पहिली बातमी अशी की अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट सोमवारी दुपारी घेणार आहेत. दुसरी बातमी अशी की मोदी हे ट्रम्प यांच्यासह व्हाइट हाऊसमध्ये ‘डिनर’ करणारे जगातले पहिलेच सरकारप्रमुख ठरणार आहेत. यावर संभाव्य प्रश्न असा की, मोदी दुपारी भेट घेणार तर डिनर कसे करणार? उत्तर असे की, दुपारपासून रात्रीच्या भोजनापर्यंत मोदी हे व्हाइट हाऊसमध्येच असणार आहेत आणि उच्चस्तरीय चर्चाच करणार आहेत. हल्ली इकडे मोदी आणि तिकडे ट्रम्प सत्तारूढ झाल्यापासून काही लोकांनी प्रश्न विचारण्याची चळवळच आरंभली आहे. तेव्हा इतक्या सोप्या उत्तरानंतरही संभाव्य प्रश्न असेलच की, एवढा वेळ कसली चर्चा करणार? याचे उत्तर असे की, राजनैतिक चर्चा. म्हणजे काय ते आधी सांगायचे नसतेच. जे काही सांगायचे, ते चर्चा संपल्यावर. तेही शक्यतो दोघाही नेत्यांनी, एकत्रित पत्रकार परिषदेत सांगायचे, असा शिरस्ता आहे. तो ट्रम्प-मोदी भेटीत मोडला जाणार आहे. यावरही ‘का?’ असा प्रश्न असेलच. त्यावर उत्तरादाखल प्रतिप्रश्नांची सरबत्तीच करता येईल : दुपारपासून रात्रीपर्यंत पाच तास चर्चा करून शीण नाही का येणार? जरा आराम नको? मोदी कधीच आराम करीत नाहीत हे जगाला माहीतच आहे; पण ट्रम्प? त्यांना आराम नको? या चर्चेबद्दलची पत्रके निघतील, तेवढी पत्रकारांसाठी पुरेशी नाहीत? शिवाय सांगून सांगून सांगणार काय? तर चर्चा कशी फलदायी आणि यशस्वी झाली, हेच ना? दोघेही नेते हेच सांगतील, या विश्वासाला तरी कुणी प्रश्नचिन्ह लावू नये. तरीही कोणी ‘का?’ असे विचारलेच तर त्यालाही उत्तर आहे : ट्रम्प हे भारताला ‘खरा मित्र आणि भागीदार’ मानतात.. ‘ट्र फ्रेंड अ‍ॅण्ड पार्टनर’ असे भारताचे वर्णन ट्रम्प यांनीच, राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या पाचव्या दिवशीच, २५ जानेवारी २०१७ रोजीच केले होते. हा ताजा असला तरी हा इतिहास आहे. इतिहासाला तरी प्रश्न विचारू नयेत.. पण नाही.. हे चळवळवाले गुगलवर ‘डोनाल्ड ट्रम्प’ आणि ‘ट्र फ्रेंड’ या शब्दांची एकत्रित शोधाशोध करून काही तरी प्रश्न विचारणारच.. त्यापैकी एक संभाव्य प्रश्न असा की, ट्रम्प यांची नेमकी कुणाशी ‘खरी मैत्री’ आहे? उत्तर देण्यापूर्वी एक ठणकावून सांगितले पाहिजे की, गुगल ही काही या प्रश्न विचारणाऱ्या चळवळ्यांची मक्तेदारी नाही. कुणालाही गुगलवर शोधाशोध करता येतेच. त्यातून १५ मार्च २०१७ रोजी सौदी अरेबियाचे भावी राजे- तत्कालीन उपयुवराज आणि आता युवराजच झालेले मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांना ‘मुस्लिमांचे खरे मित्र’ असे म्हटले होते.. त्याहीआधी- किंबहुना ट्रम्प यांनी भारताला खरा मित्र म्हणण्याआधीच- २३ जानेवारी २०१७ रोजी इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना ‘इस्रायलचे खरे मित्र’ म्हटले होते.. ट्रम्प यांनीच २८ एप्रिल रोजी अमेरिकेतल्या बंदूकधाऱ्यांच्या संघटनेच्या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहून जाहीरपणे, ‘‘व्हाइट हाऊसमध्ये तुमचा खरा मित्र आहे’’ असा स्वत:चा उल्लेख केला होता, हे सारे गुगलोल्लेख खरेच आहेत. पण त्यावर कुणी प्रश्न विचारलाच तर प्रतिप्रश्न तयार असू दे : मोदी तर साऱ्यांनाच ‘मित्रों’ म्हणतात, तर ट्रम्प यांनी जगन्मित्र का असू नये?