अमृतांशु नेरुरकर amrutaunshu@gmail.com

संगणक/स्मार्टफोन वापरकर्त्यांस कोणत्या जाहिराती दिसाव्यात वा दिसू नयेत हे कसे ठरते, हे जाणून घेण्यासाठी वर्ल्ड वाइड वेबएचटीटीपीया नव्वदच्या दशकात उदयास आलेल्या तांत्रिक संकल्पनांपर्यंत मागे जावे लागते..

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Maruti Suzuki Raises Prices of Select Vehicles Swift and Grand Vitara Included
मारुती सुझुकीकडून निवडक वाहनांच्या किमतीत वाढ
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

आंतरजालावर (इंटरनेट) विखुरलेल्या आपल्या खासगी विदेचा (पर्सनल डेटा) सर्वात प्रभावी वापर जाहिरात क्षेत्राकडून केला जातो. संगणकाच्या तसेच फोनच्या ब्राऊजरवर वेब सर्फिग करत असताना किंवा स्मार्टफोनवरील एखादे उपयोजन (अ‍ॅप) वापरताना बऱ्याचदा आपल्यावर जाहिरातींचा भडिमार केला जात असतो. २०१५ सालापासून, विशेषत: स्मार्टफोन्सच्या उदयानंतर ऑनलाइन जाहिरातींची आर्थिक उलाढाल कैक पटींनी वाढली आहे. २०२० मध्ये, केवळ एका वर्षांत जगभरातील विविध कंपन्यांकडून आंतरजालावरील जाहिरातींसाठी तब्बल ३३ हजार कोटी अमेरिकी डॉलर्स एवढा खर्च करण्यात आला; ज्यातील स्मार्टफोनवरील जाहिरातींचा हिस्सा ६० टक्क्यांपेक्षा अधिक, जवळपास २० हजार कोटी अमेरिकी डॉलर्स एवढा होता. यावरूनच या क्षेत्राच्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या व्याप्तीचा अंदाज येऊ शकेल.

आंतरजालावर एखादी जाहिरात आपल्या डोळ्यांसमोर आणण्यामागे जाहिरातदाराचा प्राथमिक उद्देश हा आपल्याला त्या कंपनीचे संकेतस्थळ (वेबसाइट) उघडण्यासाठी प्रवृत्त करण्याचा असतो. त्यामुळेच दाखवलेली जाहिरात ही त्या व्यक्तीची गरज किंवा आवडीनिवडी ओळखून दाखवण्यात आली आहे का, याला फार महत्त्व प्राप्त होते. सामान्यत: आपल्या गरजांशी संपूर्णत: असंबंधित जाहिरातीच्या मागे जाण्याची आपली सुतराम शक्यता नसते. जरा विचार करा.. समजा, मी एक अविवाहित, बँकेत नोकरी करणारा तरुण आहे. जर मला लहान मुलांच्या संगोपनासंबंधातील जाहिरात दाखवली गेली, तर त्यात मला रस असण्याची कितपत शक्यता आहे? याउलट समजा, मी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवस्थापकपदावर काम करणारी एक मध्यमवयीन स्त्री आहे. मला एक आठ वर्षांची मुलगी आणि १२ वर्षांचा मुलगा आहे. अशा परिस्थितीत माझ्या डोळ्यांसमोर जर लहान मुलांना सॉफ्टवेअर कोडिंगचे ऑनलाइन धडे देणाऱ्या कंपनीची जाहिरात आली, तर त्यांच्या अभ्यासक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता मला नक्कीच वाटू शकेल.

कोविडोत्तर कालखंडात जरी ई-व्यवहारांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असले, तरी बऱ्याच जणांसाठी ती एक तडजोड आहे. हॉटेलमधील जेवण, कपडे, फर्निचर किंवा दागिन्यांची खरेदी यांसारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्या खरेदीचा प्रत्यक्ष अनुभव घेणे आपण अधिक पसंत करतो. अशा कंपन्यांच्या ऑनलाइन जाहिरातींत व्यक्तीच्या भौगोलिक स्थानाला फार महत्त्व प्राप्त होते. नागपूरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या ब्राऊजरवर मुंबईतील हॉटेल किंवा दुकानांची जाहिरात करून काय फायदा?

थोडक्यात, जर जाहिरातदार कंपनीला त्यांच्या उत्पादनाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी मला उद्युक्त करायचे असेल, तर माझी वैयक्तिक माहिती, भौगोलिक स्थान, आवडीनिवडी, सामाजिक स्थिती, राजकीय मते अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करून त्यानुसार जाहिराती दाखवणे भाग आहे. रेडिओ, टेलिव्हिजन यांवर जाहिराती दाखवताना कंपन्यांना केवळ ढोबळमानाने काही निकष तयार करणे शक्य असते. उदाहरणार्थ, टीव्हीवरील दैनंदिन मालिका गृहिणी वा ज्येष्ठ नागरिक बघत असण्याची शक्यता अधिक असते, त्याचप्रमाणे कार्टून वाहिन्यांचा प्रेक्षक हा साधारणपणे लहान मुले व त्यांच्या आयांपुरता सीमित असतो. त्यामुळे या वेगवेगळ्या दर्शकवृंदाशी संबंधित जाहिराती त्या-त्या कार्यक्रमांदरम्यान दाखवण्यात येतात. पण या माध्यमांवर जाहिराती दाखवताना प्रेक्षकांच्या आर्थिक, सामाजिक, भौगोलिक स्थितीनुसार जाहिराती बदलता येत नाहीत. त्यामुळेच एखादे कुटुंब मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत राहणारे असो किंवा नंदुरबारमधील एखाद्या आदिवासी पाडय़ावर राहणारे असो, दोन्ही कुटुंबांना एका वाहिनीवर एका वेळी सारखीच जाहिरात दिसत असते.

आंतरजालावर मात्र वरील सर्व मर्यादा साफ नाहीशा होतात. कोणताही ई-व्यवहार करताना, संकेतस्थळांना भेट देताना, विविध उपयोजनांचा (अ‍ॅप्स) वापर करताना किंवा समाजमाध्यमी मंचांवर व्यक्त होत असताना आपल्याबद्दलची वैयक्तिक विदा (डेटा) आपल्या कळत-नकळत तयार होत असते. तिची आंतरजालावर कायमस्वरूपी साठवणही होत असते. या अविरतपणे तयार होत असलेल्या आणि अमर्यादित प्रमाणात कायमस्वरूपी साठवल्या गेलेल्या आपल्या व्यक्तिगत माहितीचा आपल्याला आंतरजालावर कोणत्या जाहिराती दिसाव्यात आणि कोणत्या दिसू नयेत हे ठरवण्यासाठी कसा वापर करतात, हे समजून घेणे उद्बोधक आहे. जाहिरातींच्या भडिमारापासून काही प्रमाणात बचाव करण्यासाठी आणि आपल्या ‘डिजिटल’ पाऊलखुणा मर्यादित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, याचासुद्धा बोध यातून घेता येईल.

जाहिरातींच्या निवडीची प्रक्रिया आणि त्यामागे कार्यरत असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्याआधी ‘वर्ल्ड वाइड वेब’ या संकल्पनेची (जिला आपण तिच्या ‘डब्लूडब्लूडब्लू’ या इंग्रजी आद्याक्षरांनीही ओळखतो) तोंडओळख करून घेणे गरजेचे आहे. आज आंतरजालावरील कोणतेही संकेतस्थळ याच तंत्रज्ञानाबरहुकूम चालते, म्हणूनच प्रत्येक संकेतस्थळ उघडताना आपल्याला त्याच्या नावामागे ‘डब्लूडब्लूडब्लू’ लावावेच लागते. प्रख्यात ब्रिटिश संगणकशास्त्रज्ञ सर टीम बर्नर्स-ली यांना ‘वर्ल्ड वाइड वेब’चे जनक म्हणून ओळखले जाते; कारण आपल्या ब्राऊजरवर संकेतस्थळ उघडण्यासाठी ज्या ‘एचटीटीपी (हायपर टेक्स्ट ट्रान्स्फर प्रोटोकॉल)’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्याची निर्मिती बर्नर्स-ली यांनी १९९० साली केली. त्या वेळी ते युरोपातील आण्विक संशोधनासाठीची अग्रगण्य संस्था असलेल्या ‘सर्न’मध्ये संगणक नेटवर्किंग या विषयात संशोधन करत होते.

६ ऑगस्ट १९९१ रोजी बर्नर्स-ली यांनी ‘एचटीटीपी’ तंत्रज्ञानाचा उपयोग करून निर्मिलेल्या आणि ‘सर्न’ संस्थेबद्दल माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे प्रकाशन केले. आंतरजालाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जे विविध घटक कारणीभूत ठरले, त्यांपैकी एक म्हणून या घटनेचे महत्त्व अबाधित आहे. इतिहासाचे तपशीलवार जतन आणि दस्तावेजीकरण करण्यामध्ये युरोपीय लोकांचा हात कोणीही धरू शकणार नाही. जगातल्या या पहिल्यावहिल्या संकेतस्थळाची ‘सर्न’ने उत्कृष्टपणे जपणूक केली आहे आणि ते  http://info.cern.ch/  या पत्त्यावर आजही उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ते जरूर पाहावे, ज्यावरून आपण केवळ तीन दशकांत डिजिटल तंत्रज्ञानाचा किती मोठा पल्ला पार केला आहे याचा अदमास येऊ शकेल.

आता जेव्हा आपण कोणत्याही संकेतस्थळाचा पत्ता आपल्या ब्राऊजरवर टाकतो तिथपासून संकेतस्थळ ब्राऊजरवर संपूर्णपणे प्रदर्शित होईपर्यंत पडद्यामागे काय गोष्टी घडत असतात, हे पाहू. जेव्हा आपण कोणत्याही संकेतस्थळाचा पत्ता (उदा. indianexpress-loksatta.go-vip.net) आपल्या ब्राऊजरला देतो, तेव्हा ब्राऊजर त्या संकेतस्थळाचा आंतरजालावरील अचूक ठावठिकाणा शोधून काढते, ज्याला तांत्रिक परिभाषेत ‘आयपी अ‍ॅड्रेस’ असे म्हटले जाते. ‘आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल) अ‍ॅड्रेस’ हा एका विशिष्ट स्वरूपात लिहिला गेलेला क्रमांक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक घराचा पत्ता हा एकमात्र असतो, त्याचप्रमाणे आंतरजालावरील प्रत्येक घटकाला त्याचा स्वत:चा असा एकमेव ‘आयपी अ‍ॅड्रेस’ दिलेला असतो.

एकदा का संकेतस्थळाचा ‘आयपी अ‍ॅड्रेस’ मिळाला, की आपला ब्राऊजर त्या पत्त्यावर एक सूचना पाठवतो, ज्याला तांत्रिक परिभाषेत ‘एचटीटीपी गेट’ आज्ञा असे म्हटले जाते. थोडक्यात, आपला ब्राऊजर संकेतस्थळाच्या सव्‍‌र्हरला हे सांगत असतो की, एचटीटीपी तंत्रज्ञानाशी सुसंगत अशी संकेतस्थळाची माहिती मला पाठव. त्यानंतर तो सव्‍‌र्हर संकेतस्थळाबद्दलची माहिती, ब्राऊजरला समजेल अशा ‘एचटीएमएल (हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज) कोड’च्या स्वरूपात पाठवतो. याच ‘एचटीएमएल कोड’चा वापर करून ब्राऊजर आपल्याला संकेतस्थळाचे सर्व तपशील दाखवत राहतो.

ही प्रक्रिया अशी एकदम सरळसोट आहे आणि ‘वर्ल्ड वाइड वेब’च्या मूळ संकल्पनेत आजही फारसा फरक झालेला नाही. पण जेव्हा एखाद्या संकेतस्थळावर किंवा उपयोजनावर वापरकर्त्यांच्या खासगी माहितीस आणि आवडीनिवडीस अनुसरून जाहिराती दाखवल्या जातात, तेव्हा मात्र ही प्रक्रिया गुंतागुंतीची बनते. कोणत्या वापरकर्त्यांला कुठल्या वेळी कोणती जाहिरात दाखवायची हे कसे ठरवले जाते? संकेतस्थळाच्या मूळ ‘एचटीएमएल कोड’मध्ये जाहिरातींचे आणि जाहिरातदारांचे ‘एचटीएमएल कोड’ आयत्या वेळी कसे मिसळले जातात? आपण कळत-नकळत आंतरजालावर प्रसृत केलेल्या आपल्या वैयक्तिक माहितीचे मूल्य काय आहे? ऑनलाइन जाहिरातींच्या माध्यमातून एखाद्या संकेतस्थळाचा कितपत आर्थिक लाभ होऊ शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे खूप रंजक आहे, ज्याची चर्चा आपण पुढील लेखात करू.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.