सर्वाना सूचित करण्यात येते की, मौर्यकालीन इतिहासात नमूद चुकीच्या व देशाला पराभूत दाखवणाऱ्या अनेक गोष्टी आता काढून टाकण्यात येत असून यात आमूलाग्र बदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नुकतेच म्हणाले त्याप्रमाणे चंद्रगुप्त व अलेक्झांडर यांच्यात झालेल्या घनघोर युद्धाचा व त्यात चंद्रगुप्ताने विजय मिळवल्याचा प्रसंग नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. आता भविष्यात अलेक्झांडर व पौरुष ऊर्फ पुरू यांच्यात लढाई झाली, त्यात एका बेसावध क्षणी पुरू शत्रूच्या तावडीत सापडला, त्यावेळी त्याने ‘बंदी असलो तरी मला राजासारखे वागवा’ असे म्हटले या पद्धतीचे लेखन दृष्टीस पडले तरी कुणीही वाचू नये. या चुकीच्या माहितीवर बंदी आहे असे समजून चालावे. योगींनी मांडलेल्या इतिहासाला आधार मिळावा म्हणून पुरूचे नाव पुसून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याऐवजी चंद्रगुप्त असे प्रत्येकाने वाचायचे आहे. शिवाय अलेक्झांडरच्या मृत्यूवर्षांत आता बदल करण्यात येत आहे. त्याचा मृत्यू इसविसन पूर्व ३२३ ला झाला नसून तो ३४३ ला झाला असे वाचावे. कारण चंद्रगुप्त हा याच पूर्व काळात ३२१ ला राजेपदावर आल्यावर काही वर्षांत त्याने अलेक्झांडरशी युद्ध पुकारले. हे युद्ध झाले हे जनतेत ठसवण्यासाठी अलेक्झांडरला आणखी २० वर्षांचे आयुष्य देणे गरजेचे असल्याने हा बदल करण्यात आला आहे. २०१४ पूर्वीच्या इतिहासकारांनी अलेक्झांडरला जगज्जेता दाखवण्याच्या नादात व चंद्रगुप्तचे योद्धेपण दडवण्याच्या प्रयत्नात वर्षांची नोंद चुकीची केली. हे जाणीवपूर्वक केल्याचे योगींनी लक्षात आणून दिले. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत हे किरकोळ बदल करण्यात येत असून ठिकठिकाणी असलेल्या बखरीही लगेच दुरुस्त करण्यात येतील. अलेक्झांडर हा ग्रीक राजा होता. तो जगात कुठेही पराभूत झाला नाही अशी चुकीची मांडणी आजवरच्या हिंदुद्वेष्टय़ा इतिहासकारांनी केली. तो पुराणकाळापासून अजेय असलेल्या हिंदुस्थानात पराभूत झाला हे सत्य दडवून ठेवले. तसेच कारण नसताना त्याला सिकंदर हे टोपणनाव दिले. खरेतर असे नामकरण करून त्याला याच भागातला असे भासवण्याचे काही कारण नव्हते. पौरुष ऊर्फ पुरू हा राजा होता पण त्याची लढाई अलेक्झांडरसोबत झालेलीच नसताना केवळ या बाहेरच्या राजाला मोठेपण देण्यासाठी ती झाल्याचे दाखवण्यात आले. यात पुरूची बदनामी झाली ती वेगळीच. त्यामुळे येत्या काळात पुरूने कोणत्या विदेशी सम्राटाचा पराभव केला याचीही साधार माहिती योगी देणार असून त्यानंतर इतिहासात तसा बदल करून पुरूवरचा अन्यायसुद्धा दूर केला जाईल. सध्या चंद्रगुप्ताच्या बाबतीत इतिहासात झालेली मोडतोड दुरुस्त करण्याला देशभरात प्राधान्य देण्यात आले आहे. यासंदर्भात या जगज्जेत्या राजाचे गुरू चाणक्याने केलेल्या नोंदीसुद्धा तपासल्या जात आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे पुरूऐवजी चंद्रगुप्त असे वाचताना चाणक्य हा पुरूचाही गुरू होता असा समज कुणी करून घेऊ नये. वस्तुस्थितीची इतिहासकारांनी योग्य दखल न घेतल्यामुळेच सत्ताधारी वर्तुळाला यात लक्ष घालावे लागले. एकदा चंद्रगुप्तचा इतिहास नीट करून झाल्यावर मग स्कंदगुप्तचा मुद्दा प्राधान्यक्रमावर घेतला जाणार आहे. उत्तरेत निवडणूक पार पडेपर्यंत हिंदू राजाच्या शौर्य व पराक्रमाची नोंद घेण्याचे हे काम अव्याहत सुरूच राहणार आहे. तरी इतिहासप्रेमींनी जसजशी माहिती समोर येईल तशी नोंद करत नवा इतिहास मुखोद्गत करण्याचे काम करावे, अशी विनंती इतिहास पुनर्लेखन प्रकल्पाच्या वतीने सर्वाना करण्यात येत आहे.