‘शिवशाही’ धावेना..

‘हे बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय. ही शिवशाही बस आमची आहे.

‘हे बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय. ही शिवशाही बस आमची आहे. तुम्हाला तुमची राजधानी एक्स्प्रेस आहे ना. मग आणखी ही शिवशाही बस कशाला हवी? आता आम्हाला शिवशाही चालवण्याची संधी मिळालीच पाहिजे..’ चालकाच्या जागेपर्यंत पोहोचलेल्या वाहकाने चालकाला बजावले. तेवढय़ात प्रवाशांतून ‘ओ.. गाडी चालू करा’, असा आवाज आला. चालकाने एकवार वाहकाकडे पाहिले. ‘किती वेळा तुम्हाला सांगायचे? अहो शिवशाही आम्ही चालवावी, अशी प्रवाशांचीच इच्छा आहे. ३२.०७ टक्के प्रवाशांना तसे वाटते. तुम्ही शिवशाही चालवावी असे १४.७२ टक्के प्रवाशांना वाटते. आता यातली कुठली संख्या मोठी सांगा’. चालकाने वाहकाला सांगितले. प्रवाशांतून पुन्हा एकदा आवाज आला ‘ओ.. अहो सुरू करा ना गाडी. कसली टक्केवारी सांगताय आम्हाला. गणिते, कोडी असल्या भलत्या फंदात नाही पडत आम्ही. आमचे जे काही असते ते थेट असते, पारदर्शक असते. डिड यू नो?..’ वाहकही मागे हटेना. ‘तुमचे व्यवहार पारदर्शक असतात म्हणताय? चार दिवसांपूर्वी एक प्रवासी, आमच्याकडून तिकिटाचे जास्त पैसे घेतले असे ओरडत होता, ते कशाला?’ चालकाने आठवण करून दिली. ‘..आणि परवा मागचे चाक पंक्चर झाले होते, असे सांगून पंक्चर काढण्यासाठी पेटीतले पैसे घेतलेत. पण नंतर कळले की चाक पंक्चर झालेच नव्हते’, चालकाने मुद्दा काढला. ‘तुम्ही कुणावरही विश्वास ठेवता ही मोठी समस्या आहे. तो प्रवासी शिवशाहीतला नव्हताच आणि पंक्चरचे म्हणाल तर चाकावर खुणा दिसतील. जाऊन बघा आत्ताच्या आत्ता’, वाहकाने सांगितले. प्रवाशांमधून ‘गाडी.. गाडी..’ असा गलका झाला. चालक गालातल्या गालात हसला. ‘आम्ही इतके भैताड वाटलो काय तुम्हाला? म्हणजे चाक बघायला आम्ही गेलो की तुम्ही आमच्या जागेवर बसणार. तुमचे डाव समजत नाहीत आम्हाला असे वाटते की काय?’ चालकाने सांगितले. आता मात्र प्रवाशांचा संयम सुटला. चार-पाच प्रवासी तावातावाने पुढे आले. ‘ज्याला हवी त्याने गाडी चालवा.. पण सुरू तर करा ना गाडी. किती वेळ थांबलोय नुसतेच..’ त्यांनी चढा आवाज लावला. त्यासरशी चालक-वाहक दोघेही जरा चपापले. ‘बघून घेईन नंतर’, असे पुटपुटत, पाय आपटत वाहक मागे सरला. चालकाने हसत हसत खिशात हात घातला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब झाले. त्याने दुसरा खिसा चाचपला आणि त्याचा चेहरा गोरामोरा झाला. भांबावल्यागत तो इकडेतिकडे पाहू लागला. मागे उभे असलेले प्रवासी ओरडलेच एकदम.. ‘ओ.. कसली वाट पाहताय? हाणा की गाडी’. अपराधी भाव चेहऱ्यावर आणून चालक मान खाली घालत पुटपुटला.. ‘चावी हरवलीये कुठेतरी. मिळत नाहीये. त्यामुळे शिवशाही चालूच होणार नाही..’ त्यासरशी गाडीतील प्रवाशांतून अवघ्या बाराखडीचा वापर करीत विविधार्थी शब्दांचा मारा चालकावर झाला.. त्यातील काही शब्द वाहकाचेही होते..

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv shahi bus transport service