|| अमृतांशु नेरुरकर
‘विकिलीक्स’मागच्या तत्त्वांसाठी कोणतीही तडजोड न करणारा असांज, मर्यादांची जाणीव होऊन नमेल का?

जुलिअन असांज हे एक अजब रसायन आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, खुले व्यवहार, माहितीची मुक्त देवाणघेवाण या तत्त्वांवर त्याची जितकी श्रद्धा आहे तितक्याच हिरिरीने तो मानवी प्रतिष्ठा व गोपनीयता या मूल्यांचा पुरस्कार करतो. आपल्या मूल्यांच्या जपणुकीसाठी विकिलीक्सच्या व्यासपीठाचा वापर ‘व्हिसलब्लोअर प्लॅटफॉर्म’ म्हणून करताना असांजला मोठी जोखीम उचलावी लागली हे तर खरंच; पण त्याचबरोबर व्यक्तिश: त्याला त्याच्या या धाडसाची फार मोठी किंमतही चुकवावी लागली आहे.

डिसेंबर २०१० मध्ये अमेरिकेने विकिलीक्सची आर्थिक नाकेबंदी केल्यानंतर संस्थेचं कामकाज काही काळासाठी स्थगित झालंच होतं. त्याचबरोबर अमेरिकेने आपल्या हेरगिरी प्रतिबंधक कायद्याखाली (एस्पियॉनेज अ‍ॅक्ट) गोपनीय माहितीची अफरातफर केल्याचा आरोप ठेवत असांजच्या नावे आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट काढलं. त्याआधी असांजवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करत स्वीडननेही असंच वॉरंट त्याच्याविरोधात काढलं होतं. आपल्याविरोधात अमेरिकादी देशांतर्फे षड्यंत्र रचलं जातंय याची कल्पना असांजला आलीच होती. अमेरिकेतील संभाव्य प्रत्यार्पणापासून स्वत:ला वाचवायला त्याने विविध देशांकडे आश्रित बनण्याचे पर्याय चाचपून पाहायला सुरुवात केली.

अखेरीस त्याच्या स्वीडनमध्ये होऊ घातलेल्या संभाव्य प्रत्यार्पणाच्या काहीच दिवस आधी, ऑगस्ट २०१२ मध्ये, इक्वेडोर या दक्षिण अमेरिकेतील लहानशा देशाने त्याला आश्रय देण्याचं मान्य केलं आणि असांज इक्वेडोरच्या लंडन येथील दूतावासात मुक्कामाला आला. जगभरातून (विशेषत: अमेरिकेतून) होत असलेल्या टीकेला भीक न घालता राफेल कोरिया या इक्वेडोरच्या तत्कालीन अध्यक्षांनी असांजची विनंती का मान्य केली असावी याबद्दल बरीच मतमतांतरं आहेत. कोरियांवर असलेला कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव यासाठी कारणीभूत होता किंवा पुढल्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी, सत्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य या मूल्यांच्या रक्षणासाठी खंबीरपणे उभा असलेला नेता अशी आपली देशभरात प्रतिमा निर्माण व्हावी असा कोरियांचा हेतू होता असे विविध अंदाज जाणकारांनी वर्तवले होते.

कोरियांचा उद्देश काहीही असला तरी, त्यानंतर जवळपास सात वर्षं असांजला इक्वेडोरनं आश्रय देऊ केला आणि या सर्व कालावधीत त्याचा मुक्काम इक्वेडोरच्या लंडनमधल्या दूतावासातील एका लहानशा खोलीतच होता. २०१७ मध्ये इक्वेडोरमध्ये कोरिया यांची जागा त्यांच्याच पक्षाच्या पण वेगळ्या विचारसरणीच्या लेनिन मोरेनो या नेत्याने घेतली आणि इक्वेडोरचं असांजच्या बाबतीतलं ममत्व कमी होण्यास सुरुवात झाली. अमेरिकेबरोबर काही प्रमाणात ताणले गेलेले संबंध सुधारण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून इक्वेडोरनंही असांजवर ‘गैरवर्तनाचे’ आरोप केले. दूतावासात राहात असताना हेरगिरी चालू ठेवल्याचा ठपका ठेवत त्याला आश्रय नाकारला आणि एप्रिल २०१९ मध्ये असांजची दूतावासातून हकालपट्टी केली. लगोलग असांजची रवानगी इंग्लंडमधील बेलमार्ष इथल्या तुरुंगात झाली, जिथं तो आजही खितपत पडला आहे. अजूनपर्यंत अमेरिका त्याचं प्रत्यार्पण करवून घेण्यात यशस्वी ठरली नसली तरीही त्याबाबतीतली टांगती तलवार त्याच्या डोक्यावर अजूनही लटकते आहे.                    

अशा वेळेला प्रश्न पडतो की, असांज जेव्हा विविध देशांची सरकारं किंवा खासगी कंपन्यांचे गोपनीय व संवेदनशील दस्तावेज विकिलीक्ससारख्या खुल्या व्यासपीठावर जगासमोर मांडतो तेव्हा त्यामागे नेमक्या कोणत्या अंत:प्रेरणा काम करत असतात? या कृत्यांची फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल याची पूर्ण कल्पना असतानाही ही धाडसी कृत्यं करण्यामागची त्याची मानसिकता काय असेल? या प्रश्नांना भिडण्यासाठी प्रथम आपल्याला असांजचा पूर्वेतिहास समजून घेण्याची गरज आहे.

विकिलीक्सची स्थापना करण्याआधीची असांजची मानसिकता ‘अंडरग्राऊंड’ या स्युलेट ड्रेफसने लिहिलेल्या पुस्तकातून समजून घेता येते. गंमत म्हणजे या पुस्तकाच्या श्रेयनामावलीत ‘संशोधन साहाय्य’ म्हणून खुद्द असांजचाही उल्लेख आहे. असांजचा लहानपणापासूनच संगणक आणि नेटवर्किंग तंत्रज्ञानाकडे ओढा होता. इतर अनेक निष्णात संगणक तंत्रज्ञांप्रमाणेच असांजचीही या क्षेत्रातली सुरुवात एक ‘हॅकर’ म्हणूनच झाली होती. या पुस्तकात वर्णिलेला ‘मेंडॅक्स’ नावाचा हॅकर हा असांजच असावा इतकी त्या दोघांत साम्यस्थळं आहेत.

नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला आंतरजालाचं (इंटरनेट) तंत्रज्ञान बाल्यावस्थेत असलं तरीही त्याची झपाट्याने प्रगती होत होती आणि माहितीच्या अविरत व कसल्याही बंधनाशिवायच्या खुल्या देवाणघेवाणीसाठी इंटरनेट हे सर्वोत्तम व्यासपीठ ठरू शकेल अशी संगणक तंत्रज्ञांची खात्री पटू लागली होती. असांजनेही इंटरनेटची ताकद ओळखली होती. तिचा वापर करून एकाधिकारशाही तसंच कटकारस्थानं करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काही करता येऊ शकेल का हे विचार त्याच्या डोक्यात अहोरात्र घोळत असायचे. इथं असांजचा रोख राजकीय किंवा लष्करी कटकारस्थानांकडे नव्हता तर आपल्याच नागरिकांना अंधारात ठेवून सर्व गोष्टी गुप्तपणे करण्याच्या सरकारच्या कार्यपद्धतीकडे होता. माहिती तंत्रज्ञान व इंटरनेटच्या आधारे सरकारनं पांघरलेला हा बुरखा फाडण्याच्या कामात हॅकर संप्रदायाचा सक्रिय सहभाग असायला हवा हे असांजचं स्पष्ट मत होतं, ज्याला तो ‘हॅक्टिव्हिजम’ असंही संबोधत असे.

पुढल्या काळात असांजवर ‘सायफरपंक’ चळवळीचाही पुष्कळ प्रभाव पडला. सायफरपंक तत्त्वज्ञान हे सुरुवातीपासूनच ‘मध्यवर्ती’ सत्ताकेंद्राच्या विरोधात होतं. अशा पद्धतीच्या राजकीय मांडणीत नागरिकांच्या व्यवहारांवर (सीसीटीव्ही सर्व्हेलन्ससारख्या माध्यमांतून) सतत पाळत ठेवली जाते आणि त्यामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पारदर्शकता, गोपनीयता या मानवी मूल्यांचा गळा घोटला जातो असं या चळवळीच्या पुरस्कर्त्यांचं म्हणणं. व्हिसलब्लोअर्सच्या मदतीनं, विकिलीक्सच्या माध्यमातून अशा निरंकुश सत्ताकेंद्रांवर काही प्रमाणात वचक ठेवता येऊ शकेल अशा मतापर्यंत असांज एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला येऊन पोहोचला होता.

विकिलीक्सच्या निर्मितीत २००३ साली उगम पावलेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विकेंद्रित पद्धतीनं चालणाऱ्या ‘अ‍ॅनॉनिमस’ या हॅकर चळवळीचाही अप्रत्यक्ष हातभार लागला. अ‍ॅनॉनिमस चळवळीचा मूळ उद्देश हा विविध देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या तथाकथित जुलमी राजवटीचा निषेध करण्यासाठी डिजिटल पद्धतीनं आंदोलन करण्याचा होता. त्यासाठी या चळवळीशी जोडलेले हॅकर्स संबंधित देशाच्या सरकारी प्रणालींवर सायबर हल्ले करून त्यांना बंद पाडण्याचे उद्योग करीत असत. फक्त चळवळीच्या नावाप्रमाणे हा हल्ला निनावी पद्धतीने होत असे व कोणत्याही ठरावीक व्यक्ती अशा हल्ल्यांची जबाबदारी अधिकृतपणे स्वीकारत नसत. असांजची मानसिकता अ‍ॅनॉनिमस चळवळीशी बरीच मिळतीजुळती असली तरीही एका बाबतीत मात्र तिने या चळवळीशी फारकत घेतली. मुक्त व पारदर्शक व्यवहारांवर असांजची श्रद्धा असल्यामुळे असेल पण त्याला अशा निनावी पद्धतीनं निषेध करणं मान्य नव्हतं. म्हणूनच विकिलीक्सच्या स्थापनेपासूनच असांजने गोपनीय माहिती पुरवणाऱ्या जागल्यांची ओळख जरी गुप्त ठेवली तरीही स्वत:ची संपादकाची भूमिका मात्र कधीही लपवली नाही.

अशा परिस्थितीत अमेरिकादी देशांनी जे हेरगिरीचे व गोपनीयता भंगाचे आरोप त्याच्यावर केले ते योग्य म्हणता येतील काय? कायदेशीर दृष्टिकोनातून पाहायला गेल्यास तर या आरोपांत तथ्य आहे. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय गोपनीय, संवेदनशील शासकीय कागदपत्रांची जाहीर वाच्यता करणं हा गुन्हाच आहे. पण म्हणून असांजवर गोपनीयता-भंजक असल्याचा ठपका ठेवता येत नाही. उलट त्याने वेळोवेळी व्यक्तिगत स्तरावरील गोपनीयतेचा पुरस्कारच केला आहे. त्याचा लढा हा नेहमीच नागरिकांचे गोपनीयतेसारखे मूलभूत हक्क हिरावून घेणाऱ्या सरकारांविरोधात राहिला आहे.

२०१० सालची आर्थिक नाकाबंदीही विकिलीक्सला फार काळ बंदी बनवू शकली नाही. बिटकॉइनसारख्या कूटचलनाच्या माध्यमातून निधी गोळा करून संस्थेचं कामकाज परत सुरू झालं, जे आजतागायत चालू आहे. असांजच्या अलीकडच्या लेखनात मात्र त्याला विकिलीक्ससारख्या व्यासपीठांच्या मर्यादांची झालेली जाणीव स्पष्टपणे जाणवते. शासकीय स्तरावर चालणारे नागरिकांवर पाळत ठेवण्याचे उद्योग निरंतर चालतच राहणार आहेत. इंटरनेटला अशा ‘मास सर्व्हेलन्स’चं माध्यम बनवायचं नसेल, तर ‘एन्क्रिप्शन’सारख्या उपायांचा अंगीकार करण्यावाचून पर्याय नाही असं तो नमूद करतो. असं असलं तरीही शासकीय वा कॉर्पोरेट स्तरावर चालणाऱ्या गैरप्रकारांना जगासमोर आणण्यात, त्यावर काही प्रमाणात वचक बसवण्यात विकिलीक्सचं योगदान कोणीही नाकारू शकणार नाही.

amrutaunshu@gmail.com

(पुढील आठवड्यापासून ‘विदाव्यवधान’ सोमवारीच प्रसिद्ध होईल.)

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.