निदर्शनकोंबडी

कत्तलखान्याचा रस्ता आपल्या सवयीचा पण मला ज्याने काखेत घेतले तो थेट चौकातच घेऊन गेला.

‘कोक्कोक्क्को को’- ‘क्क्कोको कोक्को’ या कलकलीने मंगळवारी सायंकाळी खुराडय़ात सारा  गोंधळ माजलेला. प्रत्येकीला काही ना काही सांगायचे होते पण सगळ्या एकाच वेळी बोलू लागल्याने कुणाचेच काही समजेना. अखेर एकीने जरा मोठय़ाने आरवून सगळ्यांना शांत केले व एकेकटीने बोलावे अशी सूचना केली. त्यासरशी एकीने पंख फडकावत सुरुवात केली. ‘श्रावण पावला गं बाई मला. खुराडय़ातून बाहेर काढल्यावर भगवा दुपट्टेवाला बघून भीतीच वाटली होती. याची हलाल करण्याची पद्धत वेगळी तर नसेल ना अशी शंकाही मनाला स्पर्शून गेली. पण तसे काहीच घडले नाही. जोरदार घोषणाबाजी सुरू असताना मला उंच हवेत उडवले. घाबरून आजूबाजूला बघितले तर फलकावर माझे फोटोच फोटो. पंख फडफडवत खाली आल्यावर मात्र कुणी लक्षच दिले नाही, मग आले पळून’. नंतर दुसरी सांगू लागली ‘खरंच, माणसांचा काही भरवसा नाही गं. कधी कसे वागतील ते कळतच नाही. कत्तलखान्याचा रस्ता आपल्या सवयीचा पण मला ज्याने काखेत घेतले तो थेट चौकातच घेऊन गेला. तिथेही गर्दी. इतक्या लोकांना मी कशी ‘पुरणार’ अशी शंका मनात येत असतानाच दोघांनी मला उंच धरले. त्यानंतर कॅमेऱ्यांचे इतके लखलखाट सुरू झाले की काय होतेय तेच मला कळेना. मी डोळे घट्ट मिटून घेतले. आपण सेलेब्रिटी झालो असा ‘फील’ यायला लागला, आता गर्दीची सवय करावी लागेल असे वाटू लागले. खुराडय़ातून बाहेर पडल्यावर जिवंत परत येऊ शकतो यावर अजून विश्वासच बसत नाही गं’. मग तिसरी उत्साहात येऊन बोलू लागली, ‘मला तर कारमध्ये बसवून जुहूला घेऊन गेले. मस्त गार हवा लागत होती प्रवासात. आपले खुराडे एसी का नाही, असा प्रश्न तेव्हा मनात आला. तिथे उतरले तर पोलीसच पोलीस. तरीही एकाने मला एका मोठय़ा इमारतीच्या दिशेने भिरकावले. त्याबरोबर पळापळ व लाठीमार सुरू झाला. माझ्याकडे कुणी लक्षच देईना. मग मी कशीबशी वाट काढत एका बंद शटरच्या आडोशाला उभी राहिले. बाजूला बघते तर मोठे मांजर. तशीच पळाले तर एका झेंडय़ात पाय अडकला. त्यातून कशीबशी सुटका करून आले परत. हे राजकारण एवढे वाईट असते असे कधी वाटलेच नव्हते गं.पायच मुरगळला माझा’. मग चौथी म्हणाली, ‘मला एका चौकातल्या पक्षकार्यालयासमोर नेले तेव्हा मी ओरडून सांगत होते ‘श्रावण चल रहा है, अब तो जीने दो’ पण कुणी ऐकायलाच तयार नव्हते. बळी देण्याचा हा नवा प्रकार तर नाही ना अशी भीती वाटायला लागली पण फोटो काढून झाल्यावर कुणी लक्षच दिले नाही माझ्याकडे. मग आले सटकून’. साऱ्यांचे ऐकून झाल्यावर एक ज्येष्ठ कोंबडी धीरगंभीर आवाजात बोलू लागली : ‘आजवर आपण मानवजातीसाठी हौतात्म्य पत्करत राहिलो पण यांना राजकारणासाठी आपण हवे असू तर आपल्याही मागण्या तातडीने समोर करायला हव्यात. राजकारणात वापरून घ्यायचे असेल तर आमचाही मेहनताना निश्चित व्हायला हवा. आपली शारीरिक क्षमता लक्षात घेता पाच फुटांपेक्षा कुणी जास्त उडवू नये. आंदोलन मोर्चात न्यायचे असेल तर मांजर, कुत्र्यांपासून संरक्षणाची हमी हवी. निदर्शनांतून परत आलेल्या आपल्या बंधूभगिनींचा दर ‘झुंजीच्या कोंबडय़ा’पेक्षा जास्त असायला हवा. आपण देत असलेल्या अंडय़ाचा दिवस पाळला जातो तसा राष्ट्रीय कोंबडी दिवसही साजरा व्हायला हवा’. या मागण्या ऐकून साऱ्या कोंबडय़ा आनंदाने कलकलल्या व एकमेकींना पायाची टाळी देत दाणे टिपू लागल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta ulta chashma shiv sena banner against bjp leader narayan rane zws

ताज्या बातम्या