‘विकिलीक्स’चा उदयास्त 

ज्या कारणांसाठी विकिलीक्सला आज जगभरात ओळखलं जातं त्या कारणांसाठी तिची स्थापना खचितच झाली नव्हती.

असांज (२००६) आणि ‘विकिलीक्स’चं बोधचिन्ह

|| अमृतांशु नेरुरकर
‘विकिलीक्स’ ही २०१० पर्यंत अन्य अमेरिकी इंटरनेट-आधारित कंपन्यांसारखीच एक- पण तिच्या गौप्यस्फोटांमुळे अधिक चर्चेतली-  ठरली होती… इराक, अफगाणिस्तानातल्या अमेरिकी कारवायांचे वाभाडे ‘विकिलीक्स’ काढू लागल्यावर मात्र तीन आठवड्यांत या कंपनीला खिळखिळे करण्यात आले…

जुलिअन असांज आणि त्यानं सुरू केलेल्या विकिलीक्स चळवळीला अभ्यासल्याशिवाय गोपनीयता, विदासुरक्षा तसेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य या विषयांचा अभ्यास पूर्ण होणार नाही, इतका त्या दोघांचाही प्रभाव या विषयांवर गेल्या दशकभरात पडला आहे. केवळ हेच विषय नव्हेत तर प्रसारमाध्यमं, जागतिक अर्थ आणि राजकारण, दहशतवाद अशा वैश्विक विषयांनाही ही चळवळ व्यापून उरली आहे. जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांत होत असलेल्या गैरप्रकारांना, भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी ‘व्हिसलब्लोअर’ (बेकायदा कृत्यांचा उघड किंवा निनावी पद्धतीने गौप्यस्फोट करणाऱ्या व्यक्ती) मंडळींना विकिलीक्सच्या व्यासपीठाचा पुष्कळच उपयोग झाला असला तरीही त्याची फार मोठी किंमत असांज आणि पर्यायाने विकिलीक्सला चुकवावी लागली आहे.

ज्या कारणांसाठी विकिलीक्सला आज जगभरात ओळखलं जातं त्या कारणांसाठी तिची स्थापना खचितच झाली नव्हती. एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक हा इंटरनेट तंत्रज्ञानाच्या भरभराटीचा काळ होता व भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या पण समविचारी लोकांना एकमेकांशी जोडून त्यांच्याकडून काही सर्जनशील विधायक काम करून घेण्यासाठी आंतरजालावर विविध व्यासपीठं उदयास येत होती. समाजमाध्यमांना (फेसबुक २००४ तर ट्विटर २००६ मध्ये) सुरुवात झाली होती. विकिपीडियासारखे ‘क्राऊडसोर्सिंग’चा वापर करून मोठ्या प्रमाणावर मजकुराची निर्मिती करणारे कार्यक्षम पर्याय तयार होत होते. अशा वातावरणात २००६ मध्ये जेव्हा असांजने विकिलीक्सची पायाभरणी केली तेव्हा विकिपीडियाच्या धर्तीवरच नागरिकांच्या सहभागातून आंतरजालावर पत्रकारितेचं व्यासपीठ (सिटिझन जर्नलिजम) उभं करण्याचं त्याच्या डोक्यात होतं.

नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जे विषय आर्थिक, सामाजिक किंवा राजकीय कारणांसाठी मुख्य धारेतल्या प्रसारमाध्यमांकडून दुर्लक्षिले जातात अशा विषयांना वाचा फोडण्यासाठी या व्यासपीठाचा उपयोग होईल अशी असांजची धारणा होती. या व्यासपीठावर बातम्या व त्यांच्या संदर्भातील इतर माहिती नागरिकांनीच पुरवावी आणि त्याच्या सत्यासत्यतेची पडताळणी व त्यानुसार आवश्यक बदल नागरिकांकडूनच व्हावेत असेच असांजला अपेक्षित असल्यामुळे त्यानं या प्लॅटफॉर्मचं नामकरण करताना ‘विकि’ शब्दाचा जाणीवपूर्वक वापर केला होता.

पण विकिलीक्सच्या बाबतीतली असांजची वरील अपेक्षा पूर्णपणे फलद्रूप झाली नाही. एका बाजूला विकिलीक्सकडे गोपनीय माहितीचा ओघ यायला सुरुवात झाली होती पण त्या माहितीची पडताळणी करण्याला म्हणावा तितका प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला नाही. असं असलं तरीही बऱ्याच प्रकरणांमध्ये मिळालेली माहितीच एवढी महत्त्वपूर्ण होती की तिची पडताळणी करण्याची व त्यात गरजेनुसार बदल करून तिला आपल्या व्यासपीठावर प्रसिद्धी देण्याची जबाबदारी असांजने आपल्या शिरावर घेतली आणि अल्पावधीतच विकिलीक्स स्वत:च प्रसारमाध्यम क्षेत्रातील एक मुख्य धारेतील संस्था म्हणून नावारूपाला आली. असांज आता विकिलीक्सचा संस्थापक तर होताच पण त्याचबरोबर पत्रकार आणि मुख्य संपादकाची जबाबदारीही त्याच्या गळ्यात पडली होती.

विशेष करून अविकसित देशातील नागरिकांच्या प्रश्नांकडे तसेच शासकीय भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे प्रसारमाध्यमांचं बऱ्याच अंशी दुर्लक्ष होतं किंवा ती त्या प्रकरणांच्या मुळाशी जात नाहीत असा असांजचा आरोप होताच. स्वत:च संपादकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मात्र असांजनं विकिलीक्सकडे आलेली गोपनीय व संवेदनशील प्रकरणं धसास लावायचा चंग बांधला. डिसेंबर २००६ पासून (जेव्हापासून असांज मुख्य संपादक बनला होता) पुढली चार वर्षं विकिलीक्सकडून धडाकेबाज गौप्यस्फोट नियमितपणे होत राहिले; ज्यांनी अमेरिकेसारख्या सर्वशक्तिमान देशाच्या सरकारलाही हादरे दिले.

विकिलीक्सकडून हाताळल्या जाणाऱ्या विषयांतही बरंच वैविध्य होतं. २००७ मध्ये विकिलीक्सवर ‘हुआन्तानामो बे’ अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालाने, हुआन्तानामो (/ग्वान्टानामो) बे या दक्षिण अमेरिकेतल्या क्युबा देशाजवळच्या अमेरिकी बेटावर असणाऱ्या तुरुंगात, कैद्यांना दिल्या जाणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळवणुकीच्या कहाण्या प्रथमच जगासमोर आणल्या. २००८ मध्ये विकिलीक्सने ज्युलियस बेअर या स्विस बँकेकडून झालेल्या आर्थिक घोटाळ्याचे तपशील पुराव्यांसकट उघड केले. त्याच वर्षी विकिलीक्सने अमेरिकी रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार सारा पॅलिन यांचे काही गोपनीय ई-मेल प्रसिद्ध केले, ज्यात रिपब्लिकन पक्षाचे काही अंतर्गत कलह चव्हाट्यावर आणले गेले. तर २००९ मध्ये ११ सप्टेंबर २००१ रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात त्याच दिवशी विविध सरकारी व लष्करी व्यक्तींकडून प्रसृत झालेले पेजर संदेश विकिलीक्सवर प्रसिद्ध केले गेले.

२००६ ते २००९ या कालखंडात विकिलीक्स आंतरजालावरील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हिरिरीनं पुरस्कार करणारं प्रसारमाध्यम म्हणून हळूहळू स्थिरावत होतं व तिला कट्टर पाठीराख्यांबरोबरीने तेवढ्याच तोलामोलाचे विरोधकही (ज्यात काही देशांची सरकारंही होती) मिळायला लागले होते. २०१० साली विकिलीक्सवर प्रसिद्ध झालेल्या मजकुरानं संस्थेची नि असांजची कीर्ती जगभरात पसरवली पण विकिलीक्सला ‘अमेरिकी सरकार’ हा नवा कट्टर विरोधक मिळाला!

त्या वर्षी प्रथमच असांजने विकिलीक्सवर एक १७ मिनिटांचं ‘कोलॅटरल मर्डर’ नावाचं दृक्मुद्रण प्रसृत केलं, जे इराकमध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या अपॅची हेलिकॉप्टरमधून मुद्रित झालं होतं. अंगावर काटा आणणाऱ्या त्या व्हिडीओमध्ये काही इराकी नागरिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना दिसतात आणि अचानक त्या हेलिकॉप्टरमधून गोळ्यांचा मारा सुरू होतो. बघताबघता सारे लोक मारले जातात, इतकंच नव्हे तर त्या हल्ल्यात जखमी व्यक्तींना मदत पुरवणाऱ्या लोकांवरही असाच हल्ला केला जातो. अत्यंत अमानुष, हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दृक्मुद्रणानं अमेरिकी लष्कराची काळी बाजू तर जगासमोर आणलीच पण त्याचबरोबर विकिलीक्सलाही रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणलं.

अमेरिकेच्या इराकविरुद्ध लढाईच्या नकारात्मक बाजूचं दर्शन घडवल्यानंतर लगेचच असांजने अमेरिकेच्याच अफगाणिस्तान युद्धाचे गोपनीय तपशील जगासमोर मांडायला सुरुवात केली. विकिलीक्सच्या स्थापनेपासून अमेरिकेविरोधातील अनेक प्रकरणं चव्हाट्यावर आणूनही इतके दिवस असांजच्या कृत्यांना अमेरिकेने फारशी किंमत दिली नव्हती. पण इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धासंबंधातील गौप्यस्फोटांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली आपली नाचक्की पाहून मात्र अमेरिकी शासन असांज व विकिलीक्सची विविध स्तरांवर कोंडी करण्याच्या इराद्याने पेटून उठले.

विकिलीक्स ही तांत्रिक तसेच आर्थिकदृष्ट्या विविध अमेरिकी कंपन्यांवर अवलंबून होती. उदाहरणार्थ, विकिलीक्स संस्थळ अ‍ॅमेझॉनच्या क्लाऊड सव्र्हर्सवर कार्यरत होतं. तसंच, विकिलीक्सला जगभरातून मिळणारी आर्थिक रसद प्रामुख्याने अमेरिकी वित्तीय सेवापुरवठादार कंपन्यांच्या सेवा वापरून (पे-पाल, व्हिजा, मास्टरकार्ड आदी) किंवा बँकांतर्फे (उदा. बँक ऑफ अमेरिका) मिळत होती. अमेरिकी सरकारने या सर्व कंपन्यांवर दबाव आणून विकिलीक्सला पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवा तातडीनं बंद करायला लावल्या आणि संस्थेची आर्थिक नाकेबंदी करून टाकली.

१ डिसेंबर २०१० ला अ‍ॅमेझॉननं सर्वप्रथम विकिलीक्स संस्थळाला आपल्या क्लाऊड प्लॅटफॉर्मवरून हटवलं. दोनच दिवसांनी पे-पालनं विकिलीक्सला दिली जाणारी वित्तीय सेवा खंडित केली. ७ डिसेंबरला व्हिजा आणि मास्टरकार्ड या दोन्ही कंपन्यांनी पे-पालचा कित्ता गिरवत विकिलीक्ससाठी देणग्या स्वीकारणं बंद केलं. १८ डिसेंबरला बँक ऑफ अमेरिकाने विकिलीक्सची सर्व खाती गोठवली तर २१ डिसेंबरला वेस्टर्न युनियन या चलन विनिमय सेवा पुरवणाऱ्या कंपनीनं विकिलीक्ससाठी विविध आंतरराष्ट्रीय चलनांमध्ये देणगी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. नोव्हेंबर २०१० पर्यंत शासकीय स्तरावरील भ्रष्टाचार उघडकीस आणून नागरिकांचे न्याय्य हक्क मिळवून देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या विकिलीक्सची अवस्था अमेरिकेनं पुढल्या केवळ तीन आठवड्यांत एक कफल्लक आणि बेकायदा संस्था म्हणून करून टाकली. केवळ विकिलीक्सला नामोहरम करून अमेरिका गप्प बसणार नव्हती. अमेरिकेने असांजवर हेरगिरीचे व गोपनीय माहितीच्या गैरवापराचे आरोप दाखल करीत त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू केली.

असांजच्या अमेरिकेविरुद्धच्या या लढाईचं पर्यवसान कशात झालं? इतकी संवेदनशील माहिती चव्हाट्यावर आणण्यामागे असांजची भूमिका काय होती? कोणत्या अंत:प्रेरणा अशा सर्वशक्तिमान सरकारांच्या विरोधात उभे राहण्याची ऊर्जा त्याला पुरवत होत्या? गोपनीयता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य अशा मूल्यांचं खुद्द असांजच्या दृष्टीनं किती महत्त्व होतं आणि असांजनं केलेले गौप्यस्फोट हे गोपनीयता हक्कांचा भंग करतात का? या सर्व प्रश्नांचा ऊहापोह पुढल्या लेखात करू.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.

amrutaunshu@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: American internet based companies explosions media world finance and politics terrorism akp

ताज्या बातम्या