गुजराती भाषेत ‘जेनो काम तेनो थाय’ अशी एक म्हण आहे. आपले जे क्षेत्र नाही, त्याही विषयात अधिकारवाणीने बोलण्यासाठी वरच्या दर्जाचा हुच्चपणा असावा लागतो. तो रामदेवबाबांकडे आहे, असे त्यांच्या वर्तनावरून आणि बोलण्यावरून पुन:पुन्हा दिसते आहे. दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपित होणाऱ्या त्यांच्या योगसाधना ते देशातील काळा पैसा परत आणण्यासाठी आंदोलन ते स्वत:ची कंपनी असा त्यांचा इतिहास सारा भारत जाणतो. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला भगव्या रंगाचे जन्मापासूनच वेड असल्याने त्या रंगाचा वेश परिधान करणारे सगळे आपोआपच त्या पक्षाशी जोडले जातात. रामदेवबाबा त्यातलेच. दिल्लीतील त्यांच्या आंदोलनात त्या वेळच्या काँग्रेस सरकारने केलेल्या कारवाईच्या वेळी साडी नेसून पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न सगळ्या देशवासीयांनी उघडय़ा डोळ्यांनी पाहिला. तरीही त्यांच्या लोकप्रियतेत मात्र घट झाली नाही. ही झिंग भल्याभल्यांना भलतीकडे नेते, असा अनुभव गाठीशी असताना या बाबांनीही त्याच मार्गाने जाऊन आपले हसू करून घ्यायचे ठरवलेले दिसते. पुण्यातील एका कार्यक्रमात, ‘परदेशी कंपन्यांना बोलावून कसले मेड इन इंडिया करता?’ असा खडा सवाल करून त्यांनी आपले अज्ञान प्रकट केले. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या पहिल्या भाषणात ‘मेड इन इंडिया’ या कल्पनेचा उच्चार केला होता. तो या बाबांना आठवत नसावा. बरे, ते भाषण इंग्रजीतून नव्हते, तरीही रामदेवबाबांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. असते एकेकाचे इंग्रजी कच्चे! ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेड इन इंडिया’ या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि यापैकी जुन्या ‘मेड इन इंडिया’चे कौतुक जागतिकीकरणाबरोबरच हळूहळू ओसरू लागले, हे आजच्या सत्ताधाऱ्यांना कळले तरी या बाबांना अद्यापही कळलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांची गल्लत झाली आणि ते काहीबाही बोलून गेले. सध्याच्या सरकारातील त्यांचे स्थान घटनाबाह्य़ असले, तरीही त्यांच्याबद्दल कमालीचे ममत्व असणारे अनेक जण तेथे असल्याने, त्यांचा प्रत्येक शब्द झेलण्यात अनेकांना धन्यता वाटते. या बाबांपेक्षा मोठी घटनाबाह्य़ सत्ताकेंद्रे याआधीच्या काँग्रेसी सरकारांकडे होती, पण ही सत्ताकेंद्रे सरकारप्रमाणेच सहसा मौन पाळत. रामदेवबाबांनी मात्र जो विषय आपला नाही, त्यातही तोंड घातले. योग हा त्यांचा विषय खरा. प्रात्यक्षिकाने ते सिद्धही करून दाखवतात. म्हणून काय त्यांनी देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासावरही आपले मननीय विचार व्यक्त करायला हवेत काय? सरकारात त्यावर विचार करणारे अनेक जण आहेत. विरोधी बाकांवर असलेलेही अनेक जण या विषयातील तज्ज्ञ आहेत. त्यांच्यातील वाद हा बौद्धिक स्वरूपाचा असू शकतो. रामदेवबाबांनी आपले अज्ञान प्रकट करताना केलेली गल्लत पाहता, नजीकच्या भविष्यात रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या कामकाजातील त्रुटीही ते सहजपणे जाहीररीत्या सांगू शकतील. सरकारातील कुणीही त्यांच्या या वाक्ताडनाबद्दल कधी बोलणार नाहीत, ही तर खरी ग्यानबाची मेख आहे!