२०२२ च्या सप्टेंबरमधली एक कुंद सकाळ. लंडनच्या वेस्टमिन्स्टर भागात स्थानिक बेरोजगारांची जोरदार निदर्शने सुरू आहेत. ‘परत पाठवा, परत पाठवा. भारतीय चालकांना परत पाठवा’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. ब्रेग्झिटनंतर हे काय नवीन अशा कुतूहलमिश्रित नजरेने अनेक जण थांबून ही घोषणाबाजी लक्षपूर्वक ऐकत आहेत. तेवढय़ात आंदोलकांचा एक नेता गळ्यात कर्णा लटकवून हातात ध्वनिक्षेपक घेत बोलू लागतो. ‘करोनाकाळात युरोपात परत गेलेले ट्रकचालक परत न आल्याने वर्षभरापूर्वी देशात चालकांची टंचाई निर्माण झाली. त्याचा मोठा फटका उद्योगांना बसू लागल्यावर तातडीची गरज म्हणून मुळात केवळ युरोपीय समुदायातील चालक घ्यावेत, असे ठरले असताना तेही आले नाहीत. म्हणून मग भारतीय चालकांना आणावे लागले. गेल्या वर्षभरापासून येथे सेवा देत असलेल्या या चालकांचे चोचले पुरवण्यासाठी ब्रिटिश सरकारने जी पावले उचलली ती देशाच्या अर्थव्यवस्थेला आणखी खड्डय़ात घालणारी व भारतीय व्यवस्थेला बळ देणारी ठरली आहेत. या चालकांनी केलेली प्रत्येक मागणी पूर्ण करण्याची सरकारला गरजच काय? त्यांना इथले जेवण ‘सूट’ होत नाही म्हणून महामार्गावर शेकडो धाबे उघडण्यात आले. तिथे तंदूररोटी व दालफ्राय तयार करणारे खानसामेसुद्धा भारतातून आणण्यात आले. त्यामुळे महामार्गावर असलेल्या आस्दा व टेस्को सुपरमार्केटांचा व्यवसाय बुडाला. या चालकाला खाटेवर झोपायला आवडते म्हणून त्यासुद्धा तिथून आणल्या गेल्या. त्यामुळे भारतात सुतारकाम व नारळाच्या दोरीचे महत्त्व वाढले. या चालकांना इंग्रजी येत नाही म्हणून खास महामार्गासाठी असलेल्या हेल्पलाइन सेंटरमध्ये दुभाषे बसवण्यात आले. तेही भारतातून आणलेले. हे चालक येण्याआधी आपण मका निर्यात करत होतो. आता मिस्सीरोटीच्या नावाखाली सर्व पीक तेच फस्त करतात. सरसोची आयात वाढली ती वेगळीच. आपली गरज ९० हजारांची होती, पण या चालकांनी हेल्पर व क्लीनरसुद्धा भारतीयच हवे असा आग्रह धरल्याने दोन लाख लोकांना येथे प्रवेश द्यावा लागला. या साऱ्यांना गूगलमॅप शिकवण्यासाठी हिंदीभाषी प्रशिक्षकसुद्धा बोलवावे लागले. आपल्याविरुद्ध वारंवार उपोषण करणाऱ्या गांधींचेसुद्धा एवढे लाड आपण कधी पुरवले नसतील. मग यांचे का? यांना इथून तातडीने बाहेर काढा.’ नेता थांबताच दुसरा बोलू लागतो, ‘सभ्य वर्तन, नियम पाळणे हे आपल्या रक्तातच रुजलेले. मात्र या चालकांनी येथेही भारतात असल्यागत वर्तन सुरूच ठेवले. यांना घेऊन येणारे विमान जेव्हा हिथ्रोवर पोहोचले तेव्हा काहींनी उतरण्यासाठी पायरीचा वापर न करता दरवाजातून खाली उडय़ा मारल्या. त्याची चर्चा झाल्यावर सरकारने ‘त्यांना ट्रकमधून उडी मारण्याची सवय आहे’ असे स्पष्टीकरण दिले. स्थानिक वाहन परवाना देतानाही त्यांच्या अनेक नियमभंगाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे हे लोक रस्त्यात कुठेही वाहने थांबवतात. इंडिकेटर बंद करून वाहनाला झाडाच्या फांद्या लटकवून ठेवतात. यामुळे देशात अपघातांची संख्या प्रचंड वाढली. २०२२ च्या एप्रिलमध्ये मँचेस्टरला जाणाऱ्या मार्गावर २५ ट्रक रस्त्यात थांबवून चालक भांगडा करत होते. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली. काही विचारायला गेले तर ‘ओय पापे, प्राजी’ असे न कळणारे शब्द ते वापरतात. वेगमर्यादेचे पालन करत नाहीत. मनाला वाटेल तेव्हा मार्गिका बदलतात. तेव्हा सरकारने हे वसाहतवादी धोरण तातडीने मागे घ्यावे व या सर्वाना परत पाठवावे.’ भाषणे तावातावाने होतात, पर्याय कुणीच सुचवत नाही. ‘उद्या परत भेटू’ म्हणत आंदोलन संपते. सायंकाळी सरकारतर्फे एक निवेदन प्रसृत केले जाते. ‘ब्रेग्झिटमुळे आपण आधीच एकटे पडलो आहोत. अशा काळात साथ देणाऱ्या भारताशी संबंध वृद्धिंगत व्हावे म्हणून या चालकांची सेवा पुढेही कायम ठेवण्यास सरकार वचनबद्ध आहे.’