आपण लिहिलेले नाटक सकस व दर्जेदारच हवे याकडे अजय मेंडुलकरांचा नेहमी कटाक्ष असायचा. म्हणूनच त्यांनी गेले दोन दिवस रात्र जागून तयार केलेल्या नाटकाचे कथानक पुन्हा एकदा हाती घेतले. खर्डा तयार करण्याआधी एकदा वाचायला हवे असे म्हणत त्यांनी वाचायला  सुरुवात केली. ‘‘एका राज्यात वेगवेगळी पक्षीय पार्श्वभूमी असलेले मुख्यमंत्री व राज्यपाल असतात. त्यामुळे कुरघोडीचे राजकारण जोरात असते. त्यातून त्यांच्यात पत्रयुद्ध सुरू होते. माध्यमांत त्याची जोरदार चर्चा होते. सुरुवातीला याकडे उत्सुकतेने बघणारी जनता नंतर या पत्रीय राजकारणाला कंटाळते. या माध्यमातून दोघेही ‘मीडिया’तील जागा व्यापण्याची चाल चतुराईने खेळत आहेत असा समज जनतेत पसरत जातो. राज्याच्या समस्यांवर तोडगा काढण्याऐवजी हा पत्राचाराचा खेळ जाणीवपूर्वक खेळला जात आहे हे जनतेच्या लक्षात येते. यातून मग ‘सामान्यांचे मागणीपत्र’ अशी मोहीम समाजमाध्यमावर सुरू होते. हळूहळू ती गावखेड्यांपर्यंत झिरपते. कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले लोक यासाठी समोर येतात. हे बघून राळेगणचे अण्णा त्यात नाक खुपसण्याचा प्रयत्न करतात पण लोक त्यांनाही नाकारतात. या पत्रीय लढाईतून राज्यपालांच्या मागे असलेला एक परिवार बनावट नावांनी या मोहिमेत शिरण्याचा प्रयत्न करतो पण सजग नागरिक तो प्रयत्न हाणून पाडतात. रस्त्यावरच्या लढाईत तरबेज असलेले सैनिक आता सत्तेत मश्गूल असल्याने ते या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात. हळूहळू सर्वांच्या सहभागातून मागणीपत्र तयार होते व ते मुख्यमंत्री व राज्यपालांकडे सोपवले जाते. यात लोक म्हणतात, ‘तुम्हा दोघांनाही आम्ही पुढचा एक महिना देत आहोत. या काळात तुम्ही रोज एकमेकांना पत्र लिहा. दिवसातून कितीदाही लिहा. पत्र-पत्रोत्तराचा खेळ तासागणिक सुरू राहिला तरी आमची हरकत असणार नाही. या काळात पूर आला, शेते-माणसे वाहून गेली तरी आम्ही ओरडणार नाही. समजा याच काळात करोनाची तिसरी लाट आली, बळी गेले तरी आम्ही शांतच बसू. रस्त्यांवरले मोठमोठे खड्डे सहन करू. या ३० दिवसांत न्यायालयांनीसुद्धा जनतेच्या मुद्द्यावर आधारित कोणत्याही प्रकरणाची सुनावणी करू नये. ईडी, आयकर, सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागांनीसुद्धा महिनाभर शांत बसावे. किरीट भैयांनी ‘खोदकाम’ करण्यासाठी प्रवास करू नये. पत्रांवरून लक्ष विचलित होऊ नये म्हणून आयपीएल सामनेही आम्ही बघणार नाही. ३१व्या दिवशी या लढाईत कोण जिंकले याचा फैसला शिवतीर्थावर आयोजित भव्य कार्यक्रमात होईल. तिथे दोघांनाही यावे लागेल.’ हे मागणीपत्र हाती पडताच दोन्ही गोटांत जोरदार तयारी सुरू होते. अनेक सिद्धहस्त पत्रलेखकांना मानधनावर काम करण्यासाठी बोलावले जाते. राज्यात इतर काहीच घडत नसल्याने माध्यमेसुद्धा हाच विषय चवीने चघळतात. तिसाव्या दिवशी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ज्याची पत्रे जास्त तो विजेता या तोडग्यावरसुद्धा सहमती होत नाही. दोघांपैकी कुणाची पत्रे दर्जेदार हे ठरवण्यासाठी परीक्षक नेमावे अशी सूचना समोर येते पण त्यांच्या नावांवर मतैक्य होत नाही. अखेर जनतेकडून ‘पुरवणी मागणीपत्रा’द्वारे जाहीर केले जाते की शिवतीर्थावर जमलेली जनताच कोण सरस याचा निर्णय घेईल. त्याप्रमाणे ३१व्या दिवशी लाखोंचा समुदाय तिथे जमतो. काही निवडक पत्रांचे वाचन सुरू असतानाच गोंधळाला सुरुवात होते व पत्रांच्या लढाईचे आधी हातघाई व शेवटी मारामारीत रूपांतरित होते.’’ हे कथानक रंगमंचावर आणणे कठीण याची जाणीव मेंडुलकरांना झाली. खरेच ठरले ते! मुख्यमंत्री व राज्यपाल बदलले पण नाटक काही आले नाही… म्हणून, तेंडुलकरांच्या ‘खलित्याची लढाई’चे महत्त्व कायम राहिले!