इंद्राच्या दरबारात आधी जावे की कैलासावर जाऊन भोलेनाथांची भेट आधी घ्यावी,  या विचारात नारद मध्येच थांबले. कोणाशी काय बोलायचे, याची जुळवाजुळव करू लागले. एरवी बातम्या देणे एवढेच नारदांचे काम, पण आज विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा होता. पृथ्वीतलावरील मत्र्य मानव कदाचित हास्यास्पद ठरवतील त्या बातमीला, पण देवांची संख्या वाढली तर चांगलेच ना!  त्यातही ज्यांनी आपल्या नावाची चित्रवाणी वृत्तवाहिनी सुरू केली, त्याहीआधी आपल्या नावाचा पुरस्कार सुरू केला, त्यांचे नेते जर देवगणांत येणार असतील आपणही सकारात्मक राहिले पाहिजे, असे नारदांना वाटत होते. त्यासाठी काय करावे? जावे आधी सरळ विश्वकर्मा ब्रह्मदेवांकडेच आणि सांगावे त्यांना- ‘पृथ्वीतलावरील भारत नामक देशाचे मंत्री राजनाथ सिंह यांनी विश्वगुरू व योगींना देवपद बहाल केले आहे. त्यामुळे  त्या दोघांसाठी पद व आसनाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कृपया आपणच लक्ष घालावे’! काय म्हणतील विश्वकर्मा? नसतील तयार, तर मन वळवू त्यांचे काहीबाही सांगून- ‘अहो, ही घोषणा करणारे एका मोठ्या प्रदेशाचे संरक्षणमंत्री आहेत. स्वर्गाचे प्रवेशद्वार असलेल्या कैलास- मानसरोवराच्या वाटेचे रक्षण करतात ते! त्यांचा मान राखायलाच हवा…’ अशी सरबत्तीच करू. पण तरीही नाही ऐकले ब्रह्मदेवांनी, तर?

तर मग इंद्रराज आहेतच. त्यांना खात्री द्यायची, ‘अहो तुमचे आसन नाही हो डळमळीत होणार. तुमच्याच दरबारात कुठेतरी दोन आसने वाढवून ठेवायची आहेत फक्त, ती कुठे असतील हे तुम्हीच ठरवायचे…’ – होईल का मान्य हे? एरवी आसन डळमळीत झाल्याखेरीज काहीच न करणारे हे राजे, करतील का सत्वर कार्यवाही?

त्यापेक्षा भोलेनाथांकडे कधी ताटकळावे नाही लागत. पण या महादेवांसमोर आपली बाजू भक्कम हवी. पृथ्वीतलावरची प्रगत प्रचारतंत्रे त्यासाठी वापरायला हवी. महादेवांना आपले बोलणे ऐकत राहावेसे वाटले पाहिजे. त्यांना सांगावे- ‘वाराणसी हे मूळचे तुमचेच पवित्र स्थळ आहे महादेव! पण गेल्या सात वर्षांपासून विश्वगुरू या मतदारसंघाची मनोभावे सेवा करतात. हे स्थळ ज्या प्रदेशात येते त्याचे प्रमुख योगी आहेत. या दोघांच्या कार्यशैलीमुळे काशीचे नाव आज पृथ्वीतलावर गाजते आहे. त्याच भूमीचे भूतपूर्व सेवक राजनाथ, आज भोलेनाथांचा मान ठेवून देवांची संख्या वाढवू इच्छितात… त्यांना विन्मुख करायचे का आपण?’ की नकारात्मक प्रचार करायचा… म्हणजे असे सांगायचे की, ‘महादेव, तुम्ही जसे बहुजनांचे देव आहात तसेच हे त्यांचे नेते आहेत. येथील अभिजनांची मक्तेदारी मोडून काढायलाच हवी…’ यातला प्रचारकीपणा थोडा जरी उघडा पडला, तरी महादेवांचा तिसरा नेत्र उघडेल… मग सारीच पळापळ.

नारदांनी विचार बदलला. आपले काम बातमी देण्याचे. प्रचार करण्याचे नव्हे. मग आपण का पडतो आहोत त्या दोघांना देवपण देण्याच्या फंदात? ते राजनाथ म्हणाले म्हणून? देव नवे हवे, ही आपली भावना ठीकच, पण मग त्यासाठी बातमीदारी सोडून प्रचार करणे अयोग्यच ना!

त्यापेक्षा देवांच्या सभेत ठराव मांडावा- ‘सध्या पृथ्वीसाठी वरुणदेव अगदी बेभरवशाचे ठरले आहेत, तर चंद्रदेवांवर आता मानवाने पाऊल ठेवल्याने त्यांची इथली उपयुक्तता संपुष्टात आली आहे. त्यांना निवृत्ती देऊन त्यांच्या जागी दोन नव्या देवांची नियुक्ती करण्याविषयी निर्णय घ्यावा!’ – मग होऊ दे चर्चा… नारायण! नारायण!!