स्वर्गलोकी नेमाने शतपावली करणाऱ्या रवींद्रनाथ, शरत्बाबू व सत्यजितदांच्या चेहऱ्यावर उदासीचे मळभ दाटून आले होते. अलीकडच्या काही दिवसात बंगालमधील घडामोडी हाच त्यांच्यातला चर्चेचा विषय होता. चालता चालता अचानक थांबून त्वेषाने रवींद्रनाथ उद्गारले ‘‘अरे, आयुष्यभर मी प्रेमच वाटले. कथा, कवितांमधून भारतीय अध्यात्माचा अर्थ लोकांना समजावून सांगितला. आणि हे रोज कॅमेरे लावून स्वत:ची तुलना माझ्याशीच करू लागले आहेत. नुसती दाढी वाढवली म्हणजे झाले का? आणि भाषा, ती तर आणखीच..!! ती दीदी स्कूटीवरून पडली तर वगैरे वगैरे. या अशा भाषेला भद्रलोकीची जनता भुलेल असे वाटते की काय यांना? कुठे आपली देशभक्ती व कुठे यांची. सारेच रसातळाला नेलेय रे यांनी. त्या शांतीवनकडे तर बघवत नाही..’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे ऐकून शरत्बाबूंना राहावले नाही, ‘‘आयुष्यभर समाजातल्या दलित पीडित महिलांच्या व्यथा लेखनातून मांडल्या. हेतू हाच की, समानतेचे बीज रुजावे. दीदीला कारभाराची संधी मिळाली तेव्हा वाटले लिहिण्याचे चीज झाले. पण कसले काय? पुढे साराच भ्रमनिरास!  प्रत्युत्तर देण्याच्या नादात ही बाई चंडीपाठ काय वाचते, हिंदूच नव्हे- ब्राह्मण असल्याचे सांगते. असा बंगाल नव्हता रे आपला. त्या दीदीचे लोक भरसभेत बलात्काराची भाषा काय करतात; मृत्यूचे प्रमाणपत्र घेऊन राजकारण करतो असे तावातावात सांगतात. एका महिलेच्या नेतृत्वाखाली हे बिनदिक्कतपणे चालते. असले सक्षमीकरण अपेक्षित नव्हते हो मला. सरंजामशाही संपावी, पण त्याचबरोबर अन्यायही संपावा याच हेतूने लिहित गेलो. आता तर अन्यायाची नुसती भाषाच नाही तर उघडपणे अन्यायही केला जातो. राजकारण, फुटबॉल व नाटक यांवरचे प्रेम समजू शकतो; पण कायम ही ‘काटो, मारो’ची भाषा? आपला ‘सोनार बांगला’ असा नव्हता कधी! धर्माला राजकारणात एवढे स्थान मिळेल याची कल्पनाही तेव्हा मनाला शिवली नव्हती कधी.’

बाबूंचा उद्वेग समजून घेत मग सत्यजितदा बोलू लागले, ‘‘आशयघन चित्रपटां’चा वारसा सांगणाऱ्या या भूमीवर त्या मिथुनच्या रूपात कोब्रा निपजावा हे फारच वेदना देणारे आहे! स्वत:ला असे म्हणवून घेताना यांना काहीच वाटत नाही? काय तर म्हणे, एका दंशात तुमचे छायाचित्र भिंतीवर टांगले जाईल. अरे, माणसांची नाही तर किमान प्राण्यांची इज्जत तरी ठेवा रे! दोनचार सर्पपटात काम काय केले, तर स्वत:ला कोब्राच समजायला लागला. प्रेमाऐवजी विषाची भाषा करू लागला. या बंगाली भूवर मी तर कधी इतका द्वेष बघितला नाही. त्याचे ते विधान ऐकून मला पांडवांनी खांडववन जाळल्यावर एकमेव शिल्लक राहिलेल्या तक्षक या सापाचीच आठवण झाली. कायम गरिबांचा विचार करणारा प्रदेश तो हाच का, असा प्रश्न मला अलीकडे रोज सतावतो! माझे सोडा, पण या मिथुनला ‘मृगया’त अभिनयाची पहिली संधी देणारे मृणाल सेन आणि नंतरच्या कलावंतांनीसुद्धा जगभर बंगाली अस्मिता पोहोचवली ती त्यांच्या भावस्पर्शी चित्रपटांतून. आणि हा गल्लाभरू दादा त्यावरच पाणी ओतायला निघाला..’’ बोलून थकल्याचे लक्षात येताच सत्यजितदा थांबतात.

मग तिघेही एका ठिकाणी बसतात. बराच काळ कुणी बोलत नाही. तिघांच्याही मनात घोंघावणारे विचाराचे वादळ मात्र सारखेच असते. आपली प्रिय भाषा बंगाली असेल, पण राजकारणाची भाषा आज बदललीच आहे, याची ती हतबलता असते.

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ulta chasma the language of politics zws
First published on: 11-03-2021 at 00:34 IST