‘या लशीचा शोध काय यांनी लावलाय का? मारे चालले तिथे प्रमाणपत्रावर मिरवायला.. किमान संकटकाळात तरी असा प्रसिद्धीचा हव्यास योग्य आहे का?’ असे त्राग्याने म्हणत भौंनी फुफ्फुसांच्या व्यायामासाठी तोंडाला फु गा लावला. तो फु गवताना ते मध्येच थांबले. ‘किमान आपल्या कार्यकर्त्यांना तरी अशा वाईट सवयी नको. सायंकाळच्या संबोधनात पाहिजे तर उदाहरण दुसरे देता येईल’ असे म्हणत त्यांनी फुग्यात इतक्या जोरात हवा भरली, की तो फट्कन फुटला. त्यामुळे नोंदी घेणारा सहायक दचकला. त्याने लगेच दुसरा फु गा त्यांच्या हाती दिला. ‘प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली की कामे मागे पडतात. मुळात हे सेवाकार्य आहे. याचा बागुलबुवा कशाला हवा? वरच्यांचे बघून खालचेही तसेच वागतात. आज साऱ्यांना चांगली समज द्यायलाच हवी,’ असे म्हणत त्यांनी पाण्याने अर्धवट भरलेला ग्लास हाती घेतला व ‘स्ट्रॉ’च्या साह्य़ाने त्यात बुडबुडे काढू लागले. थोडा दम लागल्यावर ते थांबले. ‘अरे, सत्ता हे साधन आहे. तेही सामान्यांच्या सेवेचे. अशा कठीण काळात कोण मदतीला धावून येतो, कोण चमकोगिरी करतो, हे लोक बरोबर लक्षात ठेवतात. वारंवार तोच तो चेहरा पाहूनही लोक कं टाळतात. हे वरच्यांच्या लक्षात भले येत नसेल, पण खालच्यांच्या लक्षात आणून द्यायला हवे. अंधानुकरणाचा इतका सुळसुळाट झालाय, की सारेच वरच्यांसारखे वागायला लागले. फोटोसाठी प्राणवायूचे सिलिंडर उपयोगात आणू लागले. असेल वरच्यांना आपण मोठे असल्याचा भ्रम, म्हणून काय खालच्यांनाही त्याचीच बाधा व्हावी? हे कु ठेतरी थांबायला हवे. आपल्या संस्कारात बसत नाही हे,’ असे म्हणत त्यांनी पुन्हा बुडबुडे काढायला सुरुवात के ली. त्याचा वेग भौंनी वाढवल्याने अचानक त्या ग्लासातले पाणी बाहेर उडायला लागले. नोंदी घेणाऱ्या सहायकाला साहेबांची अस्वस्थता लगेच ध्यानात आली. त्याने त्यांच्या हातातला ग्लास काढून घेत ‘रेस्पिरोमीटर’ त्यांच्या हातात दिले. व्यायामाच्या या प्रकारात ते थोडेफार रमले. अचानक त्यांना भुके ची आठवण झाली, पण व्यायामाबरोबर विचार महत्त्वाचा, असे वाटून त्यांनी त्यास मुरड घातली. थोडा वेळ गेल्यावर ते पुन्हा बोलले, ‘साऱ्या देशातले विरोधक पक्षाला ‘निवडणूक यंत्र’ म्हणून चिडवतात. निवडणुका, निवडणुका आणि फक्त निवडणुका. केवळ जिंकणे हेच ध्येय आहे का आपले? राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण- हा अर्थच विसरून गेलेत सारे. सत्ता मिळवली की झाले, याच समजात सारे खूष. अभूतपूर्व संसर्गामुळे समाज हवालदिल झाला असताना हा कसला वेडेपणा सुरू आहे? हे कुठेतरी थांबायला हवे. किमान आपल्या पातळीवर तरी! संकटकाळी कोण मदत करतो हे लोक बरोबर लक्षात ठेवतात. त्यासाठी प्रसिद्धीची गरज नसते..,’ असे म्हणत त्यांनी ‘सोहम्’ ला सुरुवात के ली. चांगला अर्धा तास श्वासाचा व्यायाम के ल्यावर ते उठले. ‘मी आता जे बोललो त्यातले ‘ऑफ द रेकॉर्ड’ काढून ‘ऑन द’ तेवढे माझ्या टेबलवर ठेव. सायंकाळी पदाधिकाऱ्यांना चार युक्तीच्या गोष्टी सुनवायच्या आहेत. किमान आपले लोक तरी प्रसिद्धीलोलुप नकोत,’ असे सहायकाला सांगत ते दिवाणखान्यात आले. तिथे फोडणीचा भात, पोळीचा चिवडा आणि संत्र्याचे सूप त्यांची वाटच बघत होते.