आदरणीय गुरुजी शिरसाष्टांग; नमस्कार तुम्हाला. कोपरापासून हाताच्या तळव्यांपर्यंत हात खूपच दुखतायत. काल अभ्यास न केल्याने तुम्ही नेहमीसारख्या छडय़ा, ओढल्या त्यामुळे दुखत असतील असे तुम्हाला वाटेल. पण हात दुखतायत ते वेगळ्याच कारणाने आणि पाठही दुखतेय खूप; धपाटे घातल्याचा हा परिणाम असे तुम्हाला वाटेल. शाळेत सक्काळी आल्याआल्या सूर्यनमस्कार आणि योगासने करणे आपल्याही शाळेत सक्तीचे करण्याचा विचार चालला आहे, असे ऐकल्यानंतर वर्गातल्या काही मुलांचे हात आणि पाठ आधीपासूनच दुखायला लागली आहे, असे तुम्हाला, वाट्टेल तसे नाही गुरुजी आमचे हात आणि पाठ दुखण्याचे कारण तुम्हाला माहितीही आहे. नाही, मी काहीच नवीन सांगत नाहीये. तेच ते रोजचे दुखणे, आहे ओझे उचलण्याचे. मुंबईतले तावडेमास्तर कधीपासून म्हणतायत तुम्हाला ओझेवाहू प्राणी, वाहून नेतात तसले ओझे पोरांच्या पाठीवर लादू या. नको म्हणून पण तुम्ही ऐकत नाही ते नाहीच. तावडेमास्तर मुंबईत शाळांमध्ये वजनकाटा घेऊनच फिरतात. छायाचित्रकारही संधी बरोब्बर साधून छायाचित्रे काढतात. म्हणजे तावडेमास्तर वजनकाटय़ाला दप्तर टांगतायत आणि वजन बघतायत हसण्यावारी, सोडून देण्याचा विषय नाहीये हा. फारच गंभीर विषय आहे. वह्या, पुस्तके, कंपासी आणि काय? काय विचारू नका. दप्तरात काय भरलेले असते. पण त्यांचा वजनकाटा मुंबईत आणि आम्ही इथे चंद्रपुरात. इथे म्हणजे सगळाच अनुशेष समाधानी. जगण्याचा प्रयत्न करतात तरीसुद्धा इथले लोक. पण तावडेमास्तरांना एकच विनंती कराल का गुरुजी तुम्ही की, त्यांनी जरा इकडे यावे. उगाचच, वरवर सांगत नाहीये मी. अगदी कळकळीची विनंती आहे त्यांना आमची. वाटल्यास मुख्यमंत्रीसाहेबांना पत्र पाठवून तावडेमास्तरांना इकडे पाठवायला सांगाल का? त्यांना सांगा, एक-दोन दिवसांसाठी पाठवा फार तर, आनंदाने तयार होतील. तेवढय़ाने खरे तर भागणार नाही. जास्ती दिवस त्यांनी यायला पाहिजे इकडे. पण ठीक आहे. तेवढे तर तेवढे. त्यांनी इकडे येऊन बघावे,  की किती ओझे आम्ही रोज वाहात आहोत. हलके वाटावे असे काहीच नाही. पाठीवरती आता खरे तर दप्तराचे वजन किती असावे याबाबत नियम करण्यात आले आहेत; सरकारकडून पण ते पायदळीच तुडवले जातात. त्यामुळे आमच्या पाठीवरच्या ओझ्याला विराम मिळेल असे काही चिन्ह नाही. म्हणूनच तर आम्ही एकदम पेपरांत बातम्या देणाऱ्या काकांनाच सांगितले सगळे. ते छापून आल्यानंतर तरी आता जाग येईल. सगळ्यांना असेच वाटते.

ताजा कलम : एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे तावडेमास्तरांच्या दिल्लीतल्या मास्तरांनी परवा विरामचिन्हांच्या इतिहासात काही मोलाची भर घातली, आहे असे घरचे म्हणत होते. त्यामुळे भाषेला नवा अर्थ मिळतो, असे सगळे सांगतायत. माझ्याही भाषेला नवा अर्थ मिळावा, म्हणून मी त्या दिल्लीच्याच मास्तरांचा प्रयोग करून बघितला आहे. चूक घ्यावी, भूल द्यावी.