एखाद्या उभरत्या खेळाडूने टेनिसमधील सर्वात प्रतिष्ठेच्या ग्रँड स्लॅम जेतेपदाला गवसणी घातली, तर त्याला आकाश ठेंगणे वाटू लागते. काही जण तर आनंदाने कोर्टवरच लोळण घालतात, आनंदाने उडय़ा मारून जल्लोष करतात. काही जण या अतिउत्साही खेळाडूंपेक्षा वेगळे असतात. स्वित्र्झलडचा स्टॅनिस्लॉस वावरिंका हा याच जातकुळीतला. जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाच्या राफेल नदालला हरवून कारकिर्दीतील पहिल्यावहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरल्यानंतरही वावरिंकाने साधेपणाने आनंद साजरा केला.
प्रथेप्रमाणे दुसऱ्या दिवशी जेतेपदाच्या करंडकासह त्या शहरातील ऐतिहासिक वास्तूसमोर विजेत्याचे फोटोसेशन केले जाते. शॅम्पेनचा वर्षांव केला जातो. पण जल्लोष करण्यासाठी वावरिंकाच्या हातात शॅम्पेन सोपवल्यानंतरही त्याने नम्रपणा सोडला.. कोणताही जल्लोष केला नाही. हाच तो नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि अँडी मरे या चार खेळाडूंची ग्रँड स्लॅम जेतेपदांवर वर्षांनुवर्षे असलेली मक्तेदारी मोडून काढत जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडणारा वावरिंका.. आता जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होण्याचे त्याचे स्वप्न आहे. वयाच्या आठव्या वर्षीपासून टेनिस खेळणाऱ्या वावरिंकाचे ज्युनियर स्तरावर पदार्पण १४ व्या वर्षी झाले. त्यानंतर वयाच्या २८ व्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपदापर्यंत वावरिंकाने घेतलेली भरारी थक्क करणारी आहे. सीएनईडी या फ्रान्समधील संस्थेकडून शिक्षण घेताना त्याला टेनिसमधील बारकावे शिकता आले. २००३ मध्ये त्याने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या ज्युनियर गटाचे जेतेपद पटकावल्यानंतर चॅलेंजर स्पर्धाची दोन जेतेपदे मिळवली. २००६ मध्ये नोव्हाक जोकोव्हिचने अंतिम फेरीत माघार घेतल्यामुळे वावरिंकाला पहिल्या एटीपी जेतेपदावर नाव कोरता आले.
बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत फेडररसह खेळताना दुहेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्या फेडररला आदर्श मानून वावरिंकाने टेनिसचे धडे गिरवले, त्या फेडररवर त्याने माँटेकार्लो स्पर्धेत पहिल्यांदा मात करून सर्वाची वाहवा मिळवली. त्यानंतर कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे वावरिंकाला मोठी मजल मारता आली नाही. पण २००४ मोसमाच्या सुरुवातीलाच त्याने चेन्नई खुली स्पर्धा जिंकत धडाकेबाज पुनरागमन केले. वेगवान सव्र्हिस, परतीचे जोरकस फटके, बॅकहँडचा ताकदवान फटका आणि आक्रमक खेळ करणाऱ्या वावरिंकाने ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिचसारख्या मातब्बर प्रतिस्पध्र्याचा पाडाव केला. त्यानंतर दुखापतग्रस्त असलेल्या नदालला हरवत त्याने ग्रँड स्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली. आता भविष्यात आणखीन ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच त्याच्या आनंदात अतिउत्साहीपणा जाणवत नव्हता.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2014 रोजी प्रकाशित
स्टॅनिस्लॉस वावरिंका
एखाद्या उभरत्या खेळाडूने टेनिसमधील सर्वात प्रतिष्ठेच्या ग्रँड स्लॅम जेतेपदाला गवसणी घातली, तर त्याला आकाश ठेंगणे वाटू लागते.
First published on: 28-01-2014 at 12:34 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaiktivedh stanislas wawrinka