अमेरिकेतील कॅन्सास राज्याच्या कायदेमंडळाची निवडणूक ६ नोव्हेंबर रोजी झाली, ती जिंकणारे डॉ. शांती गांधी हे आजवरच्या अनेक भारतीय-अमेरिकी प्रतिनिधींतील एक ठरले आहेत. बॉबी जिंदाल गव्हर्नर झाले वा राज गोयल संघराज्यीय कायदेमंडळाचे (काँग्रेस) सदस्य झाले, तितकी उडी डॉ. गांधी यांनी घेतलेली नाही हे खरे; पण गेल्या अवघ्या दोन वर्षांत, तेही निवृत्तीनंतर मिळालेल्या वेळाचा सदुपयोग म्हणून रिपब्लिकन पक्षातर्फे सक्रिय राजकारणात उतरलेल्या या डॉक्टरांनी राज्य कायदेमंडळापर्यंत मारलेली मजल छोटी नाही. मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केल्यावर १९६७ मध्ये हृदय-शल्यक्रियेचे शिक्षण घेण्याची आस धरून ते अमेरिकेत आले.. हे उच्चशिक्षण घ्यावे, एवढी परिस्थिती नव्हती, म्हणून ओहायो राज्यातील यंगस्टनच्या एका रुग्णालयात इंटर्नशिप त्यांनी पत्करली. घरची परिस्थिती अशी की, विमानाचे तिकीटसुद्धा तुम्हीच कर्जाऊ द्या, असे या प्रशिक्षणार्थीला सांगावे लागले. ती विनंती मान्य झाली नसती, तर डॉ. गांधी अमेरिकेत आलेही नसते, १९६९ मध्ये सुझन या सहकारी मुलीशी विवाहबद्ध झालेही नसते आणि पुढे १९७५ मध्ये त्यांना अमेरिकी नागरिकत्व मिळण्याचा प्रश्नच आला नसता, पण हे सारे झाले. हृदय आणि छाती यांवरील शस्त्रक्रियांचा विशेषज्ञ होण्याची डॉ. गांधी यांची इच्छाही ७५ मध्येच पूर्ण झाली आणि दरम्यानच्या काळात आर्थिकदृष्टय़ा फार सुखवस्तू नसलेल्या गांधी दाम्पत्याला तीन गोड मुलीही झाल्या. १९७८ मध्ये यंगस्टनहून ते कॅन्सास राज्यातील टोपेका येथे हृदय-शल्यक्रिया उपक्रम सुरू करण्याच्या निमंत्रणावरून आले. स्थानिक राजकारणामुळे हव्या तशा सुविधाच मिळेनात, तरीही स्वतंत्र शल्यक्रिया विभाग (उपचार व अध्यापन) सुरू करण्यात त्यांनी यश मिळवले. पुढल्या २३ वर्षांत वैद्यकीय व्यवसायात त्यांचा उत्कर्ष झाला आणि १९८० पासून ते रिपब्लिकन पक्षाचे समर्थक झाले. लोकप्रतिनिधित्व करावे, असे अनेकदा वाटे, पण वेळ नव्हता. तो निवृत्तीनंतर मिळाला आणि गेल्या दोन वर्षांतील राजकीय कामे कारणी लागली! या साऱ्याऐवजी, डॉ. शांती गांधी हे महात्मा गांधी यांचे पणतू (नातू कांतिलाल यांचे पुत्र) असल्याचीच चर्चा अधिक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaktivedh
First published on: 14-11-2012 at 04:35 IST