अमृतांशु नेरुरकर amrutaunshu@gmail.com

समाजमाध्यमांवर वापरकर्त्यांच्या खासगी विदे(डेटा)च्या गोपनीयतेपुढे असलेले आव्हान दुहेरी स्वरूपाचे आहे..

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
mpsc Mantra Study of economic and social development current affairs
mpsc मंत्र : आर्थिक व सामाजिक विकास, चालू घडामोडींचा अभ्यास

नव्या सहस्रकाच्या पूर्वसंध्येला झालेल्या आंतरजालाच्या (इंटरनेट) सार्वत्रिकीकरणानंतर विदेची (डेटा) निर्मिती मोठय़ा प्रमाणावर होऊ लागली. सुरुवातीच्या काळात ही विदा प्रामुख्याने कंपन्यांच्या किंवा शासकीय खात्यांच्या अंतर्गत प्रणालींमध्ये तयार व्हायची आणि तिची साठवण खासगी विदागारांमध्ये (डेटाबेस) केली जायची. या प्रणालींमध्ये प्रवेश केवळ अधिकृत व्यक्तींना दिला जात होता. त्याचबरोबर या प्रणाली आणि त्या निर्मिती व प्रक्रिया करत असलेली विदा ही शक्यतो ‘फायरवॉल’सारख्या डिजिटल साधनांनी संरक्षित अशा ‘डेटा सेंटर’मध्ये साठवली जात होती. यामुळे अशा विदेच्या सुरक्षिततेची काही प्रमाणात हमी देता येत होती. नाही म्हणायला ई-मेल, चॅटिंग, ऑनलाइन खरेदी यांसारख्या मार्गाने वापरकर्ते विदानिर्मिती करत होते, पण हे प्रमाण लक्षणीय नव्हते.

२००४ नंतर मात्र हे चित्र साफ पालटले. त्याच वर्षी दाखल झालेल्या ‘मायस्पेस’ व ‘ऑर्कुट’ या दोन डिजिटल मंचांमुळे इंटरनेट वापरकर्ते प्रथमच या आभासी जगात इतर वापरकर्त्यांशी जोडले जाऊ लागले. आपल्या इच्छा, आकांक्षा, मते व्यक्त करू लागले. आपली वैयक्तिक माहिती, छायाचित्रे, दृक्मुद्रणे, आवडीनिवडी एकमेकांशी ‘शेअर’ करू लागले आणि आंतरजालावर खासगी विदेच्या अविरत व अनिर्बंध निर्मितीला सुरुवात झाली. खरे तर, मायस्पेस आणि ऑर्कुटच्या आधीही ‘ओपन डायरी’, ‘लाइव्ह जर्नल’ यांसारखी माहितीची देवाणघेवाण करणारी संस्थळे उदयास आली होती; पण इंटरनेटच्या मर्यादित उपलब्धतेमुळे असेल किंवा वापरसुलभतेतील कमतरतेमुळे असेल, ती फारशी लोकप्रिय झाली नाहीत. २०१० नंतर मात्र डिजिटल विश्वातील दोन समांतर प्रवाहांमुळे समाजमाध्यमी मंचांनी मागे वळून पाहिले नाही.

एक म्हणजे, स्मार्टफोनची उपलब्धता व त्यावरून आंतरजालावर प्रवेश मिळवण्यासाठी अस्तित्वात आलेले ३-जी व ४-जी सेल्युलर तंत्रज्ञान; ज्यामुळे २४ तास ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध राहणे वापरकर्त्यांना सहजशक्य होऊ लागले. त्याच सुमारास वापरकर्त्यांस विविध पद्धतींनी व्यक्त होण्यासाठी समाजमाध्यमी मंचांचे अनेक प्रकार उदयास आले; उदाहरणार्थ, सामाजिक स्तरावरील संवाद व वैचारिक देवाणघेवाणीसाठी फेसबुक, नेमक्या शब्दांत मत मांडण्यासाठी किंवा काही वैयक्तिक स्वरूपाच्या घोषणा करण्यासाठी ट्विटर, छायाचित्राधारित स्वत:ची माहिती वितरित करण्यासाठी इन्स्टाग्राम किंवा स्नॅपचॅट, व्यावसायिक स्तरावर आपले इतरांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी लिंक्डइन, इत्यादी. आपल्या स्मार्टफोनवरील समाजमाध्यमांच्या उपयोजकांद्वारे (अ‍ॅप्स) एकमेकांच्या सतत संपर्कात राहणे, खासगी माहितीचे आदानप्रदान करणे व विविध कारणांसाठी अनेक विषयांवर व्यक्त होत राहणे सोपे होऊन गेले.

समाजमाध्यमांचा जगभरातील वापरकर्त्यांवर व्यक्तिश: आणि एक समाज म्हणून सकारात्मक परिणाम नक्कीच झाला आहे. स्थळ, काळ आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी, जलदगतीने संपर्क साधण्याचे एक माध्यम म्हणून किंवा आपल्या आवडीनिवडी, मते, विचार व इतर खासगी गोष्टींची आपल्या वर्तुळातील व्यक्तींबरोबर देवाणघेवाण करण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग सर्वज्ञात आहेच. पण व्यापक सामाजिक स्तरावर विचार केल्यास पर्यावरणासारख्या एखाद्या संवेदनशील मुद्दय़ावर जनजागरण करण्यासाठी, एखाद्या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल जनजागृती करण्यासाठीही समाजमाध्यमांचा कल्पकतेने वापर केला जात आहे. यामुळेच माहितीचे लोकशाहीकरण करण्याचे श्रेय जे या व्यासपीठांना देण्यात येते, ते अगदीच अयोग्य म्हणता येणार नाही. एवढेच नव्हे, तर राजकीय उलथापालथ घडवण्याची क्षमतादेखील ही समाजमाध्यमे बाळगून आहेत. २०१० साली इजिप्त आणि इतर आखाती राष्ट्रांत फेसबुकच्या मदतीने घडवण्यात आलेली ‘अरब स्प्रिंग’ चळवळ हे याचे एक ठळक उदाहरण!

गेल्या चार-पाच वर्षांत मात्र समाजमाध्यमांचे नकारात्मक रूप प्रकर्षांने आपल्यासमोर येऊ लागले आहे. २०१६ साली अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी करण्यात फेसबुकचा असलेला कथित अप्रत्यक्ष सहभाग; त्यानंतर मार्च २०१८ मध्ये उघडकीस आलेला माहितीचौर्याचा महाघोटाळा- ज्यात फेसबुकने आपल्या जवळपास साडेआठ कोटी वापरकर्त्यांची खासगी माहिती (त्यांच्या नकळत व परवानगीविना) ‘केम्ब्रिज अ‍ॅनॅलिटिका’ या विदाविश्लेषण करणाऱ्या कंपनीकडे परस्पर सुपूर्द केली होती, अशा घटनांमुळे समाजमाध्यमांबद्दल एक संभ्रमावस्था वापरकर्त्यांमध्ये तयार झाली. या व्यासपीठांवरील आपली माहिती कितपत सुरक्षित आहे; फेसबुक, गूगल, ट्विटर आदी कंपन्या माहितीच्या मक्तेदारीची नवी केंद्रे तर बनत नाहीयेत ना; त्यामुळे सायबर दहशतवादाला खतपाणी मिळतेय का; असे शेकडो प्रश्न वापरकर्त्यांच्या मनात तयार होऊ लागले.

दुसऱ्या बाजूला, या व्यासपीठांमुळे समाजामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या मानसिक विकृती तयार होत आहेत का, याचा मानसशास्त्राच्या अंगाने अभ्यासही जगभरात सुरू झाला. ‘फोमो’ किंवा ‘फीअर ऑफ मिसिंग आऊट’सारख्या चिंताग्रस्त भावनावस्थेला आज लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत अनेक व्यक्ती सामोऱ्या जात आहेत. अर्थात, समाजमाध्यमांच्या बऱ्यावाईट परिणामांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करणे या लेखमालेच्या परिघाबाहेरचे असले, तरीही समाजमाध्यमांवर विखुरलेल्या आपल्या खासगी विदेच्या गैरवापराचे किंवा तिच्या गोपनीयतेच्या तडजोडीचे सखोल विश्लेषण करणे गरजेचे आहे. कारण त्याची केवळ मानसिकच नव्हे, तर प्रचंड आर्थिक किंमतही आपल्याला मोजावी लागू शकते.

समाजमाध्यमांवरील आपल्या खासगी माहितीच्या गोपनीयतेबाबत विचार करण्यापूर्वी या मंचासंदर्भातल्या तीन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, त्या पुढीलप्रमाणे :

(१) समाजमाध्यमांची संरचनाच ही वापरकर्त्यांनी स्वत:बद्दलच्या अधिकाधिक गोष्टी, भावना, मते सतत ‘शेअर’ करत राहावीत या दृष्टीने केली गेली आहे. कोणत्याही समाजमाध्यमी व्यासपीठावर नावनोंदणी करून त्या सेवेचा उपभोग घ्यायला सुरुवात करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सुलभ व काही मिनिटांत पुरी होणारी असते. एकदा ती सेवा वापरू लागल्यावर त्यावर काही तरी ‘पोस्ट’ करत राहणे, इतरांच्या पोस्टवर प्रतिसाद देणे किंवा इतर कोणा वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीचा शोध घेणे अशा क्रिया केवळ एखाद्दोन क्लिक्सवर करता येतात. प्रत्येक वापरकर्त्यांचा आपल्या मंचावर सक्रिय सहभाग असावा व त्याच्याकडून विदानिर्मिती अविरतपणे होत राहावी, या एकमेव ध्येयाने समाजमाध्यमी कंपन्या आपले सर्व निर्णय व धोरणे ठरवत असतात. कारण त्यांच्या अस्तित्वासाठी विदानिर्मितीची प्रक्रिया निरंतर चालू राहणे अत्यावश्यक असते.

२०१५ मध्ये फेसबुकला असे ध्यानात आले की, वापरकर्त्यांकडून फेसबुकवर येणारा वैयक्तिक माहितीचा ओघ काहीसा थंडावला आहे. यावर मात करण्यासाठी लगेचच कंपनीने आपल्या संस्थळावर व उपयोजकात काही नव्या वैशिष्टय़ांची भर घातली. उदाहरणार्थ, ‘ऑन धिस डे’- ज्यात मागील काही वर्षांत याच दिवशी पोस्ट केलेली छायाचित्रे वा दृक्मुद्रणे दाखवून फेसबुक लोकांना ते ‘रिपोस्ट’ करायला अप्रत्यक्षपणे सूचित करत असे किंवा काही विशेष दिवसांचे (मातृ दिवस, मैत्री दिवस आदी) नैमित्तिक स्मरण करून, फेसबुक आपल्याला त्या त्या दिवसाशी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याची शिफारस करत असे. थोडक्यात, अधिकाधिक वैयक्तिक माहिती ‘शेअर’ करायला वापरकर्त्यांना उद्युक्त करण्याचे प्रयत्न फेसबुक आदी कंपन्यांकडून कायमच होत असतात.

(२) समाजमाध्यमांवर आपल्या माहितीच्या गोपनीयतेला असलेला धोका दुहेरी आहे. पहिला धोका तर या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडूनच आहे. जगभरातील कोटय़वधी वापरकर्त्यांच्या खासगी विदेचा अमर्याद साठा काही मूठभर समाजमाध्यमी कंपन्या करत असल्याने, त्यांचे या माहितीवर संपूर्ण नियंत्रण व मक्तेदारी निर्माण होते यात शंका नाही. पण कितीही म्हटले तरी, हा धोका ‘ज्ञात’ प्रकारात येतो. यापेक्षा तीव्र स्वरूपाचा धोका हा या व्यासपीठांवर अफाट संख्येने असलेल्या ‘अज्ञात’ वापरकर्त्यांचा आहे. आपली गोपनीय माहिती जर काही कारणाने चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडली, तर त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.

(३) आपण कितीही खबरदारी घेतली आणि समाजमाध्यमी कंपन्यांनी गोपनीयतेला कितीही गांभीर्याने घ्यायचे ठरवले, तरीही विदासुरक्षेची १०० टक्के हमी कोणीही देऊ शकणार नाही. म्हणजेच आपल्याबद्दलची खासगी माहिती- जी अजूनपर्यंत कोणत्याही डिजिटल मंचावर आलेली नाही, केवळ तिच्याच सुरक्षिततेची खात्री आपल्याला बाळगता येईल. पण आपल्याबद्दलची अशी कुठली माहिती खरोखरच आंतरजालावर येण्याची शिल्लक राहिली आहे का, हा कळीचा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर, समाजमाध्यमांवरील विदासुरक्षेच्या तडजोडीचे प्रकार व त्याचे व्यक्तीवरील होऊ शकणारे परिणाम याचे विश्लेषण पुढील लेखात करू या.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.