चीनशी स्पर्धेत टिकावेच लागेल

एकूण जागतिक अर्थकारणात आणि राजकारणात भारताचा मुख्य स्पर्धक चीन आहे. चीनने आपल्याला मागे टाकलेलेच आहे, पण हे अंतर कमी करावेच लागेल.

(संग्रहित छायाचित्र)

राजीव साने

एकूण जागतिक अर्थकारणात आणि राजकारणात भारताचा मुख्य स्पर्धक चीन आहे. चीनने आपल्याला मागे टाकलेलेच आहे, पण हे अंतर कमी करावेच लागेल.

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अत्यंत हुशारीने स्वत:चा फायदा करून घेणारा देश म्हणजे चीन. भांडवलाची प्रचंड आयात करून चीनने बडय़ा देशांचे इतके मोठे घोंगडे अडकवून ठेवले, की एरवी मानव-अधिकारांवरून कोणालाही धारेवर धरणाऱ्या पाश्चात्त्यांना, चीनला हात लावण्याची कधी हिंमतच झाली नाही. भरपूर अण्वस्त्रे बनवून मग चीनने अण्वस्त्र-प्रसार-बंदी करारावर बिनधास्त सही केली. ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हाज को’ असाच हा प्रकार होता. बडय़ा देशांचे भांडवल गुंतवून घेतल्यावर त्यांना नफ्यात तेवढा हिस्सा देणे आवश्यकच होते. पण चीनचा पसा चीनबाहेर जातो आहे असे बावळट रडगाणे चीनने कधीच गायले नाही. कारण हा नफा जर खरोखरीच्या वस्तू व सेवांत रूपांतरित करायचा असेल, म्हणजेच वसूल करायचा असेल तर तेवढा माल चीनकडून घेणे बडय़ा देशांना भागच होते. चीनकडे मनुष्यबळ हा मुख्य स्त्रोत होता. निर्यातसंधी मिळाली की तिच्याद्वारे चिनी कामगारांना रोजगार मिळतो. त्यांना उत्पन्न सुरू झाले की ते एतद्देशीय मागणीही निर्माण करू शकतात, ही जाण चीनने दाखवली. अर्थात हे सर्व डेंगनंतरच्या चीनला लागू आहे. माओकालीन चीनला नव्हे. केवळ स्वस्त श्रम असून स्पर्धेत टिकता येत नाही. त्यासाठी उत्पादकतासुद्धा वाढवावी लागते. उत्पादकता वाढवायची असेल तर आर्थिक स्पर्धा खुली करावी लागते. चीनने माओचा फक्त फोटो तसाच ठेवून माओवादाला आरपार सोडचिठ्ठी दिली. राज्य हुकूमशाही आणि व्यवस्था भांडवलशाही हे वैशिष्टय़ चीनने टिकवून ठेवले आहे. लोकसंख्यावाढ रोखल्याने दरडोई उत्पन्नात एके काळी सलग दहा वर्षे १० टक्के वाढ करण्याचा चमत्कार चीनने केला. यातून चीनच्या तळच्या स्तराचे उत्पन्नही बरेच वाढल्यामुळे आर्थिक असंतोष निर्माण झाला नाही. थोडक्यात जागतिकीकरणाची एक्स्प्रेस गाडी चीनने पकडली. आपली ती चुकली. आता ट्रम्प महोदयांना साक्षात्कार होऊन त्यांनी जागतिकीकरणाचा खरा धोका अमेरिकन कामगारांना आहे हे ओळखले आहे. एकूणच बडय़ा राष्ट्रांना श्रम आयात करणे काहीसे महागात पडू लागले आहे. त्यामुळे सध्या जागतिकीकरणाची गाडी पॅसेंजर-गाडी आहे व आपल्याला तीच उपलब्ध आहे. या दूरदृष्टीत आपण कमी पडलो किंबहुना विपरीतच वागलो याची कबुली कॉ. ज्योती बसू यांनी दिली. पण बराच काळ रा. स्व. संघाची आर्थिक समजही कम्युनिस्टांसारखीच राहिली व ते दत्तोपंत ठेंगडी, गोविंदाचार्य, राजीव दीक्षितादिकांच्या प्रभावात राहिले. या काळात चीनने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात बरीच आघाडी मारून घेतली आहे. परंतु नरसिंह रावांना झालेली उपरती नंतर कोणत्याच पक्षाने निदान राज्यावर असताना तरी नाकारली नाही. त्यामुळे चीनपेक्षा खूपच कमी वेगाने पण भारतानेही दारिद्रय़निवारणात प्रगती केली आहे. चक्क बिल गेट्स यांनी चीन व भारताची स्तुती करून आफ्रिकेचे कसे होणार यावर लक्ष केंद्रित करावे असे भाषण दिले आहे. असो.

सावध ऐका पुढल्या हाका!

युवाल नोआह हरारी हा जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठातला इतिहासाचा लेक्चरर, ‘सेपियन्स’, ‘होमोडेऊस’, ‘ट्वेन्टिवन लेसन्स फॉर ट्वेन्टिफर्स्ट सेंच्युरी’, ही तीन बेस्टसेलर पुस्तके लिहून नुकताच अतिप्रसिद्ध व्यक्ती ठरला आहे. माहितीतंत्र आणि जैवतंत्र यांच्या एकत्र गुंफणीतून येत्या दोन दशकांतच केवढे आमूलाग्र बदल होऊ शकतील हे त्याने ‘होमोडेऊस’च्या शेवटच्या विभागात (होमोसेपियन लुजेस कंट्रोल) मांडले आहे. ते सर्वानाच हादरवून सोडणारे आहे. मानवजात दोन प्रजातींत विभागली जाईल. त्यांपैकी दिव्यशक्तिमान मानव हे साध्या मानवांना फुकट पोसून आभासी जगात धमाल करमणूक करत ठेवतील व स्वत: सर्जनशील जीवन जगतील, ही एक शक्यता आहे. होमोडेऊस म्हणजे ‘देवमाणूस’ नव्हे तर दिव्यशक्तिमान! होमोडेऊस हे कल्याणकारी (बेनेव्होलंट) असतीलच याची खात्री नाही. पण जर सर्व राष्ट्रे एकत्र आली तरच ते कल्याणकारी असतील याची काळजी घेता येईल. कोणत्या राष्ट्रात वा कॉर्पोरेट-कंपनीत होमोडेऊस निर्माण होईल हे सांगता येणार नाही.

सध्या फक्त चीनचे सरकार यात गंभीरपणे रस घेत आहे. चिनी लोक हे समूहवादी आणि समर्पणशील असतात. त्यामुळे चीनच्या हुकूमशाही सरकारला चिनी लोक रोखणार नाहीत.

होमोडेऊस निर्माण होणे का शक्य आहे? यावर त्याने अनेक पुरावे दिलेले आहेत. स्वयंचलित यंत्रणा आहेतच. पण स्वयंशिक्षक यंत्रणा बनत आहेत. डीप ब्लूने कास्पारोव्हला हरवले यात विशेष काही नाही. कारण शेकडो चेसमास्टर्स आणि इंजिनीअर्सनी त्याला पढवलेले होते. त्याहून भारी कृत्रिम चेसमास्टर्स बनले. आता फक्त चेसचे नियम फीड करून खेळत खेळत स्वत: शिकणारी यंत्रणा विकसित झाली आहे. तिने सर्वोत्तम कृत्रिम चेसमास्टरशी खेळून शिकत त्याला केवळ चार तासांत हरवले. शिकणारी यंत्रे दिलेल्या प्रोग्रॅमवर विसंबून न राहता अपयश वा कोंडी यातून शिकून स्वत:ला रीप्रोग्रॅम करू शकतात. चेस हे फारच संकुचित क्षेत्र आहे. पण अनेक प्रोसेसर्सचे जाळे अनेक क्षेत्रांत डोकावून येऊन समग्र निर्णयही घेऊ शकतात. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स होय.

दुसरे असे की अपंगांसाठीचे कृत्रिम अवयव त्यांना स्वत:चे असल्याप्रमाणे चालवता येण्यासाठी चेतातंतूतील सिग्नल्सचे कॉम्प्युटर आणि यंत्रणेच्या सिग्नल्समध्ये रूपांतर करणारे ट्रान्सडय़ूसर्स सापडले आहेत. नॉर्मल माणूसही आपले अ‍ॅडिशनल व वेगळ्याच ठिकाणी ठेवलेले हात वापरून इच्छेनुसार तिकडेही काम करू शकतो. म्हणजेच शरीर एकाच जागी असणे ही मर्यादाही राहात नाही.

आपल्याला स्वत:विषयी जेवढी माहिती असते त्यापेक्षा जास्त माहिती डेटा कंपनीला मिळत राहते. आपण जेव्हा गुगल वापरत असतो तेव्हा आपल्या आवडी गुगलला कळत असतातच. शिवाय यंत्रांचे यंत्रांशी इंटरनेट (इंटरनेट ऑफ थिंग्ज) वेगाने वाढत आहे. वैद्यकीय चाचण्यांऐवजी आपण सततच मॉनिटर होत राहू असे सेन्सर्स आपल्या शरीरात बसवून घेता येतील. यातून आपली भावनिक बटणे यंत्रणांच्या ताब्यात जाऊ शकतात. कॉन्सेंट्रेशन वाढवणारे इंडक्शन हेल्मेट सापडले आहे. त्याने मन:शांती वाढते असेही आढळले आहे. महायंत्रणांना आपला मेंदू ‘हॅक’ करता येऊ शकतो. पण मानवी सल्लागारांपेक्षा अचूक सल्ला मिळत राहिल्याने आपण महायंत्रणांवर अवलंबून राहू लागतो व त्यांची शक्ती वाढवत राहतो.

उत्क्रांतीद्वारा जीव हे तगण्यासाठी सुयोग्य रीती शिकलेले असतातच. या रीतीचे प्रतिरूपण (सिम्युलेशन) कॉम्प्युटरमध्येही वेगळ्या रूपात करता येते व तशीच वर्तने घडवता येतात. पण यासाठी प्रचंड डेटा व प्रचंड प्रोसेसिंग पॉवर लागते. ट्रान्झिस्टररूप स्विचेस वापरणारे कॉम्प्युटर तेवढय़ा क्षमतेचे नसतात. पण स्विचऐवजी खुद्द फोटॉनची अक्षदिशा पोलराइझ करून हो/नाही या अवस्था मिळवता येतात. फोटॉन्सच्या घट्ट बांधीव जोडय़ा (एन्टॅगलमेंट) करून त्यांना कनेक्टही करता येते. याला क्वांटम कम्प्युटेशन म्हणतात. अत्यंत कमी ऊर्जेत/जागेत व प्रचंड वेगाने हे चालू शकते. आपल्या मेंदूची गुंतागुंत ही सध्या तरी सर्वात महान आहे. तिचे प्रतिरूपण प्रचंड साइजचे बनले तरी क्वांटम कम्प्युटेशनमध्ये ते मावते. जाणीव आणि भावना जरी आपल्याकडेच राहिल्या तरी त्यांच्यावरील नियंत्रण बाहेरून होऊ शकते. मानसोपचार, हे आजार बरे करण्यापुरते सीमित न राहता, नव्या क्षमता/वृत्तींची रेडीमेड भरही टाकणारे करता येतील. जीनोम मॅपमुळे संभाव्य आजार अगोदर ओळखून अगोदरच उपाय करणे शक्य झाले आहे. जीन सिलेक्शन आणि जीन एडिटिंग शक्य झाल्याने उत्क्रांतीतून बनलेले आपले सेपियन-जीवस्वरूप कृत्रिमरीत्या बदलता येईल. याशिवाय शरीरात नॅनोरोबो सोडून ते पेशीत दुरुस्त्या करू शकतील व जरा-मरण पोस्टपोन होत राहील.

माहितीच्या मालकांवर अंकुश

ज्याप्रमाणे सरंजामशाहीत जमीन व औद्योगिक समाजात भांडवल महत्त्वाचे होते, त्याप्रमाणेच आता डेटा कोणाच्या मालकीचा, हे कळीचे ठरणार आहे. तंत्रावर नियमन लादणे कोणा एका राष्ट्राला शक्य नाही. कारण होमोडेऊस निर्माण होणे हे बंगलोर किंवा शांघायमध्येही घडू शकते! राष्ट्रवादाच्या पलीकडे जाऊनच ही प्रक्रिया आटोक्यात आणता येणार आहे. त्याच वेळी लोकसंख्येच्या संदर्भात भारत आणि चीन हे मोठे प्लेअर्स असणार आहेत. पण आत्ता तरी भारतापेक्षा चीनला आंतरराष्ट्रीय राजकारणात फारच महत्त्व आहे. चीनशी स्पर्धेत टिकले पाहिजे याचा अर्थ, जी काय कचकडय़ाची खेळणी व शोभेच्या वस्तू चीनमधून येतात त्यांच्यावर बहिष्कार घालणे, इतका बाळबोध असून भागणार नाही.

आपण आपल्या संस्कारबद्धतेची (‘कंडिशिनग’ची) भावनिक बटणे दाबली जात असताना जागरूक नाही राहिलो, तर डेटाशाहीपासून कसे वाचणार? हरारी रोज नियमित ध्यानधारणा करतो. त्याने होमोडेऊस विपश्यना शिक्षक गोएंकांना अापत केले आहे!

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल

rajeevsane@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विरोध-विकास-वाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: China will have to compete in the competition in the global economy and politics

ताज्या बातम्या