पाश्चात्त्यांनी भारतीय संस्कृतीविरुद्ध केलेल्या कटाचा आणखी एक पुरावा हाती लागलेला आहे. हा पुरावा भले गाडीभर नसेल, पण छापील पुस्तकाच्या स्वरूपातील हा पुरावा त्यांच्या ‘बैलगाडा शब्दकोशा’एवढा जाडजूड आणि लांबीरुंदीनेही तितक्याच आकाराचा आहे. या लांबीरुंदीत एक  तसूही कमी भरला, वजनात एका गुंजेचाही फरक झाला तर आम्हाला ५० दिवसांनंतर भर चौकात फासावर लटकवा! असो. तर मित्रांनो, आपली संस्कृती ही सूर्यनमस्कार घालणाऱ्यांची संस्कृती आहे. वडय़ासारखे तेलकट पदार्थ आरोग्याला अपायकारक असतात, हे जाणणारी आहे. आपली संस्कृती उच्च आहे. अच्छे दिन कशाला म्हणायचे हे आम्हाला आईच्या गर्भातूनच उमगलेले असते. हजारो वर्षे झाली. अनेक शासक आले. त्यांनी आपल्यावर राज्य केले.  आपण भले त्या-त्या वेळी आपली बुद्धी गहाणही ठेवली असेल. साहजिकच होते ते, कारण राज्यकर्त्यांचे बळ जास्त होते आणि आपण पारतंत्र्यात होतो. आणीबाणीच्या प्रसंगी हे असेच करायचे असते. पण म्हणून आपली संस्कृती? ती अजिबात डागाळली नाही. बुद्धी गहाण, पण संस्कृती महान हे जगात केवळ आपल्यालाच जमले. हा इतिहास आहे. त्याचे जे काही करायचे ते आम्हीच करणार. अन्य कुणाचेही हात आमचा इतिहास, आमची संस्कृती बदलण्यासाठी धजावू नयेत. तरीही आमची भाषा कशी हीन आहे, असे दाखविण्याचे कटकारस्थान आता सुरू आहे. ‘बैलगाडा शब्दकोश’ हे या भाषाभ्रष्टीकरण षड्यंत्राचे साधन. इंग्रजांपासून मिळालेल्या स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली म्हणून मुद्दाम ७० शब्द या इंग्रजी शब्दकोशाने ‘भारतीय’ शब्द म्हणून आता इंग्रजीत आणले आहेत. सूर्यनमस्कार हा शब्द तोंडदेखला या शब्दकोशात आहे. पण त्यानंतर काय? ‘दादागिरी’ला ज्या संस्कृतीत स्थान नाहीच, जर असलेच तर ते तिची निर्भर्त्सना करण्यापुरते, तो शब्द या कोशात आहे. ‘वडा’ यासारखा वातकारक शब्दही मुद्दामच असणार, यात शंका नाही. त्याहीपेक्षा, भाषेसारख्या आणि ही भाषा ज्या संस्कृतीचा आरसा असते त्या संस्कृतीच्याही क्षेत्रात राजकारण घुसवण्याचा उद्योग सुरू आहे, अशी शंका घेण्यास पुरेपूर वाव आहे. एरवी ‘अब्बा’ म्हणजे जन्मदाता किंवा वडील, हा भारतीय शब्द म्हणून घुसवताना तात, पिताश्री या शब्दांकडे दुर्लक्ष करण्याचे कारणच काय? यावनी ‘गुलाब जामुन’ला स्थान देणारा हा कोश अमृतासमान चवीच्या ‘पंचामृत’, ‘पंचगव्य’ यांना अनुल्लेखाने मारतो. आज ‘अण्णा’ हा शब्द यांनी घुसवला, उद्या ‘लोकपाल’ शब्ददेखील कोशात हवा म्हणतील. ‘अच्छा’ हा शब्द आताच आठवण्यामागे जसे हीनदीन राजकारणच दिसते, तसेच त्यापुढल्या प्रकरणात ‘बापू’ असा शब्द मुद्दाम आत्ताच घेण्यामागे दिसेल. परके शब्द आपल्या भाषेत घेऊन स्वत:ची भाषा बाटविण्याचा उद्योग, इंग्रजांनो, जरूर करा! पण ‘बैलगाडा शब्दकोशा’तून आमची नालस्ती करणे थांबवा. नाही तर ‘बैलगाडा शब्दकोश’ म्हणजेच ऑक्सफर्ड डिक्शनरी, हे आम्हीही जगाला ओरडून सांगू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi words in oxford dictionary of english
First published on: 30-10-2017 at 03:27 IST