मातीचे घट!

पूर्वी घराबाहेर पडताना पेरूचा पापा घेऊन जाणारी मंडळी मध्यंतरी मोरूचा पापा घेऊन जात.

पूर्वी घराबाहेर पडताना पेरूचा पापा घेऊन जाणारी मंडळी मध्यंतरी मोरूचा पापा घेऊन जात. म्हणजे पेन, रुमाल, चावी, पास आणि पाकीट यांतील पेनाऐवजी मोबाइल आला. अलीकडे त्यातही बदल झालाय. म्हणजे लोक पापा घेत नाहीत. ते त्यांना आपल्या संस्कारी सेन्सॉर बोर्डाचे भय वाटते म्हणून नव्हे! लोक पापाऐवजी पॉपा घेतात. याचे कारण हा पॉ त्यांना अधिक जीवनावश्यक वाटू लागला आहे. किंबहुना तो असणे वा नसणे हा थेटच मोबाइलच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेला आहे. एवढय़ावरून तंत्रजाणत्यांना बरोबर लक्षात आले असेल, की हा पॉ म्हणजे पॉवरबँकेतला. प्रत्येकाच्या पाठथैलीत हा ऊर्जाघट असतोच असतो. आता आपल्याकडे कसे असते ना, की जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ ही असलीच पाहिजे. ही भारतीय परंपरा आणि त्या परंपरेचे पाईक होणे हे आपले परमकर्तव्य. तेव्हा पॉवरबँकेमध्ये भेसळ असणे हे अत्यावश्यकच झाले. त्यातील विजेमध्ये भेसळ करण्याचे तंत्र अजून तरी आपण शोधून काढलेले नाही. विजेला आपण आकडे लावू, तिला क्षणोक्षणी पडे उठे परी बळे असे भारनृत्य करावयास लावू, परंतु तिच्यात भेसळ कशी करणार? तेव्हा त्या ऊर्जाघटातच भेसळ करणे क्रमप्राप्त ठरले. एकदा ते नक्की झाल्यानंतर त्यात कोणता कचरा घालायचा एवढाच प्रश्न होता. तो सोडविणे आपल्या ‘स्किल्ड इंडिया’च्या हाताबाहेर नव्हते. त्याने तेथे माती आणि रेती वापरली. काहींच्या मते ही माती मुळात चिनी आहे. चिनी ऊर्जाघटांमध्येच ती आढळते. हे अत्यंत भयंकर आहे. याचा अर्थ असा होतो, की चीनने भारतीयांस भावणाऱ्या (म्हणजे स्वस्तातल्या!) वस्तू बनवताना तंतोतंत भारतीय परंपरेचीही नक्कल केली आहे. याबद्दल चीनवर स्वामित्वहक्क भंगाचा खटलाच भरावयास हवा. त्यांना हे दाखवून द्यायला हवे, की पॉवरबँक आणि त्यातील माती हे काही भारतासाठी नवे नाही. येथील अनेक मी मी म्हणणाऱ्या पॉवरबँकांचे किमान पाय तरी मातीचे असल्याचे आपण पाहिले आहे. महाराष्ट्रात म्हणाल तर खरी पॉवरबँक एकच. जाणत्यांना ती चांगलीच माहीत आहे. पण तिचे पाहा. साध्या मुंबई ते दिल्ली प्रवासात दिल्लीत पोहोचेपर्यंत तिचे चार्जिग संपलेले असते. हल्ली तर सत्तेच्या चार्जरअभावी तिला ऊर्जाभारित होताना नाकी नऊ येत आहेत. अशीच एक ‘धी अमेठी पॉवरबँक प्रा. लि.’ची पॉवरबँक हल्ली बाजारात दिसते. पण चार्जिग करायचे तर तिला देशाबाहेर पाठवावे लागते. देशात येताच ती चांगलीच ऊर्जा देते. पण दोन दिवसांत उतरते. याचे कारण काय, तर माती! या अशा भेसळयुक्त पॉवरबँकांना कंटाळल्यामुळेच लोक हल्ली नवनव्या कंपन्यांच्या पॉवरबँका आजमावून पाहत आहेत. अर्थात तेही मातीचेच ऊर्जाघट नसतील याची खात्री नाही. परंतु शेवटी आशेच्या बॅटरीची एक काडी उरली तरी लोक तिला धरून ठेवतातच ना!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Power banks for mobiles

ताज्या बातम्या