सांप्रतकाळी शिक्षणाचे महत्त्व अमाप वाढलेले असून काही विशिष्ट क्षेत्रांतील प्रगत ज्ञान शिक्षणाद्वारे पदरात पाडून घेण्यासाठी अमाप पैसा मोजावा लागत असला, तरी शिक्षणाची काही दालने अशीही आहेत, जेथे कोणत्याही क्षेत्राचे ज्ञानदान केवळ विनामूल्य होत असते. अर्थात असे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याजवळ काही साधने असणे आवश्यक असते. त्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही त्या शिक्षणाची गुरुदक्षिणा! ..तसेही, सध्याच्या काळात एखादा मोबाइल फोन जवळ असणे कोणासच अशक्य नाही. तळहातावरच्या या साधनात शिक्षणाची सारी दालने सामावलेली आहेत, अशी परिस्थिती आहे. उदंड वेळ असेल, ज्ञानप्राप्तीची लालसा असेल, तर मोबाइल घेऊन कोणत्याही रेल्वे स्थानकावर जावे, तेथील मोफत वायफाय सेवेचा लाभ घ्यावा, आणि समाजमाध्यम नावाच्या विद्यापीठाची द्वारे उघडावीत. जगाच्या साऱ्या ज्ञानाचा जणू पूर्ण खजिना आपल्यासमोर खुला झाल्याचा भास आपल्याला होईल. त्याने हुरळून जावे आणि, ‘ज्ञान वाटल्याने वाढते’ या परंपरागत उक्तीनुसार, या माध्यमातून मिळणारे ज्ञान तसेच्या तसे पुढे ढकलून इतरांसही (मोफत) ज्ञानवंत करावे, हा समाजमाध्यम विद्यापीठाचा दंडक आहे.

याच माध्यमाच्या जोरावर राजकारण चालते, निवडणुकाही जिंकता येतात, आणि जगभरातील कोणाही नेता, अभिनेता किंवा सामान्य माणसापर्यंत चुटकीसरशी पोहोचताही येते. त्यामुळेच ‘यें हृदयीचे तें हृदयी’ करण्याचे हे आधुनिक साधन सर्वानीच आपलेसे केले आहे. या माध्यमाच्या जोरावरच जगातील सर्वशक्तिमान नेत्याची निवड केली जाते, आणि लोकप्रियता ठरविली जाते. ‘ब्रिटिश हेराल्ड’ नावाच्या स्वतस आघाडीचे नियतकालिक म्हणविणाऱ्या एका तथाकथित नियतकालिकाने पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचे आभासी सर्वेक्षण केले, आणि मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याची मुखपृष्ठकथा छापलेला अंकही निकालाआधीच छापूनही टाकला. बघता बघता ‘समाजमाध्यम विद्यापीठा’च्या सर्व दालनांवर ही बातमी झळकू लागली, आणि ‘शहाणे करूनि सोडावे, सकळ जन’ या शिकवणुकीनुसार, ही बातमी वायुवेगाने पुढे ढकलली गेली. जबाबदार माध्यमे म्हणविणाऱ्या काही वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनीही ही बातमी लोकापर्यंत पोहोचविण्याच्या कर्मयज्ञात हिरिरीने भाग घेतला. आपला सर्वोच्च नेता जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय नेता आहे हे जाहीर झाल्यावर भाजपची आणि तमाम भाजपाईंची छाती अभिमानाने आणखी फुलणे साहजिकच असल्याने, त्यांनीही बातमी पुढे ढकलण्याचे कर्तव्य पार पाडले.. समाजमाध्यमी विश्वविद्यालयातून हे वृत्तदान पार पडल्यानंतर कोणास तरी ‘ब्रिटिश हेराल्ड’च्या मुळाशी जावेसे वाटावे हे त्या बातमीचे दुर्दैव.. समाजमाध्यमांवर जेमतेम काही हजार अनुयायी असलेल्या, केरळातील कुणा नागरिकाने लंडनमधील पत्ता देऊन सुरू केलेल्या, आंतरजालविश्वात २८ हजार ५१८व्या क्रमांकावर असलेल्या, ट्विटरवर जेमतेम चार हजार अनुयायी असलेल्या एका चिमूटभर नियतकालिकाने जेमतेम दीडशे लोकांच्या मतदानातून पंतप्रधान मोदींना बहाल केलेल्या या लोकप्रियतेच्या प्रमाणपत्रामुळे ‘ब्रिटिश हेराल्ड’चे नाव मात्र सर्वतोमुखी झाले. ब्रिटिश हेराल्डच्या कथित सर्वेक्षणानंतर माध्यमदुनियेने उत्साहाने साजऱ्या केलेल्या या लोकप्रियतेच्या उत्सवामुळे आता या नियतकालिकाच्या जालनिशीवर उडय़ा पडू लागल्या आहेत. ब्रिटिश हेराल्डचे नशीब उजळले असले तरी अनेकांचे नशीब उघडे पडल्याने, समाजमाध्यमी विश्वविद्यालयाच्या लोकशिक्षणाचा मुखवटा स्पष्ट झाला आहे. ‘फेसबुक युनिव्हर्सिटी’ आणि ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’ नावाच्या ‘ग्लोबल’ विद्यापीठांच्या मोफत शिक्षणातून होणाऱ्या ज्ञानप्राप्तीचे मोल आता या विद्यापीठातील प्रत्येकास नक्कीच उमगले असेल..