आपण मुख्यमंत्री आहोत असे भाऊंना कायम वाटत राहिले पाहिजे यासाठी पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावयाच्या उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत.

१) ते विरोधी पक्षनेते असल्याने पोलीस बंदोबस्त असतोच. त्यांचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांशी ‘गोड’ बोलून अथवा स्थानिक पातळीवर असलेल्या संबंधांचा वापर करून अधिकचा बंदोबस्त लावून घ्यावा. त्यामुळे मुख्यमंत्रीच येत आहेत असे वातावरण त्या भागात आपसूकच निर्माण होईल.

२) त्यांच्या दौऱ्यात पक्षाची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी मोठय़ा प्रमाणात भूमिपूजन व उद्घाटन सोहळे व लाभार्थ्यांना अनुदान वाटप असे कार्यक्रम आयोजित करावे. जिथे सत्ता नसेल तिथे खासगी व सामाजिक संस्थांच्या मदतीने उपक्रम आयोजित करावे. त्यानंतर पक्षाचे मेळावे ठेवावेत.

३) मेळावे आयोजित करताना ते मुख्यमंत्री होते तेव्हा जशी गर्दी जमायची, अगदी तशीच किंवा त्यापेक्षा जास्त गर्दी जमेल याची काळजी स्थानिक नेत्यांनी घ्यावी. तसेच दौरा असलेला जिल्हा फलक व तोरणांनी पूर्णपणे सजवावा, जेणेकरून मुख्यमंत्रीच येत आहेत असे चित्र जनतेत निर्माण होईल.

४) एका जिल्ह्य़ात त्यांचा दौरा ठरला की लगेच आजूबाजूच्या जिल्ह्य़ांनी पुढाकार घेत कार्यक्रम ठरवावे. यामुळे त्यांच्या दौऱ्याला ‘भरगच्च’ स्वरूप प्राप्त होईल.

५) कार्यक्रम आयोजित करताना ते मुख्यमंत्री आहेत असे समजून वेळेचे काटेकोर नियोजन करावे. इतरांची भाषणे कमी होतील याची काळजी घ्यावी. भाऊंचा दौरा अतिशय व्यस्त आहे. त्यांना घाई आहे हे ध्वनिक्षेपकावरून वारंवार सांगावे.

६) त्यांच्या दौऱ्यात विरोधकांकडून निदर्शने होऊ शकतील का याची चाचपणी करावी. त्यासाठी परिवारातील काहींना कामाला लावले तरी हरकत नाही. तसे घडले तर दौऱ्याची चर्चा अधिक होईल व राज्याचे निर्विवाद नेते तेच आहेत असा संदेश जनतेत जाईल.

७) माध्यम संवाद आयोजित करताना एक-दोन बोरूबहाद्दरांकडून ‘तुम्ही राज्याचे नेते आहात, मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त फिरता, भावी मुख्यमंत्री आहात’ अशी वाक्ये प्रश्न विचारण्याआधी वदवून घ्यावीत. विरोधी पक्षनेते हा उल्लेख टाळावा असे माध्यमांना आधीच ‘बजावून’ ठेवावे.

८) बीड, परळी या भागांत दौरा असेल तर स्थानिक नेते जास्त व अवाजवी बोलणार नाहीत, मीच मुख्यमंत्री असे म्हणणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कुणी भाऊंना आव्हान देऊ शकतो अशी शंका जरी आली तरी तातडीने कळवावे. त्यांची आवश्यक ती ‘खबरदारी’ वरिष्ठ पातळीवरून आधीच घेण्यात येईल.

९) त्यांच्या दौऱ्यात केंद्राशी संबंधित स्थानिक समस्यांवर अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित कराव्यात. तशा स्पष्ट सूचना केंद्रीय प्रशासकीय यंत्रणांना देण्यात याव्यात, जेणेकरून प्रश्न सोडवल्याचे समाधान त्यांना मिळेल व जनतेत तेच कर्तेकरविते असा संदेश जाईल.

१०) त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमांचे संचालन करताना ‘राज्याचे दूरदर्शी नेतृत्व’ असा उल्लेख वारंवार करावा. घोषणा देताना ‘राज्याचे तारणहार’ हा शब्द उच्चरवात वापरावा.

११) ते मुख्यमंत्रीच आहेत असा समज साऱ्यांना करून द्यायचा असल्याने त्यांच्या दौरा, कार्यक्रमात ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य कुणीही उच्चारणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी.

१२) त्यांच्या दौऱ्यात स्थानिक प्रशासनाचे अधिकारी नसले तरी भाऊंच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या राजशिष्टाचाराचे पालन पक्षपातळीवर होईल याची दक्षता नेत्यांनी घ्यावी.

या सर्व उपाययोजना व सूचनांचे पालन सर्वानी करणे अपेक्षित आहे.

– भाऊंचे जनसंपर्क कार्यालय, मुंबई</p>