करण्याची धडपड गेली ना वाया. तीही केवळ नामसाधम्र्यामुळे. सारखेच नाव आहे हे लक्षात आल्यावर धंदा तरी दुसरा करावा असे का सुचले नसेल त्यांना?  समोरचा समाजवादी कळपात शिरल्यावर आपणही ‘कमलगंध’ अत्तर तयार करून देऊ शकतो असा व्यापारी विचार त्यांना सुचला नाही हीच त्यांची चूक. आता तेलही गेले, तूपही गेले आणि सुगंधाचे रूपांतर दुर्गंधीत झाले ते वेगळेच. आता त्यांना दिलासा देणारी गोष्ट एकच. त्यांच्या ‘सेकंडहँड’ स्कूटरला खूप मागणी येत आहे म्हणे! कितीही रुपये खर्चून ती खरेदी करायला अनेक जण तयार आहेत. शेवटी पुन्हा ‘घबाड’ जमवायला हाताशी रक्कम हवीच ना! आगे बढमे पीयूषभाई!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma raid on piyush jain samajwadi itar zws
First published on: 31-12-2021 at 01:03 IST