देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मोजक्या मंत्र्यांसोबत सत्तेची शपथ घेतली तेव्हापासून सत्ताधारी भाजपमधील आणि सत्तेत असूनही सत्तेबाहेर राहणाऱ्या शिवसेनेतील उर्वरितांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराकडे लागले. त्याला आता दोन वर्षे होतील. कधी ना कधी आपला नंबर लागेल या एकाच आशेवर राजकारण करणाऱ्या सत्ताधारी आमदारांसाठी वर्तमानपत्रातील विस्ताराची बातमी म्हणजे वाळवंटात दूरवर दिसणाऱ्या आणि दिसण्यानेही मनावर थंड शिडकावा करणाऱ्या मृगजळासारखी असली, तरी तिच्यामागे धावण्याची मृगतृष्णा काही कमी होत नाही. विस्ताराचे वेध हे सत्ताधाऱ्यांचे एक वेडच असते. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर महिनाभरानंतर सत्तेत शिवसेना सहभागी झाली, तेव्हा पहिल्या विस्तारात आपली वर्णी लागावी यासाठी देव पाण्यात घातलेले अनेक जण दिवसागणिक विस्ताराच्या बातम्या चघळत आहेत. या बातम्या सोडणाऱ्या तथाकथित सूत्रांचा भाव वधारतो हे लक्षात आल्याने सत्ताधारी पक्षाच्या मुख्यालयातील एक दालन ‘विस्तार कक्ष’ म्हणूनच राखीव ठेवण्याचा संबंधितांचा विचार असल्याचे समजते. या कक्षातून विस्ताराच्या ‘पुडय़ा’ सोडणाऱ्याचे वजन आपोआप वाढते, अशीही चर्चा असल्याने, या बातम्या सोडण्याची स्पर्धा सुरू होते आणि आपण त्यात मागे राहिलो तर आपले वजन घटेल या भीतीचे भूत मानगुटीवर वावरू लागते. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या विस्ताराच्या वावडय़ा कदाचित वास्तवात येण्याची वेळ आल्याने, पुडय़ा सोडण्याची स्पर्धा साहजिकच आहे. ‘माध्यमांचे सर्वात पौष्टिक खाद्य’ असे विस्तार-वावडय़ांचे कमीत कमी शब्दांत वर्णन करता येईल. ते खाद्य पुरविण्यासाठी प्रदेशाध्यक्षांपासून प्रवक्त्यापर्यंत सारे सरसावत असताना, ज्याच्या हाती हुकमाचे पत्ते, ते राज्यप्रमुख मात्र, ‘वर्षां’वरून विस्तार बातांचा वर्षांव न्याहाळण्यात दंग असतात, आणि हे माहीत असूनही विस्ताराची बातमी चुकू नये, त्यात कसूर होऊ  नये, यासाठी माध्यमे मात्र राष्ट्रीय कर्तव्य असल्याच्या भावनेने ही बातमी चघळू लागतात. कारण, कोणतीच अधिकृत सूत्रे या बातमीचा कधीच इन्कार करत नाहीत. विस्ताराचा प्रश्न संक्षेपात विचारला तरी त्यावर केवळ मान हलवून त्रोटक अनुकूलता दर्शविणारे संकेतसुद्धा बातमीच्या पुष्टीसाठी पुरेसे असल्याने, विस्ताराची बातमी ही सर्वाधिक विश्वासार्ह बातमी असते. एखाद्या दुकानात ‘आज रोख, उद्या उधार’ अशी कायमस्वरूपी पाटी दिसते. विस्ताराच्या बातमीतला ‘उद्या’ हा त्या ‘पाटीवरल्या उद्या’एवढाच आश्वासक असतो. टांगणीवर ठेवण्याची ताकद असलेली एकमेव राजकीय खेळी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या विस्ताराचे आता नवे वेध सुरू झाले आहेत!